‘ईश्वरी राज्याच्या स्थापनेच्या कार्याला देवतांचे आशीर्वाद मिळावेत, या कार्यातील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि या कार्यात सहभागी असलेल्या सनातन संस्थेच्या साधकांचे रक्षण व्हावे, यांसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या नाडीपट्टीमध्ये महर्षि सांगत असल्याप्रमाणे गेली ५ वर्षे भारतभर दौरा करून देवदर्शने करत आहेत. महर्षि आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी बहुतांश वेळा तमिळनाडूतील देवळांतच जायला सांगतात. तेथील सात्त्विक देवळांची वर्णने ऐकून मलाही ‘तेथील देवळांत देवदर्शनाला जावे’, असे वाटायचे. त्याचा योग मला नोव्हेंबर २०२१ मध्ये आला. या देवदर्शनातील अनुभव येथे देत आहे.
१७ डिसेंबर २०२१ या दिवशीच्या भागात ‘तमिळनाडू येथे दर्शन घेतलेली स्थाने आणि देवळांची भव्यता’ याविषयी जाणून घेतले. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/536155.html
८. काही देवळांच्या संदर्भात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
८ अ. पंचतत्त्वांच्या शिवलिंगांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती : आम्ही पंचतत्त्वांच्या शिवलिंगांपैकी पृथ्वीतत्त्वाचा एकांबरेश्वर, तेजतत्त्वाचा अरुणाचलेश्वर, वायुतत्त्वाचा श्रीकालहस्तीश्वर आणि आकाशतत्त्वाचा चिदंबरम् यांचे दर्शन घेतले. आपतत्त्वाचा ‘जंबुकेश्वर’ याचे दर्शन आम्ही घेतले नाही. दर्शन घेतलेल्या शिवांच्या संदर्भात मला पुढील अनुभूती आल्या.
८ अ १. पृथ्वीतत्त्वाचा एकांबरेश्वर – पायांना जडत्व जाणवणे, तसेच मूलाधारचक्रावर स्पंदने जाणवणे : या देवळापासून आम्ही अर्धा किलोमीटर दूर असतांनाच मला थंडावा जाणवू लागला; पण प्रत्यक्ष मंदिरात गेल्यावर मला पायांना जडत्व जाणवू लागले. आपण समुद्रकिनारी गेल्यावर लाट येऊन गेल्यावर आपले पाय वाळूत रुततात आणि तेव्हा आपल्या पायांना जसे जडत्व जाणवते, तसे जडत्व मला या मंदिरात गेल्यावर जाणवले, तसेच मला मूलाधारचक्रावर स्पंदने जाणवली. त्या वेळी बाकी शरिराला कोणतीही स्पंदने जाणवली नाहीत.
८ अ २. तेजतत्त्वाचा अरुणाचलेश्वर – पुष्कळ उष्णता जाणवून घाम येणे
८ अ ३. वायुतत्त्वाचा श्रीकालहस्तीश्वर – गळा ते डोके या भागात थंडावा जाणवणे, श्वास मोकळा होणे आणि सुषुम्ना नाडी कार्यरत होणे; पण बाकी शरिराला थंडाव्याची जाणीव नसणे : येथील शिवलिंग ४ फूट उंच आहे. तेथे शिवलिंगासमोर तेलाचे २ दिवे लावलेले असतात. एक दिवा लिंगाच्या पायथ्यापासून अर्धा फूट उंचीवर असतो, तर दुसरा दिवा साडेतीन फूट उंचीवर असतो. यांपैकी खालच्या दिव्याची ज्योत नेहमी स्थिर असते, तर वरच्या दिव्याची ज्योत फडफडत असते. वरच्या दिव्याची ज्योत फडफडत असण्याचे कारण म्हणजे शिवलिंग श्वासोच्छ्वास करत असते. त्यामुळे या देवळात मला माझा गळा ते डोके या भागात थंडावा जाणवत होता, माझा श्वास मोकळा झाला होता आणि माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली होती; पण माझ्या बाकी शरिराला थंडाव्याची जाणीव नव्हती.
८ अ ४. आकाशतत्त्वाचा चिदंबरम् – पोकळी आणि शांती जाणवणे : येथे शिवलिंग नसून केवळ गर्भगृह आहे.
९. महर्षींची आशीर्वादाच्या नाडीवाचनातून झालेली कृपा
७.११.२०२१ या दिवशी सकाळी आम्ही देवदर्शनांच्या नियोजित कार्यक्रमातील ‘चिदंबरम्’ या आकाशतत्त्वाच्या शिवाचे दर्शन घेतले आणि दुपारी चेन्नईला जाण्यासाठी निघालो. हे अंतर २१६ कि.मी.चे होते. आम्ही ५० – ६० कि.मी. गेल्यावर आम्हाला कळले की, चेन्नईला, तसेच तमिळनाडूच्या किनारपट्टीच्या भागात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि सगळीकडे पुष्कळ पाणी साचले आहे. कांचिपुरमपर्यंत सर्व भाग जलमय झाला आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला, ‘आपण चेन्नईला न जाता ईरोड येथे जाऊया; कारण ईरोड हे किनारपट्टीपासून पुष्कळ दूर आहे, तसेच आणखी २ दिवसांनी नाडीपट्टीवाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांना नाडीवाचनासाठी ईरोड येथे बोलावलेच होते.’ त्यामुळे आम्ही ईरोडकडे मार्गक्रमण केले. पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना आम्ही ईरोड येथे येत असल्याचे कळवले. त्यांनी आम्हाला रात्री थेट त्यांच्याकडेच येण्यास सांगितले.
पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या ईरोड येथील घरी पोचल्यावर त्यांनी आम्ही देवदर्शने केल्याबद्दल आम्हाला आशीर्वाद म्हणून नाडीवाचन करण्यासाठी नाडीपट्टी काढूनच ठेवली होती. त्यांनी रात्री ९ वाजता नाडीवाचनाला प्रारंभ केला. हे नाडीवाचन १ घंटा चालले. महर्षि नाडीवाचनात म्हणाले, ‘‘तुम्ही ईरोड येथे येणार, हे ठरलेलेच होते. त्याप्रमाणेच घडले.’’ महर्षींनी नाडीवाचनात सांगितलेली मुख्य सूत्रे पुढीलप्रमाणे होती.
अ. तुम्ही ही जी देवदर्शने केलीत, त्याचे नियोजन तुम्ही केले नव्हते, तर ते महर्षींचेच नियोजन होते. हा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यासाठी देवतांचा आशीर्वाद मिळवण्याचाच एक भाग होता.
आ. तुम्ही या ६ दिवसांत देवदर्शने करून एवढे पुण्य मिळवले आहे की, एखाद्याला ३ जन्मांत देवदर्शने करूनही तेवढे पुण्य मिळणार नाही.
इ. तुम्ही एवढी देवदर्शने करू शकलात, ती केवळ महालक्ष्मीस्वरूप असलेल्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामुळेच !
ई. तुमची सर्व देवदर्शने सहजतेने आणि पूर्णपणे फलदायी झाली, तीही केवळ महालक्ष्मीस्वरूप असलेल्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांच्यामुळेच !
उ. तुम्ही भक्तीभावाने सर्व देवांचे दर्शन घेतल्याबद्दल महर्षि तुम्हाला आशीर्वाद देत आहेत !
ऊ. तुमच्यापैकी ४ जण (मी, सौ. सायली करंदीकर, पू. (सौ.) शैलजा परांजपे आणि पू. सदाशिव परांजपे) उद्या गोव्याला परत जाऊ शकतात. या सर्व देवदर्शनाला जसा महर्षींचा कृपाशीर्वाद होता, तसाच आता या ४ जणांना परतीच्या प्रवासात आम्ही आशीर्वाद देत आहोत. त्यांच्याबरोबर आम्ही एक दैवी शक्ती त्यांच्या रक्षणासाठी पाठवत आहोत.
ऊ १. महर्षींनी परतीच्या प्रवासात एक दैवी शक्ती सोबत रक्षणासाठी पाठवल्यामुळे विमानप्रवासात आलेले संकट टळणे : आम्ही ‘एक दैवी शक्ती परतीच्या प्रवासात तुमच्या रक्षणासाठी सोबत पाठवत आहोत’, या महर्षींच्या वाक्याची प्रचीती आम्हाला विमानप्रवासात आली. जेव्हा आमचे विमान गोवा जवळ आल्यावर ऊंच आकाशातून खाली खाली येऊ लागले. तेव्हा पावसामुळे वातावरण ढगाळ होते. त्यामुळे विमान खाली येत असतांना ढगांवर आपटून अक्षरशः हलत होते. ते ५ मिनिटे एवढे हलले की, विमानातील प्रवासी, तसेच हवाईसुंदरीही घाबरल्या होत्या. सर्वजण जीव मुठीत धरून बसले होते; पण शेवटी विमान सुखरूप खाली आले. ‘महर्षींनी दैवी शक्तीला आमच्यासोबत पाठवल्यामुळेच विमानाला काही झाले नाही’, हे आम्ही अनुभवले. त्यामुळे आम्हाला महर्षींप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
१०. कृतज्ञता
या देवदर्शनांमुळे आम्हाला पुष्कळ पुण्य आणि चैतन्य तर मिळालेच, शिवाय महर्षींचाही आशीर्वाद लाभला . ‘आपण गुरुकृपेने साधना करून जीवन समर्पित करू लागलो की, आपण ज्या काही कृती करतो, त्या आपण ठरवत नसून त्या कृतींमध्ये देवाचेच नियोजन असते’, याची प्रचीती आम्हाला आली. महर्षींनीच आमच्याकडून देवदर्शने करवून घेतली आणि कृपाशीर्वादही दिला. यासाठी आम्ही महर्षि आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत.’
(क्रमशः)
– सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१२.२०२१)
देवळांचे सरकारीकरण झाल्याने दर्शनार्थींची होत असलेली लूट आणि त्याचे कारण
‘आम्ही घरातील काही जणांनी १ ते ७ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत तमिळनाडूतील काही देवळे बघण्याचे नियोजन केले होते. देवळांचे दर्शन घेत असतांना देवळांच्या सरकारीकरणामुळे देवळे आणि दर्शनार्थी यांची कशी हानी होत आहे, हे माझ्या लक्षात आले. ती स्थिती येथे मांडत आहे.
१. सरकारीकरण केलेल्या देवळांमध्ये सरकार दर्शनार्थींकडून प्रवेशशुल्क आकारून, तसेच त्यांनी केलेल्या दानधर्मातील वाटा घेऊन त्यांना लुबाडत असणे
आम्ही दर्शन घेतलेल्या बहुतेक सर्वच देवळांमध्ये दर्शन घेण्यासाठी सर्वसामान्यांना प्रत्येकी काही शुल्क द्यावे लागत होते. तसेच विशेष महत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या रांगेतून दर्शन घेण्यासाठी सामान्य शुल्काहून दुप्पट किंवा तिप्पट शुल्क होते. दक्षिण भारतातील देवळांत प्रतिदिन सहस्रो लोक दर्शनाला येतात. त्यामुळे दर्शनशुल्काच्या माध्यमातून प्रतिदिन लाखो रुपये गोळा होतात. देवळात दर्शन घेण्यासाठी शुल्क आकारण्याची प्रथा देवळांच्या सरकारीकरणातून पडली आहे. प्रवेशशुल्कातून प्रतिदिन जमा झालेले लाखो रुपये राज्य सरकारकडे जमा होतात आणि सरकारला विनासायास देवळांकडून पैसा मिळतो. एवढेच नव्हे, तर दर्शनार्थी करत असलेल्या दानधर्मातील काही वाटा सरकार घेते. अशा प्रकारे सरकार देवदर्शनासाठी पैसे आकारून आणि त्यांनी केलेल्या दानधर्मातील वाटा घेऊन दर्शनार्थींना लुबाडत आहे, तसेच धर्मासाठीचा पैसा मायेतील गोष्टींसाठी व्यय करत आहे.
२. कुठे भव्य देवळे बांधणारे पूर्वीचे धार्मिक वृत्तीचे राजे आणि कुठे आताचे देवळांना लुटणारे अधार्मिक वृत्तीचे अन् नीतीमत्ताहीन राज्यकर्ते !
आम्ही दर्शन घेतलेली देवळे ही दक्षिण भारतात राज्य केलेले चोळ साम्राज्य, पल्लव राजवंश, पंड्या राजवंश इत्यादी राजघराण्यांतील राजांनी एक ते दीड सहस्र वर्षांपूर्वी बांधलेली आहेत. आध्यात्मिक महत्त्व असलेली देवतांची स्थाने टिकून रहावीत आणि लोकांना त्यांचा लाभ व्हावा, यांसाठी या राजांनी एवढी भव्य अन् अप्रतिम देवळे बांधली. त्यांसाठी त्यांनी आपली धनसंपत्ती उदार हस्ते अर्पण केली. तेव्हा साधनसामुग्री एवढी प्रगत नव्हती. त्यामुळे अशी मोठी देवळे बांधून पूर्ण व्हायला काही दशके लागायची. काहींना तर १०० हून अधिक वर्षेही लागली आहेत. त्यामुळे ते २ – ३ पिढ्यांचे काम असायचे. पूर्वीच्या राजांनी देवळे बांधण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत आणि भारतियांची कलाकृती अन् आध्यात्मिक वारसा या निमित्ताने जपला आहे. यावरून त्या वेळच्या राजांची धार्मिक वृत्ती लक्षात येते. देवाच्या दर्शनाने लोकांना अध्यात्माकडे वळवण्यासाठी त्या वेळच्या राजांनी किती कष्ट घेतले आहेत ! याउलट आताचे राज्यकर्ते देवळे तर बांधत नाहीतच, उलट आधीच्या राजांनी बांधलेल्या देवळांची संपत्ती हडप करत आहेत ! तसेच देवळांचे सरकारीकरण करून धार्मिक वृत्तीच्या लोकांकडील (भक्तांकडील) देवळांचे व्यवस्थापन हिरावून घेऊन तेथे भक्तीभावाचा लवलेश नसणारे शासनकर्ते नेमून देवळांचे पावित्र्य न्यून करत आहेत !
३. लोकांनी साधनेला आरंभ करणे आणि धार्मिक वृत्तीचे बनणे, हा यावर उपाय !
देवळांची अशी स्थिती निर्माण होण्याचे कारण म्हणजे आताची बहुसंख्य जनता धार्मिक राहिलेली नाही. तिच्याकडून साधना होत नाही. तिची नीतीमत्ता खालावत आहे, तसेच तिच्याकडून अधर्मही होत आहे. ‘यथा राजा, तथा प्रजा !’, अशी म्हण आहे. सध्या अधार्मिक लोकांतून शासनकर्ते निवडून येत असल्याने पुढील प्रजाही अधार्मिक निपजत आहे. देवळांत येणारे बहुसंख्य दर्शनार्थी भक्तीभावाने नव्हे, तर ‘मायेतील सकाम इच्छा देवाने पूर्ण करावी’, यासाठी येत आहेत. त्यामुळेच त्यांना पैसे मोजावे लागत आहेत. यावर उपाय म्हणजे लोकांनी साधनेला आरंभ करणे आणि धार्मिक वृत्तीचे बनणे !’
– सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१२.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या / संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |