रशियाने युक्रेनच्या सीमेवरून सैन्य परत बोलावले नसून उलट ७ सहस्र सैनिक वाढवले आहेत ! – अमेरिकेचा दावा

प्रातिनिधिक छायाचित्र

मॉस्को (रशिया) – रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर रशियाने युक्रेनच्या सीमेवरून सैन्याच्या काही तुकड्या परत बोलावल्याचे सांगितले होते; मात्र ‘रशियाने खोटे सांगितले असून त्याने सैन्य माघारी न बोलावता उलट सीमेवर आणखी ७ सहस्र सैनिकांची भर घातली आहे, असा आरोप अमेरिकेने केला. अमेरिकेतील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सैन्य परत पाठवल्याचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. या दाव्याला ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख जिम हॉकेनहल यांनीही दुजोरा दिला आहे.

अमेरिकेच्या अधिकार्‍याने म्हटले आहे की, युक्रेनवर आक्रमण करण्यासाठी रशिया कोणतेही निमित्त साधू शकतो. यात रशियाच्या भूमीत घुसखोरी किंवा ‘नाटो’ संबंधीचे कारण पुढे करण्यात येऊ शकते. यासह रशियाची सरकारी प्रसारमाध्यमे येत्या काही काळात खोट्या बातम्या पसरवू शकतात.