हिदूंसाठी शिवप्रतापदिन म्हणजे दसरा-दिवाळी यांसारखाच सण ! – मोहन शेटे, संस्थापक अध्यक्ष, इतिहासप्रेमी मंडळ

‘शिवप्रतापदिना’च्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीकडून ‘शिवछत्रपतींचा अद्वितीय पराक्रम…अफझलखान वध’ ऑनलाईन कार्यक्रम

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

पुणे – रिचर्ड टेम्पल नावाचा ब्रिटिशांचा लेखक प्रतापगडाकडे पाहून म्हणतो की, इतिहास पालटणारा क्षण या गडावर झाला. अफझलखान चालून आल्यावर त्याने हिंदूंची मंदिरे फोडली. दुर्दैवाने अफझलखानाच्या सैन्यातील काही जन्महिंदू त्यांच्या डोळ्यांदेखत मंदिरे तुटतांना पहात होते. महाराजांना सह्याद्रीतून बाहेर काढण्यासाठी अफझलखानाने ही नीती वापरली. संकटावर स्वार होणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. अफझलखान वधातून देशाच्या निस्तेज हिंदु समाजाला एक विश्‍वास मिळाला. देवतांनाही पराक्रमाची पूजा आवडते. अशीच पूजा महाराजांनी केली. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, तो दिवस म्हणजे दिवाळी, तर श्रीरामाने रावणाचा वध केला, तो दिवस म्हणजे दसरा ! अफझलखानासारख्या दैत्याचा वध छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला, तो म्हणजे दसरा-दिवाळीसारखाच सण आहे, असे प्रतिपादन ‘इतिहासप्रेमी मंडळा’चे संस्थापक अध्यक्ष श्री. मोहन शेटे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘शिवप्रतापदिना’च्या निमित्ताने ‘शिवछत्रपतींचा अद्वितीय पराक्रम…अफझलखान वध’ या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध लेखक आणि हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनीही संबोधित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. चैतन्य तागडे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांसारखे हिंदूसंघटन झाल्यास हिंदु राष्ट्र साकार होईल ! – मोहन शेटे

श्री. मोहन शेटे

छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांनी संकटात धावून येणार्‍या मावळ्यांचे संघटन केले. त्याचप्रमाणे आपल्यालाही हिंदूंचे संघटन करता आले, तर हिंदु राष्ट्राचे स्वप्न साकार होईल, असे श्री. मोहन शेटे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रत्येक युद्ध अभ्यासण्यासारखे ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे

डॉ. सच्चिदानंद शेवडे

छत्रपती शिवाजी महाराजांनी कौटिल्याने सांगितलेले प्रकाश युद्ध आणि कूट युद्ध उपयोगात आणले. महाराजांनी भगवान श्रीकृष्णाच्या नीतीचाही उपयोग केला. अशी मोठी व्याप्ती असतांना आज मुलांना केवळ ‘गनिमी कावा’ एवढाच शब्द शिकवला जातो. गनिमी कावा म्हणजे शत्रूने केलेले कपटयुक्त आक्रमण ! यासाठीच महाराजांनी काव्याने युद्ध केले किंवा त्याला ‘युद्ध कौशल्य’ म्हटले पाहिजे. ‘आक्रमण हेच संरक्षणाचे सर्वोत्तम साधन असते’, हे भारत स्वातंत्र्यानंतर विसरला होता; पण वर्ष २०१४ नंतर भारताने आक्रमक युद्धाचा पवित्रा घेतला. त्यामुळेच आज पापस्तानाला (पाकिस्तानला) आणखी एका ‘सर्जिकल स्ट्राईक’ची भीती वाटत आहे. रणक्षेत्राचे अनुकूल आणि प्रतिकूल असे २ भाग आहेत. प्रतिकूल रणक्षेत्रात आपल्याला अनुकूल असलेल्या भागात शत्रूला आणून त्याचा वध करणे, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाच्या वधातून दाखवले. अशी अनेक प्रतिकूल परिस्थितीतील युद्धे छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध कौशल्याच्या बळावर जिंकली आहेत. त्यामुळे महाराजांचे प्रत्येक युद्ध अभ्यासण्यासारखे आहे.

छत्रपती शिवाजी महाराज मनामनांत आणि घराघरांत निर्माण व्हायला हवेत ! – सुनील घनवट

श्री. सुनील घनवट
  • संपूर्ण विश्‍वात गाजलेल्या युद्धांपैकी एक अफझलखान वध, हे महाराजांच्या युद्धनीतीचे वैशिष्ट्य आणि शौर्याचा आदर्श आहे. असे असले तरी आज अफझलखान वधाचे आणि शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याचे छायाचित्र लावण्यास विरोध केला जातो. या माध्यमातून महाराजांनी केलेला पराक्रम लपवण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे.
  • गोवा येथील मामलेदारांना २२ मार्च १६८८ या दिवशी पत्र पाठवतांना महाराजांनी त्यात ‘हे हिंदुराज्य जाहले’ असा उल्लेख केला आहे. असे असूनही सध्या शिवद्रोही, तथाकथित इतिहासकार मात्र ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हिंदवी नसून ते रयतेचे, धर्मनिरपेक्ष राज्य होते’, असे खोटे पसरवत आहेत, तर काही स्वयंघोषित इतिहासकार ‘सेक्युलर’ (निधर्मी) इतिहास मांडून हिंदूंचा बुद्धीभेद करतात.
  • इस्लामी आक्रांत्यांचे क्रौर्य सध्याच्या काळातही घडत आहे. मूर्तीभंजन, धर्मांतर, लव्ह जिहाद हे सर्वकाही इस्लामी राजवट आणले जाण्याचेच संकेत आहेत.
  • महाराजांनी ‘शिवशक’ कालगणना निर्माण केली. पाश्‍चिमात्यांचे अनुकरण झुगारून देऊन हिंदु कालगणनेप्रमाणे नूतन वर्ष गुढीपाडव्याला साजरे करायला हवे.
  • केवळ स्मरण करून नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराज मनामनांत आणि घराघरांत निर्माण व्हायला हवेत.
  • ज्या प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाची अवैध कबर बांधण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही ती का पाडली जात नाही ? याविषयी प्रशासनाने उत्तर द्यायला हवे.
  • तत्कालीन वन अधिकारी सरफरोज खान सांगतो, ‘‘शिवाजीने विश्‍वासघाताने अफझलखानाला मारले.’’ असा खोटा इतिहास आज सांगितला जात असून उद्या तो शिकवला जाऊ शकतो.
  • तसे न होण्यासाठी आणि शौर्याचा इतिहास निर्माण होण्यासाठी आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे हिंदु राष्ट्रासाठी पाऊल उचलणे आवश्यक आहे.

विशेष

  • शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे स्मरण करण्यासाठी समितीने केलेल्या आवाहनानुसार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
  • शिवप्रतापदिनाच्या दिवशी शिवप्रेमींनी ट्विटरवर ‘#ShivpratapDin’ हा ‘हॅशटॅग’ वापरून केलेला ‘ट्रेंड’ राष्ट्रीय स्तरावर दुसर्‍या क्रमांकावर होता.
  • कार्यक्रमाच्या आरंभी अफझलखानाच्या वधाविषयी एक व्हिडिओ दाखवण्यात आला. या वेळी अनेकांनी सामाजिक माध्यमांवर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हर हर महादेव’ या घोषणांचे संदेश पाठवले.
  • कार्यक्रमाच्या शेवटी हिंदु राष्ट्रासाठी कार्यरत रहाण्याची प्रतिज्ञा करण्यात आली.
  • हा कार्यक्रम फेसबूक आणि यू ट्यूब यांद्वारे ३७ सहस्र जणांनी प्रत्यक्ष पाहिला, तर १ लाख २ सहस्रांहून अधिक लोकांपर्यंत पोचला (रिच).

वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

श्री. अनिल धानोलकर – केंद्र सरकारने शिवरायांच्या आग्रा भेटीच्या मार्गाला ‘हिंदवी स्वराज्य मार्ग’ घोषित करावे.

श्री. अंकुश रेणके – स्वभाषा आणि हिंदु धर्म यांचा अभ्यास शाळेत शिकवायला हवा.