भारतीय शास्त्रज्ञांच्या मृत्यूचे गूढ, तसेच त्यांच्यावर झालेली भयावह अन् चिंताजनक आक्रमणे !

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

१. डॉ. तपन मिश्रा, ज्येष्ठ वैज्ञानिक, इस्रो

१ अ. डॉ. तपन मिश्रा यांना ३ वेळा ठार मारण्याचा प्रयत्न होणे आणि त्यांनी केलेले आरोप त्यांच्या पदाच्या दृष्टीने चिंताजनक अन् गंभीर असणे : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रोचे) वरिष्ठ सल्लागार आणि वैज्ञानिक डॉ. तपन मिश्रा निवृत्त होत आहेत. त्यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या एका पोस्टमध्ये आतापर्यंत मला ३ वेळा ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता, असे म्हटले आहे. एका प्रतिष्ठित संस्थेच्या वैज्ञानिकाला जिवे मारण्याचा प्रयत्न का बरे झाला असेल ? डॉ. मिश्रा यांनी म्हटल्याप्रमाणे यामागे आंतरराष्ट्रीय शक्ती आहेत का ? देशांतर्गतच हितशत्रू उत्तरदायी आहेत कि आपसांतील हेवेदावे कारणीभूत आहेत ? असे अनेक प्रश्‍न उपस्थित होतात. आपल्याला ३ वेळा जिवे मारण्याचा प्रयत्न झाला, असे एवढ्या मोठ्या वैज्ञानिकाने सांगणे, हे गंभीर आहे. वैज्ञानिक मिश्रा असोत किंवा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गोगोई असोत, ही मंडळी निवृत्तीला काही दिवस शेष असतांना किंवा निवृत्त झाल्यावर अशा प्रकारचे आरोप का करतात ?, हेही एक कोडेच आहे.

१ आ. जेवणात विष घालून डॉ. मिश्रा यांना ठार मारण्याचा प्रयत्न होणे : डॉ. मिश्रा म्हणाले की, मे २०१७ मध्ये माझ्या जेवणामध्ये जालीम विष घालून प्रथम मला ठार मारण्याचा प्रयत्न झाला. त्या वेळी त्यांनी अल्प आहार घेतल्याने किंवा दैवी कृपेने त्यांचे प्राण वाचले. तरीही थोड्या प्रमाणात का होईना, विषारी द्रव्य पोटात गेल्यामुळे २ वर्षे त्यांच्या पोटामध्ये रक्तस्राव होत होता.

१ इ. बॉम्बस्फोटात गुजरातमधील इस्रोची प्रयोगशाळा नष्ट होणे : ३ मे २०१८ या दिवशी कर्णावती (अहमदाबाद) येथील इस्रोच्या स्पेस अप्लिकेशन सेंटरमध्ये (सेकमध्ये) बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात १०० कोटी रुपयांची हानी होऊन संपूर्ण प्रयोगशाळाच नष्ट झाली.

१ ई. डॉ. मिश्रा यांना हायड्रोजन सायनाइडने ठार मारण्याचा प्रयत्न अयशस्वी होणे आणि त्यांच्या घरी विषारी साप सापडणे : १२ जुलै २०१९ या दिवशी, म्हणजे चंद्रयान-२ च्या लाँचिंगच्या २ दिवसांपूर्वी डॉ. मिश्रा यांना हायड्रोजन सायनाइडने ठार मारण्याचा प्रयत्न झाला. त्या वेळी सुरक्षा अधिकार्‍यांच्या सतर्कतेमुळे त्यांचे प्राण वाचले. शास्त्रज्ञांना अती महत्त्वाच्या व्यक्तींप्रमाणे सुरक्षा मिळत असतांनाही सप्टेंबर २०२० मध्ये त्यांच्यावर पुन्हा विषबाधा करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतरही त्यांच्या घरी अनेक वेळा विषारी साप सापडले. त्यांच्या घराशेजारी एल् आकाराचा सुरूंग आढळून आला. या सुरूंगामधून निश्‍चितपणे त्यांच्यावर आक्रमण करण्याचा हेतू असावा.

१ उ. डॉ. मिश्रा यांच्या तक्रारींकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष करणे : डॉ. मिश्रा यांनी वरिष्ठांवर अतिशय गंभीर आरोप केले. त्यांनी घडलेले सर्व प्रकार इस्रोचे माजी अध्यक्ष किरणकुमार यांना सांगितले; परंतु डॉ. कस्तुरी रंगन आणि माधवन् नायर यांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. इस्रोच्या वैज्ञानिकांनी अल्प पैशात टिकाऊ सिस्टीम विकसित केली, हे शत्रूंना आवडत नसावे, असे डॉ. मिश्रा यांचे म्हणणे आहे. या वेळी त्यांनी केंद्र सरकारला प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई यांच्या रहस्यमय मृत्यूची आठवण करून दिली.

२. डॉ. नम्बी नारायणन्, प्रसिद्ध वैज्ञानिक

२ अ. डॉ. नम्बी नारायणन् यांना खोट्या आरोपांमध्ये अडकवून त्यांची शैक्षणिक कारकीर्द कृत्रिमपणे संपवण्यात येणे : इस्रोचे प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. नम्बी नारायणन् यांना भोगाव्या लागलेल्या यातना आणि त्यांची झालेली मानहानी देशासाठी अपमानास्पद आहे. रशिदा मरियम् या मालदीवच्या विदेशी नागरिकेला केरळमध्ये अटक झाली. चौकशीमध्ये तिने डी. शशीकुमारन् यांच्यासह डॉ. नम्बी नारायणन् यांचेही नाव घेतले. त्यानंतर या दोन्ही शास्त्रज्ञांना अटक होऊन ५० दिवस कारागृहात रहावे लागले. त्या काळात त्यांची विविध अन्वेषण यंत्रणांकडून भयंकर चौकशी आणि छळ करण्यात आला.

प्रथितयश शास्त्रज्ञांना हे सर्व भोगावे लागते, याची कल्पनाही करवत नाही. हेरगिरीचा आरोप, तसेच विदेशी महिलेकडून शास्त्रज्ञांचा उल्लेख होणे, हा विषय अन्वेषण यंत्रणेला सहजपणे सोडून देता येत नाही. या प्रकरणामध्ये केरळ उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत पुष्कळ धावपळ झाली. शेवटी डॉ. नम्बी नारायणन् यांच्या विरुद्ध करण्यात आलेले हेरगिरीचे आरोप आणि फौजदारी खटला रहित झाला. यात एक ते दीड दशकाचा काळ निघून गेला. या कालावधीत डॉ. नारायणन् यांच्या कुटुंबियांचे प्रचंड हाल झाले. त्यांना अपमानाचा सामना करावा लागला. अशा पद्धतीने एका थोर शास्त्रज्ञाची शैक्षणिक कारकीर्द कृत्रिमपणे संपवण्यात आली.

२ आ. मानहानी झाल्यावर डॉ. नारायणन् यांच्या संदर्भात मानवी अधिकार हनन मंडळाने घेतलेली भूमिका : डॉ. नारायणन् यांची मानहानी झाल्याप्रकरणी मानवी अधिकार हनन मंडळाने सरकारला त्यांना १० लाख रुपये देण्याचा आदेश, तर सर्वोच्च न्यायालयाने डॉ. नारायणन् यांच्या मानहानीविषयी ५० लाख रुपयांची रक्कम हानीभरपाई म्हणून केरळ सरकारला देण्यास सांगितले. तसेच त्यांना केरळ सरकारच्या विरोधात स्वतंत्रपणे हानीभरपाई मागण्याचा अधिकारही दिला.

२ इ. केरळ सरकारची शास्त्रज्ञांविषयीची द्वेषपूर्ण भूमिका ! : डॉ. नारायणन् यांच्या छळवणुकीसाठी उत्तरदायी असलेल्या अन्वेषण अधिकार्‍यांच्या विरोधात फौजदारी खटले प्रविष्ट करण्याचा विषय सर्वोच्च न्यायालयासमोर आला. तेव्हा केरळ सरकारने त्या अधिकार्‍यांना पाठीशी घातले. सर्वोच्च न्यायालयाने हा विषय गांभीर्याने घेतला. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती डी. के. जैन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. ही समिती सर्व गोष्टींचा विचार करून अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांविरुद्ध फौजदारी खटले भरावेत कि नाही ?, हे ठरवणार आहे.

३. थोर वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई यांचा रहस्यमय मृत्यू 

३ अ. पद्मभूषण आणि पद्मविभूषण प्राप्त वैज्ञानिक डॉ. साराभाई यांचा अनैसर्गिक मृत्यू होणे क्लेशदायी ! : डॉ. तपन मिश्रा आणि डॉ. नम्बी नारायणन् या दोघांनीही थोर वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई यांच्या रहस्यमय मृत्यूचा हवाला दिला आहे. विक्रम साराभाई हे इस्रोचे ज्येष्ठ वैज्ञानिक होते. खगोलशास्त्रज्ञ किंवा अवकाश संशोधन शास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. ३१ डिसेंबर १९७१ या दिवशी पद्मभूषण आणि पद्मविभूषण प्राप्त वैज्ञानिक डॉ. साराभाई यांचा अवघ्या ५२ व्या वर्षी केरळातील कोवलाम् या समुद्रकिनार्‍याजवळ असलेल्या एका रिसॉर्टमध्ये अनैसर्गिक मृत्यू झाला. ही घटनाही अतिशय क्लेशदायी होती. डॉ. नम्बी नारायणन् यांनी त्यांच्या समवेत कनिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्य केले होते. ते त्यांच्या जीवनचरित्रात डॉ. साराभाई यांचा आदराने उल्लेख करतात, तसेच त्यांच्या रहस्यमय मृत्यूची बिनचूक आणि शास्त्रीय पद्धतीने चौकशी व्हावी, अशी आग्रहाने मागणी करतात.

३ आ. विक्रम साराभाई यांचा अनैसर्गिक मृत्यू होणे, हे मनाला न पटणारे ! : इस्रोमध्ये त्यांच्या समवेत कार्य करणारे पद्मनाभ जोशी म्हणतात की, ज्या विक्रम साराभाई यांना आयुष्यात सिगारेटचेही व्यसन नव्हते, त्यांचा अनैसर्गिकरित्या मृत्यू होतो, हे मनाला न पटणारे आहे. अणूऊर्जेमध्ये देशाने जी प्रगती केली, त्यात डॉ. साराभाई यांचा फार मोठा वाटा आहे.

३ इ. डॉ. साराभाई यांच्या मृत्यूविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित ! : टाइम्स ऑफ इंडियामध्ये ३०.१२.२००८ दिवशी लिहिले होते की, डॉ. विक्रम साराभाई यांच्या मृत्यूपूर्वी भारत न्युक्लिअर प्रोलिफरेशन करार करण्याच्या विचारात होता. त्याच काळात रशियन रॉकेट अवकाशात उडाले होते. यात आंतरराष्ट्रीय शक्तींचा किंवा रशियाचा हात आहे का ?, असा प्रश्‍न त्यांच्या मृत्यूविषयी उपस्थित केला होता.

४. थोर शास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा अपघाती मृत्यू

४ अ. डॉ. भाभा यांच्या मृत्यूमागे अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएचा हात असल्याची शक्यता ! : डॉ. होमी जहांगीर भाभा भारतीय अणू कार्यक्रमाचे जनक समजले जातात. त्यांचा जन्म वर्ष १९०९ मध्ये एका धनाढ्य पारशी अधिवक्त्यांच्या घरी झाला. पहिल्या जागतिक युद्धाच्या काळात ते विदेशात उच्च शिक्षणासह संशोधनाचे शिक्षण घेत होते. जानेवारी १९३९ मध्ये ते मायदेशी परतले. त्यानंतर जे.आर्. डी. टाटा यांनी स्थापन केलेल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत ते काही काळ प्राध्यापक राहिले. त्यांना वर्ष १९४२ मध्ये अ‍ॅडम्स पारितोषिक मिळाले. वर्ष १९५१ आणि १९५३ ते १९५६ या काळात त्यांचे भौतिकशास्त्राच्या नोबेल पारितोषिकासाठी नाव सुचवण्यात आले. वर्ष १९५४ मध्ये त्यांना पद्मभूषण देऊन गौरवान्वित करण्यात आले. जानेवारी १९६६ मध्ये डॉ. भाभा बोईंग ७०७ या विमानाने फ्रान्समधून व्हिएन्नाकडे जात असतांना त्यांच्या विमानात स्फोट झाला. असे म्हणतात की, भारताचा अणू संशोधन कार्यक्रम निष्फळ करण्यासाठी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने (सीआयएने) त्यांची हत्या घडवून आणली. यासंबंधीही डॉ. नम्बी नारायणन् यांनी ग्रेगरी डग्लस यांना दिलेल्या कन्व्हरसेशन विथ द क्रो या पुस्तकात रॉबर्ट क्राऊले यांचा हवाला दिला आहे.

५. वर्ष २००९ ते २०१३ या कालावधीत ११ भारतीय अणू शास्त्रज्ञांचे मृत्यू

वर्ष २००९ ते २०१३ या ४ वर्षांच्या काळात ११ भारतीय अणू शास्त्रज्ञांचे अनैसर्गिक मृत्यू झाले. या प्रकरणी वर्ष २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांनी शास्त्रज्ञांच्या जिवांची काळजी घ्या, अशी केंद्र सरकारला तंबी दिली. मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांनी व्यक्त केलेली चिंता निराधार नव्हती. वर्ष २००९ मध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ लोकनाथन् महालिंगम् हे सकाळी फिरायला गेल्यावर बेपत्ता झाले आणि ५ दिवसांनी त्यांचे शव काली नदीमध्ये मिळाले. त्याच काळात अणू संशोधन संस्थेतील एका शास्त्रज्ञाचा त्याच परिसरात मृत्यू झाला होता.

६. देशी किंवा विदेशी शक्तींचा सरकारने कठोरपणे निःपात करावा !

थोर शास्त्रज्ञांचे मृत्यू किंवा त्यांच्यावरील जीवघेणी आक्रमणे या गोष्टी निंदनीय आणि लाजिरवाण्या आहेतच; मात्र संशोधन कार्यात भारताने जो नावलौकिक मिळवला, त्या संदर्भात त्या अतिशय हानीकारक आहेत. त्यामुळे भारत सरकारने या क्षेत्रातील अडथळे दूर करून त्यांची सखोल चौकशी करावी. केंद्रशासन गेली ६ वर्षे प्रत्येक क्षेत्रात प्रचंड कार्यक्षमतेने कार्य करत आहे. शास्त्रज्ञांचे अनैसर्गिक मृत्यू हा विषय कदाचित त्यांच्या स्तरावर चौकशीचा असेलच, यात जनतेच्या मनात शंका नाही; परंतु यामागे देशातील किंवा विदेशातील शक्ती कार्यरत असतील, तर त्यांचा कठोरपणे निःपात करावा, असे वाटते.

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद आणि अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय. (१४.१.२०२१)