पतंजलि, डाबर, झंडू, बैद्यनाथ आदी १३ मोठी आस्थापने मधाच्या नावाखाली साखरेचा पाक विकतात ! – सी.एस्.ई.चा दावा

पतंजलि आणि डाबर यांनी सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरन्मेंट चे आरोप फेटाळले !

डावीकडून सी.एस्.ई.च्या महासंचालक सुनिता नारायण

नवी देहली – संपूर्ण देशात विकल्या जाणार्‍या मोठ्या आस्थापनांच्या मधामध्ये भेसळ असते, असे ‘सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरन्मेंट (सी.एस्.ई.)’ या संस्थेच्या तपासणीतून समोर आल्याचा दावा या संस्थेने केला आहे. या भेसळीत डाबर, पतंजलि, झंडू, बैद्यनाथ, एपिस, हिमालय अशा मोठ्या आस्थापनांचा समावेश आहे. या मधामध्ये अशा साखरेच्या पाकाची (‘शुगर सिरप’ची) भेसळ केली जाते, जी आरोग्यासाठी अतिशय हानीकारक असते, असे या संस्थेने म्हटले आहे. या आस्थापनांंच्या मधात ७७ टक्क्यांपर्यंत भेसळ असल्याचे दिसून आले.

सी.एस्.ई.च्या महासंचालक सुनिता नारायण यांनी सांगितले की,

१. मधासंबंधीचा हा अहवाल भारत आणि जर्मनी यांच्या प्रयोगशाळेत झालेल्या एका अभ्यासावर आधारित आहे. त्यानंतर आम्हीही याविषयीची तपासणी केल्यावर देशातील सर्व प्रमुख ब्रँडच्या मधात अतिशय मोठ्या प्रमाणात भेसळ असल्याचे आम्हाला आढळून आले. या कालावधीत ७७ टक्के नमुन्यांमध्ये साखरेच्या पाकाची भेसळ आढळली. या साखरेच्या पाकाचा पुरवठा चीनमधील आस्थापन ‘अलीबाबा’ करत असल्याची माहिती आहे.

२. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘न्यूक्लियर मॅग्नेटिक रेजोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी’ (एन्.एम्.आर्.एस्.) चाचणीअंतर्गत मधाची तपासणी करण्यात आली. या चाचणीत १३ ब्रँड्सच्या मधापैकी सफोला, मार्कफेड सोहना आणि नेचर्स नेक्टर हे केवळ ३ ब्रँडच उत्तीर्ण होऊ शकले. मधातील अशा प्रकारची गंभीर भेसळ हे एक प्रकराचे ‘फूड फ्रॉड’ (अन्नातील घोटाळा) आहे. मधाची शुद्धता तपासण्यासाठी भारतीय मानकांद्वारे अशा प्रकारची भेसळ पकडणे सोपे नाही; परंतु चिनी आस्थापने अशा प्रकारचा साखरेचा पाक बनवतात, जे भारतीय मानकांद्वारे सहजपणे पकडले जाईल. ते आपल्या आरोग्यासाठी हानीकारक ठरत आहे.

३. कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी भारतीय नागरिक मधाचे अधिक सेवन करत आहेत. अशात भेसळयुक्त मधामुळे वजन आणि लठ्ठपणा अधिक वाढू शकतो. याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

भारतातून निर्यात केल्या जाणार्‍या मधाची एन्.एम्.आर्. चाचणी १ ऑगस्ट २०२० पासून अनिवार्य करण्यात आली आहे.

मध आस्थापनाच्या अपकीर्तीचा प्रयत्न ! – पतंजलि

पतंजलि आणि डाबर यांनी या चाचणीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. पतंजलीचे आचार्य बालकृष्ण यांनी अहवालावर आपली प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की, आम्ही १०० टक्के नैसर्गिक मध बनवतो. प्रक्रिया केलेल्या मधाला अधिक मान्यता मिळावी, यासाठी नैसर्गिकरित्या मध बनवणार्‍या आस्थापनांच्या अपकीर्तीचा हा प्रयत्न आहे.

चाचणीचा अहवाल प्रायोजित ! – डाबर आस्थापनाचा दावा

डाबरच्या प्रवक्त्याने म्हटले की, आमच्या आस्थापनाचे मध १०० टक्के शुद्ध आहे. तसेच जर्मनीमध्ये झालेल्या एन्.एम्.आर्. चाचणीतही ते यशस्वी ठरला होते. आमचे मध आम्ही ठरवलेले २२ मापदंड पूर्ण करते. नुकताच जो अहवाल समोर आला आहे, तो प्रायोजित असल्याचे वाटत आहे.