अफगाणिस्तानातून काश्मीरमध्ये आतंकवाद पसरण्याचा धोका ! – भारतातील रशियाचे राजदूत

अशी भीती वाटते, तर रशिया तालिबानचा उघड विरोध का करत नाही ? – संपादक

भारतातील रशियाचे राजदूत निकोले कुडाशिव

मॉस्को (रशिया) – आतंकवादविरोधी सहकार्य हा विविध स्तरांवर भारत आणि रशिया यांच्यातील संवादाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आम्हाला काबूलमध्ये एक सर्वसमावेशक सरकार हवे आहे. अफगाणिस्तानातून उद्भवणार्‍या आतंकवादाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी रशिया भारताला जवळून सहकार्य करत आहे. अफगाणिस्तानमधील नागरी कलह वाढल्याने संपूर्ण प्रदेशात आतंकवाद पसरेल. हा आतंकवाद रशिया आणि काश्मीर येथेही पसरू शकतो, अशी भीती भारतातील रशियाचे राजदूत निकोले कुडाशिव यांनी व्यक्त केली आहे. रशियाच्या दूतावासात ते पत्रकारांशी बोलत होते.

१. कुडाशिव पुढे म्हणाले की, आम्हाला एक सर्वसमावेशक सरकार हवे आहे. आम्हाला आशा आहे की, अफगाणिस्तानची भूमी इतर देशांमध्ये दहशत पसरवण्याचे स्रोत होणार नाही. अशाप्रकारे ही चिंता सामान्य आहे. रशिया आणि भारत यांच्या चौकटीत चालू असलेल्या वाटाघाटीचा हा विषय आहे. आम्ही या धोक्याचा सामना करत आहोत आणि तो टाळण्याचा प्रयत्न करू.

२. भारताच्या अधिकृत दौर्‍यावर असलेल्या बांगलादेशचे माहिती मंत्री हसन महमूद यांनी म्हटले की, बांगलादेश अफगाणिस्तानमधील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. दक्षिण आशियाई क्षेत्रातील स्थिरतेसाठी अफगाणिस्तानमधील स्थिरता महत्त्वाची आहे. तालिबानने स्थापन केलेल्या कोणत्याही सत्तेला मान्यता देण्याविषयी बोलणे सध्या घाईघाईने होईल.