‘मी अनेक वर्षांपासून साधना करत असूनही माझी अध्यात्मात प्रगती झाली नाही. तेव्हा ‘जन्मपत्रिका पाहून काही उपाय मिळतो का ?’, हे विचारण्यासाठी मी माझी जन्मपत्रिका एका ज्योतिषाला दाखवली. त्यांनी माझी पत्रिका पाहून मला सांगितले, ‘‘तुम्हाला बुध आणि केतु या ग्रहांचा दोष आहे अन् त्यावर उपाय म्हणून त्यांची शांती करावी लागेल.’’
मी त्यासंदर्भात पुरोहितांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितले, ‘‘प्रथम त्या ग्रहांच्या संबंधीचे जप विशिष्ट संख्येने केल्यानंतर ग्रहशांतीचा विधी केला जातो, तसेच जप करतांना काही बंधने पाळावी लागतात.’’ त्यानुसार पुरोहितांनी मला ‘कोणते जप करायचे ?’, त्याविषयी सांगितले आणि त्यांनी विधीवत् संकल्प केला. पुरोहितांनी सांगितल्यानुसार मी प्रतिदिन काही वेळ दोन्ही ग्रहांच्या संबंधीचे जप केले. मला जप पूर्ण करायला ३ मासांचा कालावधी लागला. त्यानंतर ७.१.२०२५ या दिवशी ग्रहशांतीचा विधी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात करण्यात आला. मला जप करतांना आणि ग्रहशांतीचे विधी चालू असतांना ज्या अनुभूती आल्या, त्या गुरुचरणी अर्पण करत आहे.

१. ग्रहांच्या संबंधीचे जप करतांना आलेल्या अनुभूती
अ. माझी अंतर्मुखता वाढली.
आ. ‘मी भगवंताच्या विराट रूपाच्या एका लहान भागावर लक्ष केंद्रित करून जप करत असून तो जप त्या ग्रहाचा नसून भगवंताचाच आहे’, असे मला अधूनमधून वाटत होते.
‘काया-वाचा-मने’ नामजप करणे’, याचा वेगळा पैलू लक्षात येणे
‘मी यापूर्वी ‘काया-वाचा-मने’ नामजप करणे, याचा अर्थ अनुक्रमे ‘नामजप लिहिणे, तोंडाने उच्चार करत नामजप करणे आणि मनातल्या मनात नामजप करणे’, असे समजत होतो. मी होमाच्या वेळी बाजूला बसून माझ्या बोटांच्या पेरांना स्पर्श करत नामजप करत असतांना एक वेगळा पैलू सहजतेने माझ्या लक्षात आला. ‘बोटांच्या पेरांना स्पर्श करून नामजप करणे, म्हणजे कायेने नामजप करणे, जीभ न हालवता नामजप करणे, म्हणजे वाणीने नामजप करणे आणि जपाकडे मनाचे पूर्ण लक्ष असणे, म्हणजे मनाने जप होणे’, असे मला वाटले. होम संपेपर्यंत माझा पूर्ण एकाग्रतेने नामजप होत होता.’
– आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत (वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१.२०२५)
२. ग्रहशांतीचे विधी चालू असतांना आलेल्या अनुभूती
अ. माझ्या देहाचे जडत्व हळूहळू न्यून होऊन मला हलकेपणा जाणवू लागला. मला हलकेपणा जाणवू लागल्यावरच ‘माझ्या देहावर आधी जडत्व होते’, हे माझ्या लक्षात आले.
आ. माझ्या मनाची अंतर्मुखता लक्षणीय प्रमाणात वाढली. ‘शांतीविधीकडे आणि माझा नामजप होत आहे ना ?’, यांकडे माझे सहजतेने लक्ष रहात होते. माझ्या मनात अन्य कोणतेही विचार येत नव्हते.
इ. ‘माझ्या देहाच्या सभोवतीची स्पंदने पालटत आहेत’, असे मला वाटले.
ई. ग्रहशांतीचा होम चालू झाल्यानंतर मला ‘नेहमीचा नामजप करावा’, असे वाटले आणि माझा तो नामजप आपोआप चालू झाला. त्या वेळी मी माझ्या बोटांच्या पेरांना स्पर्श करत नामजप करू लागलो.
उ. होम संपल्यानंतर पुरोहितांनी मला पुढील विधींसाठी बसायला सांगितले. त्या वेळी मला पूर्ण हलकेपणा जाणवत होता.
ऊ. विधी चालू असतांना ‘माझे माझ्या देहाकडे जिथे लक्ष जाईल, तिथे कारंज्याप्रमाणे स्वच्छ पाण्याचे थेंब उडत आहेत’, असे मला काही वेळ दिसत होते.’
– आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत (वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१.२०२५)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |