सातारा येथील शिवतीर्थावर ३५२ वा ‘शिवप्रतापदिन’ उत्साहात साजरा

सातारा, २१ डिसेंबर (वार्ता.) – हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रथम गडावर केलेल्या पराक्रमास आज ३५२ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त शहरातील शिवतीर्थावर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून पूजन करण्यात आले. नंतर उपस्थितांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ‘शिवप्रतापदिन’ उत्साहात पार पडला. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने आणि काळजी घेऊन पार पडला.

या वेळी भाजपचे नेते संतोषभाऊ जाधव, भाजपचे नगरसेवक विजय काटवटे, भाजपच्या सुनीशा शहा, दीपाली झाड, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष सतीशबापू ओतारी, सम्राट गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष नीलेश शहा आदी मान्यवरांसह ३० हून अधिक धारकरी उपस्थित होते. या वेळी प्रेरणामंत्र म्हणण्यात आला. या वेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.