हिंदू कधीही भारतविरोधी असू शकत नाहीत ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

नवी देहली – ‘माझ्या देशभक्तीचा उगम धर्मातून होतो. मी हिंदु म्हणून जन्माला आलो, म्हणजेच मी देशभक्त आहे. त्यासाठी वेगळे काही करण्याची आवश्यकता नाही’, असे म. गांधी यांचे मत होते. कोणताही हिंदु हा भारतविरोधी असू शकत नाही. तो हिंदु आहे, म्हणजे देशभक्त आहे. तो त्याचा मूलभूत स्वभाव आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे एका कार्यक्रमात व्यक्त केले. जे.के. बजाज आणि एम्.डी. श्रीनिवास यांच्या ‘दी मेकींग ऑफ ट्रू पॅट्रीयट बॅकग्राऊंड ऑफ गांधीजी हिंद स्वराज’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते.

सरसंघचालक पुढे म्हणाले की,

१. गांधी म्हणाले होते, ‘मी धर्माला समजून घेतल्यानंतरच चांगला देशभक्त होईल आणि लोकांना तसे सांगू शकेल. स्वराज्य समजण्यासाठी स्वधर्म समजणे आवश्यक आहे.’

२. हिंदु आहे, म्हणजे तो देशभक्त असणार. तो निद्रिस्त असू शकतो, त्याला जागे करायला हवे; पण कोणताही हिंदु भारतविरोधी असू शकत नाही.

गांधी यांनी इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारला नाही !

‘गांधी यांना त्यांच्या आफ्रिकेतील मुसलमान मालकाने, तसेच अनेक ख्रिस्ती सहकार्‍यांनी धर्मांतर करण्याचा आग्रह केला होता; मात्र गांधी यांनी तो आग्रह मानला नाही. त्यानंतर ते वर्ष १९०५ पासून समर्पित हिंदु बनले’, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. (‘गांधी यांनी हिंदूंची जितकी हानी हिंदु धर्मिय असतांना, तितकी ते ख्रिस्ती किंवा मुसलमान बनून करू शकले नसते’, असे हिंदूंना वाटल्यास आश्‍चर्य ते काय ? – संपादक)