सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यातील मार्गदर्शनामुळे ‘मनाप्रमाणे व्हावेसे वाटणे’, या अहंच्या पैलूवर मात करता येणे 

‘२७.३.२०२० या दिवशी साधकांनी ५० किलो मोगरा अत्तर बाटल्यांत भरले आणि त्याची पुढील प्रक्रिया चालू होती. ‘बाटलीच्या खोक्यांवर ‘स्टॅम्प’ मारून खोके बनवणे, बाटल्या तपासून त्या खोक्यात घालून बंद करणे, तसेच बांधणीच्या खोक्यावर ‘स्टॅम्प’ मारून त्यांना ‘स्टेप्लर’ मारून ते बनवणे आणि त्या खोक्यात सिद्ध झालेल्या २४ बाटल्या भरून एक खोका सिद्ध करणे’, अशी सेवा चालू असतांनाच श्री. नारखेडे यांनी ‘केवडा अत्तर भरा’, असे सांगितले. तेव्हा ‘केवडा अत्तर भरायचे असल्याचे ठाऊक असतांनाही नारखेडेकाका पुनःपुन्हा सांगायला का येत आहेत ?’, असा विचार मनात आल्यावर मला ‘मनाप्रमाणे व्हावेसे वाटणे’ या अहंच्या पैलूची जाणीव झाली. माझी त्या प्रसंगात झालेली विचारप्रक्रिया येथे दिली आहे.

सद्गुरु राजेंद्र शिंदे

१. ‘स्वतःला जे वाटते, तेच योग्य आहे’, असा चुकीचा विचार केल्यावर ‘मनाप्रमाणे व्हावेसे वाटणे’, या अहंच्या पैलूची जाणीव होणे

‘पन्नास किलो मोगरा अत्तर सिद्ध करायचे आणि त्याच दिवशी केवडा अत्तरही भरून सिद्ध करायचे होते. सध्या केवडा अत्तराची मागणीही नाही आणि काही प्रमाणात केवडा अत्तराच्या बाटल्या आधीच दिल्या आहेत. त्यामुळे २५ किलो मोगरा अत्तराच्या बाटल्या सिद्ध करण्याऐवजी ५० किलो मोगरा अत्तराच्या बाटल्या सिद्ध करायच्या’, असा विचार माझ्या मनात होता. ‘वर्षअखेरही आहे. त्यामुळे ‘केवडा अत्तर भरायची घाई करायला नको’, असेही मला वाटत होते. ‘मला जे वाटत होते, तेच योग्य आहे’, असा विचार मी केल्याने मला माझ्या ‘मनाप्रमाणे व्हावेसे वाटणे’, या अहंच्या पैलूची जाणीव झाली. तेव्हा ‘त्यावर प्रयत्न करायचा’, असे मी ठरवले. ‘श्री. नारखेडेकाका ‘केवडा अत्तर भरा’, असे सांगत आहेत ना, तर ते भरायचे आणि त्यांच्या मताशी जुळवून घ्यायचे, म्हणजेच काकांच्या मताप्रमाणे करायचे’, असा मी विचार केला.

कु. महानंदा पाटील

२. ‘दळणवळण बंदीमुळे व्यवहार बंद रहाणार आहेत, केवडा अत्तर आताच भरल्यास थोडे फार उत्पादन सिद्ध होईल’, असा सहसाधकाचा विचार असावा’, हे लक्षात घेऊन केवडा अत्तर भरण्याच्या प्रक्रियेचा विचार होणे

‘आपत्कालीन परिस्थितीत दळणवळण बंदी असल्याने २१ दिवस सर्व व्यवहार बंद रहाणार आहेत. त्यामुळे आज दुपारी जेवढी मागणी सिद्ध होईल, तेवढी साधक घेऊन जाणार असतील. केवडा अत्तर आताच भरले, तर थोडे फार उत्पादन सिद्ध होईल. साधक अन्य अत्तराच्या बाटल्या नेण्यासाठी आल्यावर ते त्यांच्या समवेत केवडा अत्तराच्या बाटल्या घेऊन जाऊ शकतील’, असा नारखेडेकाकांचा विचार असेल; म्हणून ते केवडा अत्तर भरण्यास घाई करत असतील’, असा मी विचार केला.

३. सहसाधकाची तळमळ आणि नियोजन यांमुळे एकाच दिवशी मोगरा आणि केवडा या अत्तरांच्या बाटल्या सिद्ध होऊ शकणे

३ अ. ‘सहसाधकाच्या नियोजनाप्रमाणे कृती न केल्यास केवडा अत्तराच्या बाटल्या सिद्ध करायच्या राहू शकणार असणे : ‘नारखेडेकाकांना सेवेची तळमळ असल्याने ते पुनःपुन्हा केवडा अत्तराच्या बाटल्या सिद्ध करण्यास सांगत आहेत. त्यांच्या नियोजनाप्रमाणे केले नाही, तर कदाचित् केवडा अत्तराच्या बाटल्या सिद्ध करायच्या रहातील. केवडा अत्तराच्या बाटल्या सिद्ध नसल्यास त्या पाठवता येणार नाहीत. नंतर केवडा अत्तराच्या बाटल्या सिद्ध केल्यास त्या एखादा मास पडून रहातील, तर काय लाभ ?; म्हणून त्यांच्या नियोजनाप्रमाणे केले पाहिजे’, असा मी विचार केला.

३ आ. केवडा अत्तर भरण्यासाठी घाई झाली, तरी सेवेसाठी सिद्ध रहाणे आणि ‘मनाप्रमाणे व्हावेसे वाटणे’, या अहंच्या पैलूवर मात करून २० किलो केवडा अत्तर भरून सिद्ध करणे अन् सेवेच्या फलनिष्पत्तीमुळे देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होणे : ‘केवडा अत्तर भरण्यासाठी कितीही घाई झाली, तरी मी सेवेला सिद्ध राहीन’, असा विचार होऊन आणि नारखेडेकाकांनी सांगितल्याप्रमाणे केल्यामुळे ‘मनाप्रमाणे व्हावेसे वाटणे’, या अहंच्या पैलूवर मी मात करू शकले. त्या दिवशी २० किलो केवडा अत्तर भरून सिद्ध झाले. केवडा अत्तराच्या सिद्ध केलेल्या बाटल्या नेण्यासाठी थोड्या वेळाने साधक आले. त्या वेळी माझ्याकडून देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

४. सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यातील मार्गदर्शनामुळे स्वतःतील अहंच्या पैलूवर मात करू शकणे

सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याला जायला लागल्यामुळेच मला हे जमू लागले, म्हणजे मला ‘माझे स्वभावदोष आणि अहंच्या पैलूंवर मात करता येऊन सकारात्मक विचार कसा करायचा ? सकारात्मक कसे रहायचे ?’, ते शिकायला मिळाले. ‘सद्गुरु राजेंद्रदादा घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याला जाणे किती महत्त्वाचे आहे !’, हे माझ्या लक्षात आले.’

– कु. महानंदा गिरिधर पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.५.२०२०)