चिनी गुप्तचर संस्थेच्या कारवाया आणि भारताची भूमिका !

‘पाकिस्तानची ‘आय.एस्.आय.’, अमेरिकेची ‘सीआयए’ आणि रशियाची ‘केजीबी’ या गुप्तचर संस्थांविषयी आपल्याला ठाऊक आहे. चीनच्या गुप्तचर संस्थेविषयी मात्र आपल्याला तेवढे ठाऊक नाही. आज आपण चीनची गुप्तचर संस्था कशी कारवाई करते, त्यात त्यांना किती यश मिळाले आणि त्यांच्या कारवाया थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो, याविषयी या लेखात पहाणार आहोत.

प्रतिकात्मक छायाचित्र

१. चीन आणि अन्य देशांतील गुप्तचर संस्थांमधील भेद

चीनच्या गुप्तचर संस्थेला ‘सी.आय.एस्’ म्हटले जाते. चीनची ‘सी.आय.एस्’ आणि अन्य देशांच्या गुप्तचर संस्था यांमध्ये भेद आहे. चीन गुप्तचर मोहिमेत कल्पनारम्य गोष्टींचा अधिक वापर करतो. भारतासह अन्य देश व्यावसायिक गुप्तचरांचा वापर करतात. चीनने वर्ष २०१७ मध्ये ‘नॅशनल इंटलिजन्स लॉ २०१७’ हा कायदा संमत केला. या कायद्यानुसार चीन सरकार कोणत्याही चिनी नागरिकाला त्यांच्या गुप्तचर मोहिमेत सहभागी होण्यासाठी बंधनकारक करू शकते. त्याप्रमाणे चीन दुसर्‍या देशात शिकत असलेेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांचा हेरगिरीसाठी वापर करतो. चीनचे उद्योग जगभरात पसरले आहेत, त्या माध्यमातूनही चीन हेरगिरी करत असतो. चीनचे कोणतेही ‘सॉफ्टवेअर’ किंवा ‘हार्डवेअर’ असो, ज्याच्या नावामागे ‘चायना’ हे नाव लागले आहे, ते एक प्रकारे चीनसाठी गुप्तहेराचे काम करते. त्या माध्यमातून चीन गुप्त माहिती मिळवतो.

२. चीनची गुप्तचर यंत्रणा

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

चीनची ‘मिनिस्ट्री ऑफ स्टेट सेक्युरिटी’ हेरगिरीचे काम करते. चीनची ‘मिनिस्ट्री ऑफ पब्लिक सेेक्युरिटी’ चीनच्या अंतर्गत असलेल्या गुप्तचर यंत्रणेकडून माहिती गोळा करते. ‘युनायटेड फ्रन्ट वर्क डिपार्टमेंट’ नावाचे मंत्रालय चिनी व्यावसायिक, चिनी नागरिक, शैक्षणिक, तसेच बाहेर देशात जाणारे पर्यटक यांच्याकडून गुप्त माहिती गोळा करण्याचे काम करते. चीनच्या सशस्त्र सैन्य दलाची गुप्तचर संस्था आहे, तिला ‘पी.एल्.ए. स्टॅ्रटजिक सपोर्ट फोर्स’ म्हटले जाते. या संस्थेकडे चीनच्या लष्करी गुप्तचर यंत्रणेला माहिती पुरवण्याचे काम आहे. चीनची हेरगिरी थांबवण्यासाठी भारताला या सर्वांवर लक्ष ठेवावे लागेल.

३. चीनने प्रसारमाध्यमांसाठी  ‘ग्रेट फायरवॉल’ निर्माण करणे

चीनच्या सर्व प्रसारमाध्यमांमध्ये एक ‘ग्रेट फायरवॉल’ लागली आहे. आपण संकेतस्थळावर चीनचे वृत्तपत्र वाचू शकतो; परंतु त्या वृत्ताखाली आपण प्रतिक्रिया व्यक्त करू शकत नाही. जगातील कोणत्याही सामाजिक माध्यमांना चीनमध्ये काम करता येत नाही. तेथे केवळ चिनी सामाजिक माध्यमांनाच अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे जगभरात असणारे गूगल, फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यू ट्यूब चीनमध्ये चालत नाहीत. भारतातील अनेक चिनी समर्थक भारतीय वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, तसेच सामाजिक माध्यमे यांमध्ये भारताच्या विरोधात उलटसुलट मतप्रदर्शन करत असतात; पण आपण चिनी प्रसारमाध्यमांमध्ये जाऊन काही बोलू शकत नाही. ही ‘ग्रेट फायरवॉल’ आहे. ग्रेट फायरवॉल अर्थात् एक ‘इंटरनेट सेन्सॉरशिप’ आहे. त्याचा वापर चीन करतो. ही ‘वन वे’सारखी काम करते.

४. चिनी गुप्तचर संस्थेचा विविध देशांना धोका !

चीनची ‘सी.आय.एस्.’ ही गुप्तचर संस्था संपूर्ण जगासाठी धोकादायक आहे. जगात बहुतांश देश लोकशाहीप्रधान आहेत. त्यामुळे तेथे प्रसारमाध्यमांना मुक्त वाव देण्यात आला आहे. या प्रसारमाध्यमांचा चीन हेरगिरीसाठी वापर करवून घेतो. इतरांना चीनच्या माध्यमांमध्ये घुसखोरी करायची असेल, तर त्यांना ‘हॅक’ करण्याविना पर्याय नसतो. चीन मात्र अन्य देशांमध्ये सर्रास घुसखोरी करतो.

चीनने पैशांच्या बळावर प्रत्येक देशात त्याचे हस्तक पेरले आहेत. चीनने काही अमेरिकी शास्त्रज्ञांना त्याच्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला. तसेच कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधील काही लोकांनीही चीनला माहिती पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. चीन त्याच्या हस्तकांच्या माध्यमातून विविध देशांचे तंत्रज्ञान, क्षेपणास्त्रांचे आराखडे आदी गोष्टींची चोरी करत असतो. जगातील सर्वश्रेष्ठ ५०० आस्थापने आहेत. त्या प्रत्येक आस्थापनातील काहीतरी माहिती चीनने चोरली आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे चीनच्या सायबर आक्रमणापासून कोणतीच गोष्ट सुरक्षित राहिली नाही. अशा प्रकारे चीनने पुष्कळ माहितीची चोरी केली आहे.

५. चिनी गुप्तचर यंत्रणांकडून भारतात होणार्‍या कारवाया 

अ. चिनी गुप्तचर संस्थांनी वर्ष १९४७ च्या पूर्वी भारतात प्रवेश केला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात चिनी गुप्तचर संस्था ब्रिटनसमवेत काम करत होती. त्या वेळी जपान त्यांचा शत्रू होता.

आ. भारत स्वतंत्र झाल्यानंतर चीनने भारताचे शेजारी तिबेट आणि नेपाळ येथेही चिनी हस्तक पेरले. अंदमान-निकोबार जवळच्या समुद्रात टेहाळणी करतांना अनेक वेळा चिनी जहाजे पकडण्यात आली. त्या जहाजांवरील चिन्यांना आपण काहीही शिक्षा न करता सोडून दिले आहे. असे न करता खरेतर त्यांना कारागृहात टाकणे आवश्यक आहे.

इ. चीनने ईशान्य भारतातील बंडखोरांना साहाय्य करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना पाकिस्तान किंवा बांगलादेश यांच्या माध्यमातून शस्त्रास्त्रेही पुरवली आहेत. यासाठी त्यांनी पाकिस्तानच्या आय.एस्.आय.चे साहाय्य घेतले आहे. चीन उत्तर पूर्व भागातील बंडखोरांना नेहमीच साहाय्य करत आला आहे. चीन नक्षलवादी किंवा माओवादी आणि साम्यवादी यांनाही साहाय्य करतो.

६. भारताने चिनी ‘अ‍ॅप’वर बंदी घालून हेरगिरीचा धोका अल्प करणे

एक चांगली गोष्ट घडली. कोरोना काळ चालू झाला, तेव्हा चीनच्या गुप्तचर संस्थेविषयी पाश्‍चात्त्य देशांत काही पुस्तके आणि लेख प्रकाशित झाले. तेव्हापासून प्रत्येक देश चिनी गुप्तचर संस्थेकडे संशयाच्या दृष्टीने पाहू लागला आहे. चिनी ‘अ‍ॅप’ हे चीनचे सर्वांत मोठेे गुप्तहेर आहेत. भारताने ‘चिनी अ‍ॅप्स’वर बंदी घातली. ज्यांच्याकडे चिनी अ‍ॅप, सॉफ्टवेअर आहे, त्यांची सर्व गुप्त माहिती चीन चोरी करत असतो. असे अ‍ॅप किंवा सॉफ्टवेअर आपल्याकडे असेल आणि आपण एखाद्या उद्योगसमूहात, संशोधन क्षेत्रात किंवा विद्यापिठात कार्यरत असाल, तर आपल्याला मोठा धोका होऊ शकतो; अशा महत्त्वाच्या क्षेत्रांत कार्यरत लोकांची माहिती चोरायचा प्रयत्न चीन करतो.

७. चीनी कॉन्फेशिअस केंद्रे म्हणजे हेरगिरीचे अड्डे !

चिनी कॉन्फेशिअस केंद्रे हे हेरगिरी करण्याचे चीनचे मोठे माध्यम आहे. या माध्यमातून ते चिनी भाषा आणि चिनी संस्कृती आदींविषयी माहिती देत असल्याचे सांगतात; परंतु ही केंद्रे हेरगिरीचे अड्डेच आहेत. भारतात मुंबई विद्यापीठ, आयआयटी यांसारख्या प्रथितयश शैक्षणिक संस्थांमध्ये ५५ कॉन्फेशिअस केंद्रे चालू होती. लडाख संघर्ष उद्भवल्यानंतर भारत सरकारने ती बंद केली. सध्या काही विद्यापिठांमध्ये चिनी भाषा शिकवण्यात येत आहे. चिनी भाषा शिकवणार्‍यांवरही भारताने नजर ठेवली पाहिजे. चीन भारताचा क्रमांक एकचा शत्रू आहे. त्यामुळे प्रत्येक भारतियाला चीनच्या गुप्तचर मोहिमेविषयी माहिती असणे देशाच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे