जिज्ञासू, अहं अल्प असलेले आणि प्रसिद्धीपराङ्मुख असे ठाणे येथील गायक श्री. प्रदीप चिटणीस यांचा साधनाप्रवास !

जिज्ञासू, अहं अल्प असलेले आणि प्रसिद्धीपराङ्मुख ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे ठाणे येथील गायक श्री. प्रदीप चिटणीस यांचा साधनाप्रवास !

१.३.२०२० या दिवशी श्री. प्रदीप चिटणीस, ठाणे, महाराष्ट्र यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे घोषित करण्यात आले. ते मागील २ वर्षे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’अंतर्गत संगीत कलेच्या संशोधनकार्यात तळमळीने सहभागी होत आहेत. किंबहुना त्यांच्यातील साधेपणा आणि निर्मळता यामुळे ‘ते आश्रमातीलच एक आहेत’, असे वाटते.

श्री. प्रदीप चिटणीस हे मागील ३५ वर्षे संगीत साधना करत आहेत. त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी ते संगीताचे वर्ग घेतात. श्री. प्रदीप चिटणीस यांचे गायन भावसागरात डुंबवणारे आहे. कलाकार म्हटले की, त्याला प्रसिद्धी आणि पैसा लवकरात लवकर कमावण्याचा ध्यास असतो; परंतु श्री. प्रदीप चिटणीस यांनी प्रथमपासूनच त्यापासून दूर रहाण्यास प्राधान्य दिले आणि त्यामुळे आज त्यांचे संगीत ईश्‍वरचरणी रुजू झाले. यामागे ईश्‍वरी आशीर्वादासह त्यांना लाभलेले योग्य गुरूंचे मार्गदर्शन हेही कारणीभूत आहे. श्री. प्रदीप चिटणीस यांनी केलेले प्रयत्न, त्यांचा संगीत साधनेला झालेला आरंभ, गुरुभेटीची असणारी त्यांची तळमळ आणि त्यांना गुरूंनी केलेले मार्गदर्शन यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.         

(भाग १)

गायन सेवा सादर करतांना श्री. प्रदीप चिटणीस (उजवीकडे) आणि तबला वादन करतांना श्री. गिरीजय प्रभुदेसाई

१. संगीत साधनेचा आरंभ

१ अ. ‘दृष्टी जन्मतःच अधू असल्याने अभ्यास झेपणार नाही’, असा विचार करून आईने संगीत शिकायला पाठवायचे ठरवणे : ‘मी ३ वर्षांचा असल्यापासून माझे कान अतिशय तीक्ष्ण होते. मी आतल्या खोलीत बसून ‘बाहेरच्या खोलीत कोण आले आहे ?’, हे केवळ पावलांच्या आवाजावरून ओळखत असे. माझी दृष्टी जन्मतःच अधू असल्याने आईला माझ्या भविष्याची काळजी असायची. शाळेत गेल्यावर माझा डोळ्यांचा त्रास पुष्कळ वाढला. त्यामुळे आई ‘मला अभ्यास झेपेल कि नाही’, याविषयी साशंक होती. माझी आई संगीत शिकली नव्हती; परंतु ती गाणे चांगले म्हणायची. ‘मला पुढे अभ्यास झेपेल कि नाही’, असा विचार करून माझ्या आईने मला संगीत शिकवायला पाठवायचे ठरवले आणि माझी संगीतातील वाटचाल चालू झाली.

१ आ. संवादिनी (पेटी) आणि गायन शिकवणार्‍या श्रीमती लीलाताई शेलार यांच्याकडे संवादिनी शिकायला जाणे : माझ्या आईला ‘व्हायोलिन’ हे वाद्य फार आवडायचे. त्यामुळे आईने मला ‘व्हायोलिन’ शिकवणारे ठाणे येथील श्री. भास्कर फाटकगुरुजींकडे नेले. तेव्हा मी इयत्ता पाचवी इयत्तेत शिकत होतो. एकदम ‘व्हायोलिन’ शिकणे अवघड आहे; कारण ‘व्हायोलिन’वर संवादिनी(पेटी) सारख्या पट्टया नसतात. स्वरांचा अंदाज घेऊन बोटे ठेवावी लागतात. त्यामुळे स्वरज्ञान होण्यासाठी थोडी संवादिनी (पेटी) शिकणे आवश्यक आहे; म्हणून गुरुजींनी मला प्रथम ६ मास (महिने) संवादिनी शिकण्यास सांगितले. माझ्या आईने मला संवादिनी आणि गायन शिकवणार्‍या श्रीमती लीलाताई शेलार यांच्याकडे नेले. मला घरी सराव करता यावा; म्हणून वडिलांनी संवादिनी घेऊन दिली.

१ इ. श्रीमती शेलारबाईनी माझा आवाज चांगला असल्याने मला गायन शिकवण्यास सांगणे : माझ्या आईला संगीताची आवड होती आणि वडिलांचा संगीताला पूर्ण पाठिंबा होता; परंतु मला संगीतापेक्षा क्रिकेट खेळण्याची प्रचंड आवड होती. श्रीमती शेलारबाई यांच्या संगीतवर्गाला आई मला बळजोरीने पाठवायची; म्हणून मी नियमित जात असे. मी कधीच सराव केला नाही. श्रीमती शेलारबाई पुष्कळ प्रेमळ होत्या. मी सराव केला नाही, तरी त्या ओरडत नसत. सहा मासांनी (महिन्यांनी) माझी आई श्रीमती शेलारबाईना संवादिनी शिकवण्याविषयी विचारायला गेली असता त्यांनी आईला माझा आवाज चांगला असल्याने मला गायन शिकवण्यास सांगितले.

१ ई. श्री. सुधीर मुजुमदार यांनी घरी येऊन २ – ३ घंटे स्वरांचा चांगला रियाज करून घेणे : माझ्या वडिलांचे मित्र ‘ऑल इंडिया रेडिओ’वर शास्त्रीय गायन करणारे श्री. सुधीर मुजुमदार मुंबईला रहायचे आणि ते आमच्या घरी येऊन २ – ३ घंटे माझा स्वरांचा चांगला रियाज करून घेत असत; परंतु मला सरावाचा कंटाळा येत असल्यामुळे मी श्री. मुजुमदारकाकांना चुकवून दुसरीकडे जायचो. अशा प्रकारे माझी ४ वर्षे गेली.

१ उ. शास्त्रीय संगीतातील तज्ञ डॉ. (सौ.) चारुशीला दिवेकर यांनी ‘याची बोटे लांब सडक असल्याने याला गायनापेक्षा तबला शिकायला पाठवा, हा लवकर प्रगती करील’, असे सांगणे : आमच्या घराजवळ श्री. सुबंध म्हणून रहात होते. त्यांच्याकडे एकदा संगीतातील अतिशय तज्ञ व्यक्ती डॉ. (सौ.) चारुशीला दिवेकर आल्या होत्या. त्यांनी शास्त्रीय संगीतात ‘पी.एच.डी’ केली होती. सुबंधकाकूंनी माझी त्यांच्याशी भेट घालून दिली. तेव्हा मी त्यांना संवादिनीवर गायन करून दाखवले. त्यांनी ‘याची बोटे लांबसडक आहेत. याला तबला शिकायला पाठवा. हा लवकर प्रगती करील’, असे सांगितले. याचा आई-वडिलांनाही आनंद वाटला. (एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले मला म्हणाले होते, ‘‘तुमची बोटे केवढी लांब आहेत !’’ तेव्हा मला आत्मचरित्र लिहिण्याची इच्छा झाली.)

१ ऊ. संगीत शिकण्यातले गांभीर्य कळू लागल्याने आणि लेलेगुरुजींची शिकवण्याची पद्धत फार चांगली असल्याने ‘तबला’ हे वाद्य अधिक आवडू लागणे : डॉ. (सौ.) दिवेकर यांनी सुचवल्याप्रमाणे मी तबला शिकण्यासाठी ठाण्यातील श्री. वसंत लेलेगुरुजींकडे जाऊ लागलो. त्या वेळी मी इयत्ता नववीत शिकत होतो. मला संगीत शिकण्यातले गांभीर्य कळू लागल्याने आणि लेलेगुरुजींची शिकवण्याची पद्धत फार चांगली असल्याने मला ‘तबला’ हे वाद्य अधिक आवडू लागले. (एखाद्या विषयात गोडी निर्माण करण्यात गुरूंचा मोठा सहभाग असतो.)

१ ए. सुप्रसिद्ध तबलावादक पंडित सुधीर संसारे यांच्याकडे तबला शिकायला जाणे आणि डोळ्यांना फारच त्रास होऊ लागल्याने अभ्यास करणे झेपेनासे होऊन शिक्षणाला विराम देणे अन् यापुढे ‘संगीत क्षेत्रात प्रगती करायची’, हेच ध्येय ठेवणे : यानंतर मी देहली-फारुखाबाद घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक पंडित सुधीर संसारे यांच्याकडे तबला शिकायला जाऊ लागलो. मी प्रतिदिन ५ घंटे तबल्याचा सराव करायचो. प्रतिदिन ५ घंटे सतत सराव केल्याने रात्री माझ्या हातांची बोटे सुजायची. बोटांना आंबेहळद लावून मी पुन्हा दुसर्‍या दिवशी सराव करायचो. अशा पद्धतीने माझा सराव चालू झाला. मी इयत्ता बारावीत शिकत असतांना मला डोळ्यांचा फारच त्रास होऊ लागला. मला अभ्यास करणे झेपेनासे झाले. आई-वडिलांचा पाठिंबा असल्याने मी शिक्षणाला विराम दिला आणि यापुढे ‘संगीत क्षेत्रात प्रगती करायची’, हेच ध्येय म्हणून ठरवले.

२. गायक होण्याचा निश्‍चय करणे

२ अ. मित्राच्या आजोबांनी ‘तुला आवाजाची ईश्‍वरी देणगी आहे. ही सर्वांनाच मिळत नाही. तबला काय कुणीही सराव करून वाजवील, तू गाण्यावर लक्ष केंद्रित कर’, असे सांगितल्यावर त्यांचे शब्द हृदयात पक्के बसणे आणि गायक होण्याचा निश्‍चय करणे : त्या वेळी मी गायकांना तबल्यावर साथसंगत करत असे. त्यांचे गायन ऐकून मला गाण्यात रुची वाटू लागली. विशेष म्हणजे महंमद रफी यांची गाणी मला अतोनात आवडायची. ती ऐकून माझे मन गाण्याकडे वळायला लागले. त्या वेळी गणेशोत्सवात घरोघरी गाण्याच्या मैफली होत. माझ्या एका मित्राकडे अशीच एक मैफल जमली होती. त्या मैफलीत मी अनेक जणांना तबल्याची साथ दिली, तसेच मी शेलारबाईंनी (मला गाणे शिकवणार्‍या बाई) शिकवलेला ‘यमन’ रागही गायलो. माझ्या मित्राचे आजोबा चांगल्यापैकी संगीत जाणणारे होते. माझे गाणे आजोबांनी घराच्या आगाशीतून ऐकले आणि गाणे झाल्यावर आत येऊन ते म्हणाले ‘‘तुला आवाजाची ईश्‍वरी देणगी आहे. ही सर्वांनाच मिळत नाही. तबला काय कुणीही सराव करून वाजवील. तू गाण्यावर लक्ष केंद्रित कर.’’ आजोबांचे हे शब्द माझ्या हृदयात पक्के बसले. तबला आणि गायन हे स्वतंत्र विषय आहेत. एकेका वाद्यासाठी अथवा गायनासाठी अनेक मान्यवर कलाकारांनी आयुष्य खर्च केले आहे. आजोबांचे सांगणे आणि महंमद रफी यांची गाणी या सर्वांमुळे मी ‘गायक व्हायचे’, असे मनाशी ठरवले.

२ आ. गायनाविषयी प्रचंड तळमळ असल्याने मन लावून गाणे शिकणे : माझ्या आईला ‘मी गायनच शिकणार आहे’, हे सांगितल्यावर तिलाही पुष्कळ आनंद झाला. मी सौ. दिवेकरबाईंकडे (ज्यांनी मला तबला शिकायला सांगितले होते) गायन शिकायला गेलो. त्यांनीही ‘तुझी इच्छा असेल, तर मी शिकवीन’, असे म्हणून गाणे शिकवण्यास होकार दर्शवला आणि मी दिवेकरबाईंकडे गाणे शिकायला जाऊ लागलो. मला गायनाविषयी प्रचंड तळमळ असल्याने मी मन लावून गाणे शिकू लागलो आणि मेहनत करू लागलो.

२ इ. वयात आल्याने आवाज बिघडू लागणे, ‘होमिओपॅथी’ औषधे चालू केल्यावर एक – दीड वर्षात आवाज मूळ पदावर येणे आणि गायन, संवादिनी(पेटी) अन् तबला हे तीनही शिकून त्यामध्ये ‘संगीत विशारद’ ही पदवी मिळवणे : मी वयात आल्यावर माझा आवाज बिघडू लागला. (वयात आल्यावर मुलांचे voccal cords पालटतात. त्यामुळे त्यांच्या आधीच्या आवाजात पालट होतो. या कालावधीत योग्य उपाययोजना न केल्यास गायकाचा आवाज बिघडण्याचा धोका असतो.) त्यामुळे मी निराश झालो. मला कष्ट करण्याची तळमळ होती; परंतु मला आवाज साथ देत नव्हता. मी पुष्कळ पुस्तके वाचल्यावर शेवटी एका पुस्तकात माझ्या लक्षणांशी तंतोतंत जुळणारी ‘होमिओपॅथी’ची औषधे मिळाली. ती मी चालू केली आणि पहाटे चार वाजता उठून नियमित मंद्र साधना (खर्जातल्या स्वरांचा सराव) चालू केली. एक – दीड वर्षात माझा आवाज मूळ पदावर आला. मी गायनासह  तबलावादनही शिकत होतो. गायन, संवादिनी आणि तबला हे तीनही शिकून त्यामध्ये मी ‘संगीत विशारद’ ही पदवी मिळवली.

२ ई. त्यानंतर मी मुंबई महाविद्यापिठातील ग्वाल्हेर घराण्याचे गायक पंडित जाल बालपोरीया यांच्याकडे ३ वर्षे शिकून पदवीधर झालो.

२ उ. तबल्याशी झटापट असणार्‍या लयप्रधान गाण्यांपेक्षा शांत आलापी असलेले, स्वरप्रधान, भावनाप्रधान गाणे अधिक आवडू लागणे आणि मी शांत, स्वरप्रधान, भावनाप्रधान गायन शिकायचे ठरवणे : मी गायन-वादन शिकत असतांना नामवंत कलाकारांचे गायनाचे मोठे-मोठे कार्यक्रम ऐकत असे; कारण ‘गाण्याच्या मैफिली ऐकणे’, हा संगीत शिक्षणातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. संगीताची साधना गुरूंचे मार्गदर्शन, स्वतःचा सराव, मनन, चिंतन, संगीताविषयीचे वाचन, तसेच संगीत श्रवण, अशा सर्व प्रकारे करावी लागते. ‘नामवंत कलाकारांच्या गायन वादनातून आपल्याला नेमके काय आवडते ? काय झेपू शकेल ?’, याचा मी अभ्यास करू लागलो. या अभ्यासातूनच मला तबल्याशी झटापट असणार्‍या लयप्रधान गाण्यापेक्षा शांत आलापी असलेले, स्वरप्रधान आणि भावनाप्रधान गाणे अधिक आवडू लागले. मी शांत, स्वरप्रधान, भावनाप्रधान गायन शिकायचे ठरवले. उस्ताद आमीर खान, पंडित जसराज, पंडित भीमसेन जोशी, डॉक्टर प्रभा अत्रे यांची गायकी भावनाप्रधान असल्याने त्यांनी गायलेली गाणी मला आवडत असत.

२ ऊ. परीक्षेच्या दृष्टीने वरवरचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यापेक्षा गायकी पद्धतीने सखोल अभ्यास करण्यासाठी गुरूंच्या शोधात रहाणे : दिवेकरबाईंकडे माझे संगीताचे शिक्षण चालू होते; पण ते परीक्षांच्या दृष्टीने होते. ‘संगीत क्षेत्रात परीक्षा पद्धतीने शिक्षण आणि गायकी पद्धतीने शिक्षण’, असे दोन भिन्न प्रकार आहेत. परीक्षा-पद्धतीत शिक्षण फार वरवरचे असते; कारण तेथे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा अट्टाहास केला जातो. याउलट गायकी-पद्धतीत एकेक राग सखोलपणे शिकता येतो. त्यामुळे एकेक रागाचा सखोल अभ्यास होतो. गळा चांगला सिद्ध होतो. थोडक्यात म्हणजे ‘एक साधे सब साधे, सब साधे, सब जाए ।’ त्यामुळे मी असे गाणे शिकवणार्‍या गुरूंच्या शोधात होतो. मला गुरुभेटीची तळमळ लागून राहिली होती. मला जो भेटेल, त्याला मी ‘असे गुरु कुठे मिळतील ?’, याविषयी विचारत असे. ठाण्यातीलच एक संगीत शिक्षक श्री. यशवंत वैद्य यांनी मला अपेक्षित असे गाणे शिकवणार्‍या एका गुरुजींविषयी सांगितले. ते गुरुजी प्रत्येक शनिवारी ठाण्यात एका बाईंना (सौ. कुंदा कुलकर्णी यांना) गाणे शिकवायला यायचे. ‘त्यांच्याकडे आपण जाऊन पाहूया’, असे म्हणून वैद्यकाका मला त्या बाईंकडे घेऊन गेले. (त्या काळी दूरभाष ठराविक लोकांकडेच असत, भ्रमणभाष तर नव्हतेच.)

३. गुरुभेट

३ अ. गुरुजींचे उंच, धिप्पाड व्यक्तीमत्त्व, शांत, सात्त्विक भाव आणि संथ लयीत चाललेली धीरगंभीर आलापी ऐकूनच स्वर्गीय आनंदाची प्राप्ती झाल्यासारखे जाणवणे अन् त्या वेळी ‘आपल्याला गुरु मिळाले’, अशी आतूनच जाणीव होणे : मी वैद्यकाकांसह ठरल्याप्रमाणे एका शनिवारी सौ. कुंदा कुलकर्णी यांच्याकडे गेलो. तेथे पहिल्या माळ्यावर शिकवणी चालू होती. मी पायर्‍या चढतांनाच संथ आणि सुरेल स्वर माझ्या कानी पडले. तेव्हाच मला सकारात्मक स्पंदने जाणवली. पंडित राजाराम शुक्ल सौ. कुंदाताई यांना शिकवत होते. गुरुजींचे उंच, धिप्पाड व्यक्तीमत्त्व, तोंडवळ्यावरचे शांत सात्त्विक भाव आणि संथ लयीत चाललेली धीरगंभीर आलापी ऐकूनच मला स्वर्गीय आनंदाची प्राप्ती झाल्यासारखे जाणवले. त्या वेळी ‘मला गुरु मिळाले’, अशी आतूनच मला जाणीव झाली. माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या; कारण मला जे शिकायची तळमळ होती, तसेच गाणे तेथे चालू होते; पण एकीकडे मला ‘माझ्यासारख्या सामान्य मुलाला पंडीतजी शिकवतील का ?’, याचा ताणही होता. त्यामुळे मी आराध्य दैवत श्री गणेशाचे नामस्मरण चालू केले.

३ आ. गुरुजींनी संगीत शिकवण्यास होकार दिल्यावर ‘हवे असलेले ऋषितुल्य गुरु मिळाले’, याचा अपार आनंद होणे : दोन घंट्यांनी कुंदाताईंची शिकवणी संपल्यावर पं. शुक्लगुरुजींनी वैद्यकाकांना ओळखून त्यांची विचारपूस केली. तेव्हा वैद्यकाकांनी ‘मला गायन शिकायचे आहे’, असे सांगितले. गुरुजींनी मला गाणे म्हणून दाखवण्यास सांगितले. तेव्हा मी एक राग गायला. माझे गायन गुरुजींना आवडले. विशेष म्हणजे मला ‘उस्ताद अमीर खाँ ’ साहेबांची गायकी आवडत असल्याचे कळल्यावर गुरुजी आणखी आनंदी झाले आणि त्यांनी मला संगीत शिकवण्यास होकार दिला. ‘हवे असलेले ऋषितुल्य गुरु मिळाले’, याचा मला अपार आनंद झाला. पं. राजाराम शुक्ल यांच्याकडे माझी संगीताची तालीम चालू झाली.

३ इ. शांत आणि प्रेमळ स्वभावाचे पं. राजाराम शुक्ल ! : गुरुजी मला फार प्रेमाने शिकवत. मी त्यांना कधीच रागावलेले पाहिले नाही. माझी चूक झाल्यास ‘बेटा नहीं समझे ? फिर समाझाता हूं ’, असे म्हणून ते मला प्रेमाने समजवायचे.

३ ई. सौ. कुंदाताईंकडे संगीत शिक्षण चालू असतांना ‘अजून शिकावे’, असे वाटून पुढे गुरुजींच्या घरी जाऊ लागणे आणि त्यांचे गंडाबंधन (संगीतशास्त्रातील एक विधी) करायचे ठरवणे : पं. राजाराम शुक्ल यांच्या म्हणण्यानुसार कुंदाताई यांच्या घरी माझे संगीत शिक्षण चालू झाले. गुरुजींनी ‘यमन’ राग शिकवायला आरंभ केला. सौ. कुंदाताई यांच्याकडे ते आठवड्यातून एकदाच येत असत; परंतु तेवढ्या शिकवण्याने माझे समाधान होत नव्हते. मला ‘अजून शिकावे’, असे वाटत होते. त्यामुळे मी गुरुजींच्या घरी जाऊ लागलो. मला ‘पं. राजाराम शुक्ल यांचे गंडाबंधन करावे’, असे मनापासून वाटू लागल्याने मी त्यांना ‘गंडाबंधन’ करायचे ठरवले.

३ उ. संगीत क्षेत्रातील ‘गंडाबंधन’ विधी : ‘गंडाबंधन’ हा संगीत क्षेत्रातला अतिशय महत्त्वाचा धार्मिक विधी आहे. तो पुरोहितांकडून केला जातो. त्यात गुरूंचे विधिवत पूजन केले जाते. गुरुजी-शिष्याच्या मनगटाला काळा-लाल दोरा म्हणजेच गंडा बांधतात. गुरु-शिष्य एकमेकाला चणे आणि गूळ भरवतात. (याचा अर्थ आहे, ‘संगीत साधना ही लोखंडाचे चणे चावण्याएवढी कठीण आहे; पण कठोर साधना केली, तर त्याचे मिळणारे फळ हे गुळासारखे गोड आहे.’)

३ ऊ. पं. शुक्लगुरुजी प्रसिद्धीपराङ्मुख असल्याने त्यांना लोकांच्या टाळ्या घेण्यासाठी गाण्यात तडजोड केलेली आवडत नसणे, त्यांचे कलाकार म्हणून नाव नसल्याने अनेकांनी त्यांच्या नावाचा फेरविचार करण्यास सांगूनही त्यांनाच गंडाबंधन करण्याचे ठरवणे : पं. शुक्लगुरुजींचे मी गंडाबंधन करण्याचे ठरवले. त्या वेळी काही लोकांनी मला त्यांचे कलाकार म्हणून नाव नसल्याने फेरविचार करण्याविषयी सुचवले; परंतु मी त्यांची योग्यता ओळखली होती. मी प्रसिद्धीपराङ्मुख होतो. त्यांचे गाणे, म्हणजे ‘ध्यान लावणे’ असायचे. ते डोळे मिटून गायचे. ‘समोर कोण बसले आहे, कोण दाद देत आहे, कोण टाळ्या वाजवत आहे’, याचे त्यांना भान नसायचे. ते ‘तारन तरन हरि ओम् अनंत नारायण’ या मंत्राने आरंभ करत आणि ते एकेक स्वराचा संथपणे विस्तार करत. त्यांना लोकांच्या टाळ्या घेण्यासाठी गाण्यात तडजोड केलेली खपत नसे. त्यांचे गाणे ही त्यांची समाधी अवस्था असायची.

३ ए. गंडाबंधन विधी विधीवत पार पडणे : ते मला नेहमी म्हणायचे, ‘‘बेटा, हमारी मंदिर की परंपरा है । हमारी परंपरा के गायक, भगवान श्रीकृष्ण के मंदिरों में ही गाया करते थे । हमारी परंपरा के भगवान (कुलदेवता) श्रीकृष्ण ही हैं ।’ मी गंडाबंधनाचा मोठा समारंभ केला. अनेक मान्यवर कलाकार या समारंभाला उपस्थित होते. मी आजपर्यंत ज्यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले होते, त्या सर्व गुरुजनांचा सन्मान केला. अशा प्रकारे माझा गंडाबंधन विधी विधीवत पार पडला.

३ ऐ. गंडाबंधन विधीमधील काही महत्त्वाची सूत्रे

१. गंडाबंधन झाल्यावर गुरूने शिष्याला मुलाप्रमाणे मानायचे असते आणि त्याच्यापासून कोणतीही विद्या लपवून ठेवायची नाही.

२. शिष्याचेही ‘गुरुजींना वडिलांप्रमाणे मानायचे आणि उतारवयात वडिलांप्रमाणे त्यांची सेवा करायची’, हे कर्तव्य असते.

३. हा समारंभ चार कलाकारांच्या साक्षीने केला जातो. ओळखीच्या लोकांना निमंत्रण दिले जाते. याचा हेतू म्हणजे शिष्याने आपल्या गुरूंचे नाव कुणापासूनही लपवू नये. (पुष्कळ वेळा गुरु शिकवण्याचे कष्ट घेतात आणि नाव तिसर्‍याचेच सांगितले जाते. तो तिसरा म्हणजे एखादा नामवंत कलाकार असतो; कारण शिष्याला त्याच्या नावाचा लाभ उठवायचा असतो. त्याच्या नावाचा शिष्याला कार्यक्रम मिळवण्यासाठी उपयोग होतो.)

४. शुक्लगुरुजींच्या मार्गदर्शनाखाली संगीत साधना

४ अ. गुरुजींच्या गावी गेल्यावर मोकळ्या वातावरणात स्वरसाधना करण्याचा आनंद मिळणे : गंडाबंधन झाल्यावर माझे गुरुजींशी असलेले नातेच पालटले. मी प्रतिदिन गुरुजींकडे गाणे शिकण्यासाठी जाऊ लागलो. मी गुरुजींसमवेत त्यांच्या ‘सुरतानपूर’ नावाच्या खेडेगावातील घरीही रहायला गेलो. (‘सुरतानपूर, तालुका बदलापूर, जिल्हा जौनपूर, उत्तरप्रदेश) या गावाचे नामकरण गुरुजींनीच केले होते. गुरुजींचे घर पुष्कळ मोठे होते. त्या गावात वीजही नव्हती. काळोख पडल्यावर सर्व कामे कंदिलाच्या प्रकाशात चालायची. तेथे सर्व जण अंगणात खाटेवर झोपत असत. रात्रीच्या काळोखात खाटेवर बसून सराव चालायचा. मोकळ्या वातावरणात स्वरसाधना करण्याचा आनंद मिळत होता.

४ आ. गुरुजींनी प्रतिदिन ८ घंटे सराव करवून घेणे, ३ वर्षे भैरव राग शिकणे आणि या ३ वर्षांत गुरुजींनी गायकीची संपूर्ण पद्धत शिकवणे : गुरुजी पहाटे ४.३० वाजता उठत. त्यांचा प्रतिदिन एक नेम असायचा. ते सकाळी उठल्यावर खाटेवरून उतरण्यापूर्वीच खाटेवर बसून भैरव रागातील ‘प्रभू दाता सबनके’ ही बंदिश १५ ते २० मिनिटे आळवून म्हणत. त्यांच्या स्वरांनी मला जाग यायची. अंथरुणात पडून त्यांचे ते गाणे ऐकण्यात मला वेगळाच आनंद मिळायचा. गुरुजी खाटेवरून खाली उतरल्यावर मी प्रातर्विधी उरकून सरावाला बसत असे. गुरुजी कधी समोर बसून, तर कधी ये-जा करत मला शिकवायचे. सकाळी ५ ते ९, दुपारी ४ ते सायंकाळी ६ आणि रात्री १ घंटा, असा ६ – ७ घंटे माझा सराव होत असे. सतत दीड मास (महिना) असे चालू होते. गुरुजींनी मला ‘यमन राग’ जवळ जवळ ३ वर्षे शिकवला. या ३ वर्षांत गुरुजींनी मला गायकीची संपूर्ण पद्धत शिकवली. त्यानंतर त्यांनी मला १ वर्ष ‘भैरव’ राग शिकवला. मग मला अन्य राग पटापट आत्मसात झाले. गुरुजी म्हणायचे ‘‘सवेरे ४ घंटे राग भैरव और शामको ४ घंटे राग यमन का अभ्यास करो, एकदम तैयार हो जाओगे ।’’

(क्रमश: उद्याच्या अंकी)

– श्री. प्रदीप चिटणीस, ठाणे, महाराष्ट्र. (२०.३.२०२०)


भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/425148.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक