(म्हणे) ‘भारताकडून कालापानी, लिपुलेख आदी भाग परत घेणार !  

नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांची पुन्हा वल्गना !

जे भारताचेच भाग आहेत, त्यावर ओली चीनच्या चिथावणीमुळे दावा करत आहेत, हे आता जगाला ठाऊक झाले आहे. चीनला खुश करण्यासाठी ओली आता अशा प्रकारची विधाने करत आहेत. त्यामुळे नेपाळची जनता आणि भारत याला गांभीर्याने घेणार नाही, हेही ओली यांना ठाऊक असणार !

काठमांडू (नेपाळ) – भारताच्या कह्यात असलेले लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरी भाग नेपाळ परत घेणार, असे विधान नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी केले आहे. नॅशनल असेंब्लीच्या बैठकीत त्यांनी हे विधान केले. ओली यांनी यापूर्वीही अशा प्रकारची विधाने केले होती. ओली यांनी नेपाळमध्ये संसद भंग करून मध्यावधी निवडणुका लादून राजकीय अस्थिरता निर्माण केली आहे.

ओली यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप, वाढती बेरोजगारी आणि सरकारची अकार्यक्षमता यांवरून टीका होत असल्याने ते लपवण्यासाठी ओली भारतासमवतेच्या सीमावादाचे सूत्र उपस्थित करत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

ओली यांनी सांगितले की,

१. भारताकडून कूटनीतिक चर्चा करून हे तिन्ही भूभाग पुन्हा घेतले जातील. वर्ष १९६२ मध्ये भारत-चीनमध्ये झालेल्या युद्धानंतर भारतीय सैन्य या ठिकाणी तैनात करण्यात आले. नेपाळच्या शासकांनी या भागाला पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. सरकारने नवीन मानचित्र जारी केल्यानंतर अनेक जणांना त्रास झाला होता. याआधीचे सरकार भारताच्या अतिक्रमणाच्या विरोधात बोलण्यास धजावत नव्हते. आता मात्र सरकार या भूभागला पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

२. काही आठवड्यांआधी नेपाळच्या दौर्‍यावर आलेल्या भारताच्या आणि चीनच्या उच्च अधिकार्‍यांच्या दौर्‍याची चिंता करता कामा नये. भारतासमवेत आम्हाला संबंध चांगले ठेवायचे असून भारतासमोर नेपाळची भूमिका स्पष्टपणे मांडण्यात आली आहे.