‘ईश्वरी राज्याच्या स्थापनेच्या कार्याला देवतांचे आशीर्वाद मिळावेत, या कार्यातील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि या कार्यात सहभागी असलेल्या सनातन संस्थेच्या साधकांचे रक्षण व्हावे, यांसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या नाडीपट्टीमध्ये महर्षि सांगत असल्याप्रमाणे गेली ५ वर्षे भारतभर दौरा करून देवदर्शने करत आहेत. महर्षि आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी बहुतांश वेळा तमिळनाडूतील देवळांतच जायला सांगतात. तेथील सात्त्विक देवळांची वर्णने ऐकून मलाही ‘तेथील देवळांत देवदर्शनाला जावे’, असे वाटायचे. त्याचा योग मला नोव्हेंबर २०२१ मध्ये आला. या देवदर्शनातील अनुभव येथे देत आहे. या कालावधीत श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे घडलेले गुणदर्शन याविषयीची माहिती आपण १६ डिसेंबर २०२१ या दिवशीच्या भागात वाचली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/535593.html
६. दर्शन घेतलेली पवित्र स्थाने
६ अ. देवळे
टीप – ‘बृहदीश्वर’ हे जगातील मोठ्या देवळांपैकी एक देऊळ ! या देवळाचा कळस जगात सर्वांत उंच (२१७ फूट, म्हणजे ६६ मीटर उंच) आहे. अकराव्या शतकात चोळ राजाने हे देऊळ बांधले. पाया न खणताही केवळ शिळांचा (दगडांचा) उपयोग करून जगात सर्वांत उंच उभारलेले हे देऊळ आहे. देवळाच्या कळसाच्या वर जो गोलाकार दगड बसवला आहे, त्याचे वजन ८० सहस्र किलो आहे. त्या काळी एवढा जड दगड कसा काय वर नेऊन कळसावर बसवला असेल ! या देवळाचा कळस जगातील सर्वांत उंच गणल्या जाणार्या इटलीमधील ‘लीनिंग टॉवर ऑफ पीसा’पेक्षाही उंच आहे. ‘लीनिंग टॉवर ऑफ पीसा’ याची उंची १८३ फूट, म्हणजे ५५.८ मीटर आहे आणि तो थोडा झुकलेला आहे; पण बृहदीश्वर देवळाचा कळस त्यापेक्षाही उंच असूनही अगदी सरळ आहे. भारतातील केवढे हे पुरातन आणि प्रगत वास्तुशास्त्र !
६ आ. तीर्थस्थान : कुंभकोणम् येथे ‘महामहम्’ हे तीर्थस्थान आहे. येथे दर १२ वर्षांनी माघ मासात कुंभमेळ्याप्रमाणे मेळा भरतो. त्याला ‘ब्रह्मोत्सव’ म्हणतात. तो १० दिवसांचा असतो.
६ इ. तंजावर येथील रामदासस्वामींचा ‘झोळीमठ’ : रामदासस्वामींचे शिष्य ‘भीमस्वामी’ यांनी हा मठ रामदासस्वामींची आज्ञा घेऊन स्थापन केला आहे. रामदासस्वामींना प्रत्यक्ष दत्तत्रेयांनी भिक्षेसाठी झोळी दिली होती. ती भिक्षेची झोळी रामदासस्वामींनी या मठाला दिली; म्हणून या मठाला ‘झोळीमठ’ म्हणतात.
६ इ १. दृष्टी अधू झालेल्या एका शिल्पकाराने भावपूर्ण बनवलेल्या अप्रतिम मूर्ती ! : रामदासस्वामींनी दृष्टी अधू झालेल्या एका शिल्पकाराला दृष्टी देऊन त्याच्याकडून या मठात स्थापन करण्यासाठी रामपंचायतनाच्या (राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न आणि मारुति या सहा जणांच्या) तळहाताच्या उंचीच्या दगडाच्या मूर्ती बनवून घेतल्या. त्या मूर्ती रामदासस्वामींना पुष्कळ आवडल्याने त्यांनी त्या शिल्पकाराकडून सातार्याच्या सज्जनगडासाठीही राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या ३ फूट उंचीच्या मूर्ती बनवून घेतल्या. त्याही रामदासस्वामींना आवडल्या. त्यामुळे प्रसन्न होऊन त्यांनी शिल्पकाराला विचारले, ‘तुला काय पाहिजे ? तुझी आलेली दृष्टी आता अशीच राहू दे का ?’ यावर शिल्पकार म्हणाला, ‘या डोळ्यांनी आपण मला प्रत्यक्ष श्रीरामाचे दर्शन घडवल्याने आता आणखी काय पहायचे शिल्लक आहे ? आता मला दृष्टी नको.’ केवढा हा त्या शिल्पकाराचा भाव !
६ इ २. भीमस्वामी यांच्या एका वंशजांनी काढलेले रामदासस्वामींचे एक अप्रतिम चित्र ! : या मठात भीमस्वामी यांच्या एका वंशजांनी रामदासस्वामींचे काढलेले एक चित्रही आहे. आता तेच चित्र सगळीकडे प्रसिद्ध आहे. तसेच हाताने लिहिलेल्या संपूर्ण दासबोधाची फार जुनी प्रतही तेथे आहे.
६ इ ३. रामनाम पूर्ण झाले की, भीमस्वामींचे वंशज यांच्या हातातील जपमाळ आपोआप मारुतीच्या गळ्यात पडायची ! : मठात रामदासस्वामींनी रामपंचायतनासमोर स्थापन केलेला मारुतीही आहे. भीमस्वामींचे वंशज प्रतिदिन सकाळी जपमाळ घेऊन श्रीरामाच्या नामस्मरणाला बसायचे. त्यांचे रामनाम पूर्ण झाले की, त्यांच्या हातातील जपमाळ आपोआप मारुतीच्या गळ्यात पडायची. ही अनुभूती येईपर्यंत ते अन्न-पाणी घ्यायचे नाहीत. भीमस्वामींच्या पूर्वजांचा केवढा आध्यात्मिक अधिकार होता. मारुति प्रत्यक्ष रामनाम स्वीकारायचा !
७. देवळांची भव्यता आणि सुंदरता !
७ अ. देवळांची भव्यता : आम्ही पाहिलेली सर्वच देवळे भव्य होती. परिसरात प्रवेश करायचा दरवाजा २ हत्तींच्या उंचीएवढा आहे. प्रवेशद्वाराच्या वर देवळाचे गोपूर असायचे. गोपूराचा वरचा भाग अरूंद होत गेलेला असतो. सर्वांत वर दोन शिंगांची प्रतिकृती असते. देवळांची गोपुरे इमारतीच्या ५ – ६ मजली उंचीएवढी उंच असतात. ‘गोपूर’ म्हणजे गायीचे तोंड ते शिंगे या भागाचा आकार. गोपूर एवढे उंच असण्याचे कारण म्हणजे पूर्वी रस्ते नव्हते, तसेच दाट झाडी असायची. त्यामुळे ‘देऊळ कुठे आहे ?’, हे भक्तांना दुरून कळावे, यासाठी ती उंच बनवलेली असते. भक्तांच्या सोयीसाठी प्रत्येक दिशेला देवळाचे प्रवेशद्वार आणि त्यावर गोपूर असते. मंदिरांची गोपूरे उंच होतीच, शिवाय मुख्य देवळाचे दगडी बांधकामही साधारण २ मजली उंच आहे. आतील गर्भगृहापर्यंत जायचा मार्ग अर्धा किलोमीटर लांब आहे. यावरून देवळांची भव्यता लक्षात येईल.
७ आ. देवळांमधील सहस्रो शिल्पे : देवळाच्या प्रत्येक गोपूरावर चारही बाजूंना एकूण शेकडो मूर्ती आहे. काही देवळांना ८ गोपूरेही आहेत. देवळाच्या एका दारातून आत गेले की, काही अंतर चालून गेल्यावर पुन्हा दुसरा दरवाजा आणि त्याच्या वरही गोपूर आहेत. असे प्रत्येक दिशेच्या दरवाजाच्या संदर्भात आहे. त्यामुळे उंच अशा ८ गोपूरांवर शेकडो मूर्ती आहेत. मुख्य देवळामध्ये गर्भगृहापर्यंत जायच्या अर्ध्या किलोमीटरच्या मार्गात दोन-दोन मनुष्य उंचीची अनेक शिल्पे आहेत, नक्षीकाम आहे, तसेच छतावर रंगांनी साकारलेली अनेक चित्रे आहेत. हे सर्व इतके आखीव-रेखीव आणि सुंदर आहे की, ते बघून आम्ही थक्क होत होतो.
७ इ. पूर्वीच्या राजांनी एवढी मोठी देवळे बांधण्याचे कारण : येथील देवळांना त्याच्या चारही दिशांच्या प्रवेशद्वारांना जोडणार्या तटबंदीसारख्या दगडाच्या मोठमोठ्या भिंती बांधलेल्या आहेत. त्या वेळच्या चोळ आणि पंड्या या राजघराण्यांनी ही भव्य देवळे बांधली आहेत. काही देवळांचा परिसर १०-२० एकर, तर काही देवळांचा परिसर १०० एकर एवढा मोठाही आहे. देवळांमध्ये रहाण्याच्या, पाण्याच्या सर्व सोयी आहेत. देवळांना तटबंदी असण्याचे कारण म्हणजे ‘समजा एखाद्या शत्रूचे आक्रमण झाले, तर गावातील लोकांना देवळाच्या आत बोलवून त्यांचे रक्षण करता येईल’, असा विचार त्या वेळच्या राजांचा असायचा. त्या वेळच्या राजांना आपल्या प्रजेची केवढी काळजी असायची !
(क्रमशः)
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१२.२०२१)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/536429.html
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या / संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |