मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्दशी (१७.१२.२०२१) या दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त…
‘ईश्वरी राज्याच्या स्थापनेच्या कार्याला देवतांचे आशीर्वाद मिळावेत, या कार्यातील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि या कार्यात सहभागी असलेल्या सनातन संस्थेच्या साधकांचे रक्षण व्हावे, यांसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या नाडीपट्टीमध्ये महर्षि सांगत असल्याप्रमाणे गेली ५ वर्षे भारतभर दौरा करून देवदर्शने करत आहेत. तमिळनाडूतील चेन्नई येथील नाडीपट्टीवाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् हे ‘सप्तर्षी जीवनाडीपट्टी’चे वाचन करतात आणि महर्षि करत असलेले मार्गदर्शन सनातनला सांगतात. महर्षि आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी बहुतांश वेळा तमिळनाडूतील देवळांतच जायला सांगतात. तेथील सात्त्विक देवळांची वर्णने ऐकून मलाही ‘तेथील देवळांत देवदर्शनाला जावे’, असे वाटायचे. त्याचा योग मला नोव्हेंबर २०२१ मध्ये आला. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांची आई पू. (सौ.) शैलजा परांजपे, वडील पू. सदाशिव परांजपे, मी आणि मुलगी सौ. सायली सिद्धेश करंदीकर यांचे १ ते ७ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत तमिळनाडूतील काही देवळे बघण्याचे नियोजन केले होते. या देवदर्शनातील अनुभव येथे देत आहे.
१. चेन्नई येथील साधिका सौ. सुगंधीअक्का (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांनी भावपूर्ण स्वागत करणे
चेन्नई येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. सुगंधी जयकुमार यांच्या घरी आम्ही गेलो. त्यांचे घर दोन मजली आहे. त्या घराच्या तळमजल्यावर सनातनचे सेवाकेंद्र आहे. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्याबरोबरचे दौर्याचे ४ साधक चेन्नई येथे गेल्यावर नेहमी त्या सेवाकेंद्रात रहातात. आम्ही रात्री ९ वाजता सौ. सुगंधीअक्का यांच्या घरी पोचलो. खरेतर दिवाळी पुढे आणखी ५ दिवसांनी होती; पण सुगंधीअक्कांनी आमचे स्वागत दिवाळीसारखेच केले. त्यांनी दारासमोर पणत्या लावल्या होत्या. अंगणात रांगोळी काढली होती. आम्हा ४ जणांमध्ये ३ जण संत होते. (सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे) त्यामुळे आम्ही घरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी आम्हा सर्वांच्या चरणांवर प्रथम कोमट पाणी, त्यानंतर दूध आणि त्यानंतर पुन्हा कोमट पाणी घालून आमचे चरण धुतले अन् ते पुसले. त्यानंतर आमचे औक्षण केले आणि मग आम्हाला घरात घेतले. आम्ही आल्यामुळे सौ. सुगंधीअक्का, त्यांचे पती, त्यांची २ मुले आणि सौ. सुगंधीअक्का यांच्या सासूबाई यांना पुष्कळ आनंद झाला होता. आम्ही त्यांच्या घरी प्रथमच जात असल्याने आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि साधक यांचे वास्तव्य, तसेच सुगंधीअक्कांमधील भाव यांमुळे ते घर आम्हाला पुष्कळ चैतन्यमय वाटले.
२. चेन्नई येथील साधकांशी भावपूर्ण भेट होणे
चेन्नई येथे पू. उमा रविचंद्रन् (पू. उमाक्का) आणि पू. प्रभाकरअण्णा असे २ संत आहेत, तसेच साधकांची ४ कुटुंबेही आहेत. सर्वजण मिळून एकूण केवळ १३ च साधक चेन्नईमध्ये आहेत. ३१ ऑक्टोबर २०२१ या दिवशी सकाळी आमची पू. उमाक्का यांच्या घरी साधकांशी भेट ठेवली होती. आम्हाला बघून सर्वांना पुष्कळ आनंद झाला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वास्तव्य असलेल्या रामनाथी आश्रमातून आम्ही तेथे गेलो असल्याने ते साधक आमच्यामध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनाच पहात होते. आम्ही प्रत्येकाने आमची सेवा, अनुभूती यांविषयी चेन्नईतील साधक आणि संत यांना सांगितले. ते ऐकतांना त्यांचा भाव जागृत होत होता. आम्हालाही ते संत आणि साधक यांच्यातील गुण कळले. ती भावपूर्ण भेट २ घंटे चालली. सर्व वार्तालाप इंग्रजीतून झाला; कारण त्या साधकांना आमची मराठी किंवा हिंदी येत नाही आणि आम्हाला त्यांची तमिळ भाषा येत नाही. श्री. विनायक शानभाग आमचे दुभाषी होते.
३. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्री. विनायक शानभाग यांनी केलेले उत्कृष्ट नियोजन
३ अ. नियोजनासाठी केवळ १० दिवसांचा कालावधी मिळूनही श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्री. विनायक शानभाग यांनी निवास, वाहन आदींची व्यवस्था करणे : आमचे चेन्नईला जाण्याचे १० दिवसांपूर्वीच ठरले होते. चेन्नईला गेल्यावर आम्ही १ ते ७ नोव्हेंबर या ७ दिवसांच्या कालावधीत ‘चेन्नई ते रामेश्वरम् आणि परत चेन्नई’, असा प्रवास करायचे ठरले होते. या प्रवासात आम्हाला कांचीपूरम्, तिरुपती, तिरुवन्नामलई, मदुराई, रामेश्वरम्, त्रिची, तंजावर, कुंभकोणम् आणि चिदम्बरम् इतक्या तीर्थक्षेत्री जायचे होते. इतक्या ठिकाणच्या ओळखीच्या व्यक्तींना, तसेच देवळातील पुजार्यांना आम्ही येणार असल्याचे सांगणे, तेथील निवासव्यवस्था करणे, वाहनव्यवस्था करणे इत्यादी गोष्टी १० दिवसांत करणे खरेतर अवघड होते; पण श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विनायक शानभाग यांनी त्या सर्व गोष्टी उत्कृष्टपणे केल्या होत्या.
३ आ. प्रवासाच्या मार्गाचे श्री. विनायक शानभाग यांनी काढलेले चित्र पाहून ते ‘सात्त्विक असून देवदर्शन होणे, हे ईश्वरी नियोजन आहे’, असे जाणवणे : सर्व ठिकाणी क्रमाने जायच्या रस्त्याचा मार्ग श्री. विनायक शानभाग यांनी चेन्नई सेवाकेंद्रातील फलकावर काढला होता. तो नकाशा पाहून ‘ती आकृती आकाशातील एखाद्या नक्षत्राची आहे कि काय’, असे वाटत होते. फलकावरील ती आकृती पुष्कळ सात्त्विक वाटत होती आणि त्यामुळे ‘आमचे देवदर्शनाला जायचे सर्व नियोजन ईश्वरी नियोजन आहे’, असेच वाटत होते.
४. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी जवळीक करून ठेवलेला अलौकिक आणि अमाप लोकसंग्रह
देवळे, दुकाने, उपाहारगृहे आणि विश्रामालये (हॉटेल) इत्यादी ठिकाणी जेथे जेथे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांना जाण्याचा योग येतो, तेथील प्रत्येक ठिकाणची माणसे त्यांच्याशी कायमचीच जोडली जातात. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली साधकांच्या घरी गेल्यावर घरातील व्यक्ती त्यांच्याशी कायमच्या जोडल्या जातात, हे पूर्वी माहीत होते; पण समाजातील व्यक्तीही, मग त्या प्रतिष्ठित असो वा साध्या, त्यांच्याशी संपर्क किंवा ओळख ठेवून असतात, हे माहीत नव्हते. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांच्यामध्ये लोकांशी जवळीक करण्याची कला आहे. त्यांचे प्रेमाने बोलणे, विचारपूस करणे, साहाय्य करणे, हे मनाला भावते. तसेच त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होणार्या ज्ञानामुळेही माणसे प्रभावीत होऊन त्यांच्याशी आपोआप जोडली जातात. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली या दैवी आणि साक्षात् महालक्ष्मीचा अंश असल्याने, तसेच त्यांच्या आध्यात्मिक अधिकारामुळे त्यांच्या तोंडवळ्यावर तेज आहे. यामुळे त्यांना केवळ पाहूनच लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि त्यांना आदरणीय मानतात, असा अनुभव आम्ही घेतला. देवळातील पुजारी त्यांना घरातील एखाद्या मंगलप्रसंगी ‘आपली कृपादृष्टी आमच्यावर असू दे’, अशी प्रार्थना करतात, तर काही उपाहारगृहे आणि विश्रामालये यांचे मालक त्यांच्या पायाही पडतात.
४ अ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या ओळखीचे झालेले लाभ
४ अ १. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांच्या ओळखींमुळे आमचे देवळांतील देवदर्शनांचे नियोजन, तसेच विश्रामालयांमधील आरक्षण प्रत्येकाला केवळ दूरध्वनी करून झाले होते.
४ अ २. देवदर्शन डोळे भरून घेता येणे : तमिळनाडूतील देवळे पुष्कळ प्रसिद्ध असल्याने तेथे सहस्रोंच्या संख्येने लोक दर्शनाला येतात. त्यामुळे तेथील देवळांत देवाचे दर्शन घ्यायचे झाल्यास अनेक घंटे रांगेत उभे रहावे लागते, तसेच देवासमोर आल्यावर पाव ते अर्ध्या मिनिटातच पुढे जावे लागते. त्यामुळे देवदर्शन डोळेभरून होत नाही. आम्ही देवदर्शनाला ठिकठिकाणच्या १२ देवळांत गेलो. त्या प्रत्येक देवळात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांच्या ओळखीचे पुजारी होते. त्यामुळे आम्हाला रांगेत फार वेळ उभे रहावे लागले नाही आणि देवाचे जवळून अन् ५ ते १० मिनिटे दर्शन घेता आले.
४ अ ३. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी पुजार्यांनी प्रार्थना करणे आणि देवाचे प्रसादरूपी वस्त्र, कुंकू किंवा विभूती देणे : देवळात दर्शनाला गेल्यावर तेथील पुजारी आम्हाला खाली बसायला सांगायचे, तसेच ‘कुणाच्या नावाने आणि काय संकल्प करून पूजा करायची ?’, हे विचारायचे. आम्ही ‘हिंदु राष्ट्राच्या, म्हणजे ईश्वरी राज्याच्या (रामराज्याच्या) स्थापनेसाठी देवाला साकडे घाला’, असे सांगायचो. तसेच आम्ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे नाव सांगून त्यांची रास आणि गोत्र पुजार्यांना सांगायचो. पुजारी मंत्र म्हणून, तसेच देवाला आरती ओवाळून प्रार्थना करायचे आणि आम्हाला देवाचे एखादे वस्त्र, हार, कुंकू किंवा विभूती प्रसाद म्हणून द्यायचे. हे सर्व होत असतांना आम्हाला देवाचे डोळेभरून दर्शन घेता यायचे.
४ अ ४. त्या त्या देवळाच्या गावातील ठराविक सात्त्विक विश्रामालयामध्येच श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली रहात असल्याने आणि त्यांचा आदर करणारे त्या त्या विश्रामालयाचे मालक त्यांना ठराविक खोल्याच देत असल्याने त्या खोल्या आता सात्त्विक झाल्या असणे : आम्ही दर्शने घेतलेल्या देवळांत महर्षींनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांना हिंदु राष्ट्रासंबंधीच्या अडचणींवर परिहार म्हणून (आध्यात्मिक स्तरावरील उपाय म्हणून) गेल्या ५ वर्षांत अनेक वेळा दर्शनाला पाठवले आहे. त्यामुळे त्यांना त्या देवळाच्या गावातील एखादे सात्त्विक विश्रामालय बघून त्यामध्ये अनेक वेळा रहावे लागले आहे. त्या त्या ठिकाणच्या विश्रामालयांचे मालक श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांच्याशी आता परिचित झाले असल्याने आणि ते मालक त्यांच्याकडे ‘एका आध्यात्मिक संस्थेच्या माताजी’, म्हणून आदराने पहात असल्याने शक्यतो ते त्यांना ठराविक चांगल्या खोल्या देतात. त्या ठिकाणी २-३ दिवस रहावे लागल्यास श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली तेथे सकाळी अग्निहोत्रही करतात. यामुळे, तसेच त्यांच्या वास्तव्यामुळे त्या खोल्या आता सात्त्विक झाल्या आहेत. आम्हालाही बहुतेक ठिकाणी त्या ठराविक खोल्यांमध्येच रहायची संधी मिळून तेथील सात्त्विकता अनुभवायला मिळाली.
४ अ ५. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामुळे आश्रमांतील साधकांना आवश्यक वस्तू आश्रमातल्या आश्रमातच मिळणे : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांनी ठिकठिकाणच्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तू मिळण्याच्या दुकानांमध्येही जवळीक निर्माण केली आहे. सनातनच्या ठिकठिकाणच्या आश्रमांतील साधक सेवांमध्ये व्यस्त असतात. त्यांच्यासाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली या चांगल्या गुणवत्तेच्या वस्तू आश्रमातच उपलब्ध होतील, असे पहातात.
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१२.२०२१)
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील अनुभवायला मिळालेली प्रीती७ दिवसांच्या देवदर्शनाच्या दौर्यामध्ये श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांच्यातील ‘प्रीती’ हा गुण अनेक वेळा अनुभवायला मिळाला. अ. त्यांनी या दौर्याचे इतके सुरेख नियोजन केले होते की, त्यांचे आई-वडील पू. (सौ.) शैलजा परांजपे (वय ७४ वर्षे) आणि पू. सदाशिव परांजपे (वय ७९ वर्षे) हे वयस्कर असल्याने ‘एका गावाहून दुसर्या गावी जायचा प्रवास २ – ३ घंट्यांपेक्षा अधिक असणार नाही’, असे पाहिले होते. ‘चारचाकी गाडीत एका जागी बसून वयस्करांचे पाय सुजतात, तसेच जास्त प्रवासाने त्यांचे अंगही दुखते’, हे त्यांनी लक्षात घेतले होते. आ. तमिळनाडूतील देवळांचा परिसर भव्य, म्हणजे न्यूनतम ४ – ५ एकरचा असल्याने देवळाच्या परिसरात प्रवेश केल्यापासून ते गाभार्यात जाईपर्यंतचे अंतर अर्धा ते एक किलोमीटर सहज असते, तसेच देवळातील अन्य देवतांचे दर्शन घ्यायलाही बरेच चालावे लागते. हे लक्षात घेऊन श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांनी गाडीत चाकांच्या दोन खुर्च्या (व्हील चेअर्स) बरोबर घेतल्या होत्या. त्यामुळे त्यांनी आई-वडिलांना त्या दोन खुर्च्यांमध्ये बसवूनच देवदर्शने करवली. इ. देवळे असलेल्या गावात प्रवेश केल्यावर ते गाव, तेथील वैशिष्ट्यपूर्ण स्थळे इत्यादी व्यवस्थित पहाता येण्यासाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मला चारचाकी गाडीत पुढे चालकाच्या शेजारी बसायला सांगत आणि सर्व माहिती स्वतः आम्हाला सांगत. स्मरणशक्ती चांगली असल्याने त्या आम्हाला परिपूर्ण माहिती देत. ई. प्रवासात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली आम्हाला ‘खायला-प्यायला काही हवे आहे का ?’, हे वेळोवेळी विचारत. त्यांनी फराळाचे पदार्थ बरोबर घेतले होते. – (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१२.२०२१) |
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/536155.html