जिज्ञासू, अहं अल्प असलेले आणि प्रसिद्धीपराङ्मुख असे ठाणे येथील गायक श्री. प्रदीप चिटणीस यांचा साधनाप्रवास !

जिज्ञासू, अहं अल्प असलेले आणि प्रसिद्धीपराङ्मुख ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे ठाणे येथील गायक श्री. प्रदीप चिटणीस यांचा साधनाप्रवास !

श्री. प्रदीप चिटणीस

१.३.२०२० या दिवशी श्री. प्रदीप चिटणीस, ठाणे, महाराष्ट्र यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे घोषित करण्यात आले. ते मागील २ वर्षे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’अंतर्गत संगीत कलेच्या संशोधनकार्यात तळमळीने सहभागी होत आहेत. किंबहुना त्यांच्यातील साधेपणा आणि निर्मळता यामुळे ‘ते आश्रमातीलच एक आहेत’, असे वाटते.

श्री. प्रदीप चिटणीस हे मागील ३५ वर्षे संगीत साधना करत आहेत. त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी ते संगीताचे वर्ग घेतात. श्री. प्रदीप चिटणीस यांचे गायन भावसागरात डुंबवणारे आहे. कलाकार म्हटले की, त्याला प्रसिद्धी आणि पैसा लवकरात लवकर कमावण्याचा ध्यास असतो; परंतु श्री. प्रदीप चिटणीस यांनी प्रथमपासूनच त्यापासून दूर रहाण्यास प्राधान्य दिले आणि त्यामुळे आज त्यांचे संगीत ईश्‍वरचरणी रुजू झाले. यामागे ईश्‍वरी आशीर्वादासह त्यांना लाभलेले योग्य गुरूंचे मार्गदर्शन हेही कारणीभूत आहे. श्री. प्रदीप चिटणीस यांनी केलेले प्रयत्न, त्यांचा संगीत साधनेला झालेला आरंभ, गुरुभेटीची असणारी त्यांची तळमळ आणि त्यांना गुरूंनी केलेले मार्गदर्शन यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत. २४ नोव्हेंबर या दिवशी श्री. प्रदीप चिटणीस यांचा संगीत साधनेला झालेला आरंभ आणि संगीत साधनेत त्यांना लाभलेले गुरूंचे अनमोल मार्गदर्शन, यांविषयीची सूत्रे पाहिली. आज आपण त्यापुढील सूत्रे पाहूया.

(भाग २)

भाग १. वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/424734.html


४. शुक्लगुरुजींच्या मार्गदर्शनाखाली संगीत साधना

४ इ. ‘एका वर्षात तू चांगला गाऊ लागशील !’ गुरूंनी दिलेला आशीर्वाद !  : नाशिक दौर्‍यात मला चांगली तालीम मिळायची. सकाळी सकाळचा राग, संध्याकाळी संध्याकाळचा आणि रात्रीच्या रागाचा अभ्यास रात्री होत असे. गुरुजी नेहमी मला प्रोत्साहन द्यायचे. ते कधीही ओरडत नसत. एखादा स्वर चुकीचा लागला, तरी ते नम्रतेने सांगायचे ‘‘अच्छा गा रहे हो । अब सिर्फ गंधार ( म्हणजे ग ) की तरफ थोडा ध्यान देना है ।’’ मला ते नेहमी म्हणायचे ‘‘अभी तो बहुत अच्छा गा रहे हो, एक साल जाते-जाते देखना तुम और भी अच्छा गाओगे ।’, असा माझ्या गुरूंनी आशीर्वाद दिला. अशा प्रकारे गुरुकृपेने एक वर्ष जाता जाता २२ वर्षे कशी उलटून गेली कळलेच नाही. त्यांचे माझ्यावर हे गुरुऋण आहे.

४ ई. गुरुजींचा स्वर्गवास : असे गुरुजी मिळण्यासाठी भाग्य लागते. त्यांनी प्रत्येक गोष्ट जराही न रागावता, नेहमी प्रोत्साहन देऊन, अगदी सोप्या पद्धतीने माझ्यासारख्या अतिसामान्य मुलाला शिकवली. त्यांचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. ५.५.२०१३ या दिवशी गुरुजींनी देहत्याग केला. ‘त्यांच्या आत्म्यास शांती लाभो !’, अशी मी ईश्‍वर चरणी प्रार्थना करतो.

५. अत्यंत नैराश्य येऊन मनात वाईट विचार आल्यास सक्तीने तंबोरा घेऊन गायला बसल्यावर नैराश्यातून बाहेर पडता येणे

गुरुजींकडून आत्मसात केलेले गाणे खरोखरच मनाला प्रचंड शांतता देणारे आहे. माझ्या आयुष्यावर या गाण्याचा फारच चांगला परिणाम झाला. ‘केवळ या गाण्यामुळेच मी माझ्या आयुष्यात तरलो आहे’, असे म्हटले, तर अतिशयोक्ती ठरणार नाही. मला अनेक वेळा नैराश्य यायचे. ‘काहीही करू नये’, असे मला वाटायचे. ‘मला वेड लागेल. मी व्यसनाधीन होईन’, अशी मला भीती वाटायची. माझ्यावर आई-वडिलांचे चांगले संस्कार असल्याने आणि ईश्‍वरकृपेने मी वाईट मार्गाला गेलो नाही. मला कधी अत्यंत नैराश्य येऊन मनात वाईट विचार आल्यास मी सक्तीने तंबोरा घेऊन गायला बसायचो. ईश्‍वरच मला ही बुद्धी द्यायचा. त्याची माझ्यावर फार मोठी कृपाच आहे.

६. संगीताच्या बळावरच अनेक दुःखांमधून हळूहळू बाहेर पडता येणे आणि यातूनच संगीत उपचार पद्धतीची कल्पना सुचणे

मी दीड-दोन घंटे गायल्यावर माझे नैराश्य निघून जायचे. तेव्हा मी स्वर्गीय आनंदाच्या एका वेगळ्याच विश्‍वात जात असे. मला असा अनुभव वारंवार येऊ लागला. या संगीताच्या बळावरच मी अनेक दुःखांमधून हळूहळू बाहेर पडलो. यातूनच मला संगीत उपचार पद्धतीची कल्पना सुचली. मला ‘या संगीतातून जो आनंद मिळतो, जे संगीत माझ्या सर्व दुःखांवर रामबाण औषध ठरले आहे, त्याचा उपयोग इतरांची दुःखे दूर करून त्यांना आनंद देण्यासाठी करावा’,  हा विचार माझ्या मनात मूळ धरून बसला.’

७. श्री. प्रदीप चिटणीस यांची संगीताचा उपयोग शारीरिक त्रासांवरील उपचार म्हणून करण्याच्या संदर्भातील वाटचाल

७ अ. मानवी जीवनावर संगीताचा चांगला परिणाम होत असल्याचे लक्षात घेऊन ‘संगीत उपचारक’ या ग्रंथांचे वाचन करायला आरंभ करणे : ‘मला ‘संगीताचा मानवी जीवनावर चांगला परिणाम होऊ शकतो’, हे स्वानुभवावरून लक्षात आल्यावर मी संगीत उपचारांवरील वाचन करण्यास आरंभ केला. मी विज्ञान आणि मानसशास्त्र यांचा थोडा अभ्यास केला. मी मुंबईमध्ये ‘संगीत उपचार’विषयक एक छोटा कोर्सही केला. त्यात मला ‘आयुर्वेद आणि संगीत यांचा संबंध कसा आहे ?’, हे शिकायला मिळाले.

७ आ. पाँडेचरी येथे एक वर्षाचा ‘कोर्स’ करणे, पाँडेचरीचे महाविद्यापीठ मोठ्या शासकीय रुग्णालयाशी संलग्न असल्याने तेथे ‘संगीत उपचारांचा उपयोग प्रत्यक्ष रुग्णांवर कशा पद्धतीने होतो’, याचे प्रात्यक्षिकही पहायला मिळणे : त्यानंतर मी पाँडेचरी येथे एक वर्षाचा ‘कोर्स’ केला. हे पाँडेचरीचे महाविद्यापीठ संपूर्ण जगात जेथे संगीत उपचाराचे ‘कोर्सेस’ चालतात, त्या महाविद्यापिठांशी संलग्न आहे. त्यामुळे या विद्यापिठात ‘अन्य देशांमध्ये संगीतविषयक उपचार कसे होतात ?’, हे मला शिकायला मिळाले. हे महाविद्यापीठ मोठ्या शासकीय रुग्णालयांशी संलग्न असल्याने ‘संगीत उपचारांचा उपयोग प्रत्यक्ष रुग्णांवर कशा पद्धतीने होतो’, याचे प्रात्यक्षिकही त्या ‘कोर्स’मध्ये झाले. मला तेथे ‘जनरल वॉर्ड’, अतिदक्षता विभाग, शस्त्रकर्मगृह इत्यादी ठिकाणी संगीत उपचारक म्हणून काम करण्याची संधीही मिळाली.

८. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाशी संपर्क

८ अ. पाँडेचरीला कोर्सच्या निमित्ताने जाण्याआधी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या साधिकांशी ओळख होणे, स्वतःच्या आवाजातील ‘गण गण गणात बोते’ हा मंत्रजप ध्वनीमुद्रित करून दिल्यावर मंत्रजप चांगला वाटल्याने काही दिवसांनी गोवा येथील आश्रमात बोलावणे येणे : पाँडेचरीला जाण्याआधी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या दोन साधिका माझ्या घरी आल्या होत्या. ‘त्या वेळी मी संत गजानन महाराज यांचा ‘गण गण गणात बोते’ हा मंत्र विविध रागांत गाऊन रुग्णांवर संगीताचे उपाय करत होतो. त्याचा काही रुग्णांना लाभही झाला’, ही गोष्ट साधिकांना कुठूनतरी समजली होती. त्यामुळे त्या मला या संदर्भात भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी माझ्या आवाजातील ‘यमन’ रागातील मंत्र ध्वनीमुद्रित करून घेतला आणि ‘हा मंत्र आम्ही आश्रमातील संतांना ऐकवतो’, असे सांगितले. त्यानंतर ४ – ८ दिवसांत मी गायलेला मंत्रजप चांगला वाटल्याने मला रामनाथी आश्रमाला भेट देण्याचा निरोप आला; परंतु तेव्हा मी पाँडेचरी येथे जाण्याच्या गडबडीत असल्याने ‘तेथून आल्यावर मी गोव्याला येतो’, असे साधिकांना सांगितले.

८ आ. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ या नामजपाचे स्वतःच्या आवाजात ध्वनीमुद्रण करून ते रामनाथी आश्रमात पाठवल्यावर तेथील साधकांचे अभ्यासात्मक उत्तर येणे आणि ३ – ४ दिवस  सुटी असल्याने रामनाथीला येण्याविषयी विचारले असता त्यांचा होकार येऊन वर्ष २०१७ च्या दसर्‍याला गोवा येथील रामनाथी आश्रमात जाणे : मी पाँडेचरी येथे असतांना ‘गोव्यातील ‘एस.एस.आर.एफ.’ या संस्थेने विविध आजारांवर काही मंत्र शोधून काढले असून ते वैज्ञानिक दृष्टीकोनातून सिद्ध केले आहेत’, अशी माहिती मला ‘नेट’वर मिळाली. ती वाचून माझी उत्सुकता जागृत झाली; कारण पाँडेचरीला मी हृदयरोग असलेल्या रुग्णांवर संगीत उपचार केले होते. योगायोगाने ‘एस.एस.आर.एफ.’ने हृदयविकारासाठी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप गुणकारी आहे’, असे नमूद केले होते. त्यामुळे ‘हृदयविकारासाठी उपयुक्त असलेल्या रागात हा मंत्र गायला, तर चांगला परिणाम होऊ शकेल’, असा माझ्या मनात विचार आला; परंतु यासाठी मी ‘सनातन संस्थे’लाच विचारायचे ठरवले. मी माझ्याकडे आलेल्या साधिकांना संपर्क केला आणि ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा मंत्र माझ्या आवाजात ध्वनीमुद्रित करून पाठवू शकतो का ?’, असे विचारले. काही दिवसांनी ‘सनातन संस्थे’कडून मी गायलेल्या नामजपाचे अभ्यासात्मक उत्तर आले. ते मला आवडले आणि मला ३ – ४ दिवस सुटी असल्याने मी लगेच रामनाथीला येण्याविषयी विचारले. तेव्हा त्यांचा होकार आल्याने मी वर्ष २०१७ च्या दसर्‍याला गोवा येथील रामनाथी आश्रमात आलो. (‘यातून श्री. चिटणीसकाकांची विचारण्याची आणि अभ्यासू वृत्ती दिसून येते, तसेच त्यांचा अहं अल्प असल्याचे अन् त्यांच्यात प्रथमपासूनच साधकत्व असल्याचे लक्षात येते.’ – संकलक)

८ इ. रामनाथी आश्रमात येतांना चारचाकीला छोटा अपघात होणे, तेथील लोकांनी दाटी करून अपशब्द उच्चारल्यावरही वाहन चालक नम्रतेनेच बोलत असल्याचे पाहून आश्‍चर्य वाटणे : आश्रमातील एक साधक मला रेल्वे स्थानकावर घ्यायला आले होते. आम्ही आश्रमात येतांना चारचाकीला एक छोटा अपघात झाला. वाहनचालक चारचाकी वळवत असतांना एका दुचाकीला चुकून चारचाकीचा धक्का लागला. आमच्या चारचाकीचीही थोडी हानी झाली; पण ईश्‍वर कृपेने वाहन चालकाला आणि मला कुठलीही इजा झाली नाही. लोकांनी आमच्या चारचाकीभोवती दाटी करून अपशब्द बोलणे चालू केले; पण वाहनचालक शांतपणे ऐकून घेत होते. अशा परिस्थितीत वाहन चालक शांत असल्याचे मला आश्‍चर्य वाटले. आश्रमातून मला नेण्यासाठी दुसरी चारचाकी आल्याने मी सुखरूप आश्रमात पोचलो. नंतर माझा साधकांशी संपर्क वाढल्यावर मला साधक चालकाच्या शांत रहाण्यामागील कोडे उलगडले आणि ते म्हणजे साधक राबवत असलेली स्वभावदोष आणि अहं-यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया आहे. वाहन चालक साधकालाही ‘अपघात कसा झाला ?’, हे कळले नाही. (‘श्री. चिटणीस यांच्या नंतर लक्षात आले, ‘त्यांना आश्रमात येण्यापासून रोखण्यासाठी अनिष्ट शक्तींनी केलेले हे आक्रमण होते आणि परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळेच अनिष्ट शक्तींचा प्रयत्न अयशस्वी झाला होता.’ – संकलक)

८ ई. आश्रमात आल्यावर साधकांचे प्रेमाने बोलणे, आश्रमातील स्वच्छता, शिस्त आणि सर्व व्यवस्था पाहून भारावून जाणे अन् एका अद्भुत जगात आल्यासारखे वाटणे : मी आश्रमात आल्यावर संगीत सेवा सांभाळणार्‍या कु. तेजल पात्रीकर यांनी माझे हसतमुखाने आणि नम्रतेने स्वागत केले. नंतर एका साधकाने मला प्रेमाने आश्रम दाखवला. ‘आश्रमाची स्वछता, शिस्त, व्यवस्था, ध्यानमंदिर, काही विलक्षण गोष्टी आणि साधकांची नम्रता, साधकांचे प्रेम’, या गोष्टी पाहून पहिल्याच दिवशी मी भारावून गेलो आणि मला एका अद्भुत जगात आल्यासारखे वाटले.

९. श्री. प्रदीप चिटणीस यांचा ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या कार्यात सहभाग

९ अ. ‘संगीताच्या प्रयोगाच्या वेळी सूक्ष्मातील जाणणार्‍या साधकांनी ‘गायनाचा मनुष्याच्या चक्रांवर झालेला परिणाम’ याचे सूक्ष्म परीक्षण करणे आणि ‘हेच उपचारांचे खरे परीक्षण आहे’, असे जाणवणे : महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘गायनाचा मनुष्याचे शरीर आणि मन यांवर आध्यात्मिक स्तरावर काय परिणाम होतो ?’, यांविषयी विविध प्रयोग केले जात आहेत. ‘शास्त्रीय संगीताने व्यक्तीची सकारात्मक, नकारात्मक आणि एकूण आभा यांवर झालेला परिणाम ‘युनिव्हर्सल थर्मल स्कॅनर’द्वारे पाहिला जातो आणि त्याचा परिणामही चांगला मिळतो’, हे माझ्या लक्षात आले. (त्या वेळी भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या शास्त्रीय ‘ऑडिओ’ गायनाचे प्रयोग चालू होते.) याच वेळी सनातन संस्थेचे सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्ते साधक करत असलेला गायनाचा ऐकणार्‍यांच्या सप्तचक्रांवरील अभ्यास मला नाविन्यपूर्ण जाणवला; कारण आजपर्यंत मी ‘पाँडेचरीच्या रुग्णालयातही रक्तदाब, नाडीचा वेग, काळजी आणि वेदना याविषयी रुग्णाला विचारून मोजमाप ठरवून ‘गायनाचा रुग्णावर काय परिणाम होतो ?’, याचा अभ्यास केला होता. साधकांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण पाहून ‘संगीताच्या उपचारांचे हे खरे परीक्षण आहे’, हे माझ्या लक्षात आले.

९ आ. शास्त्रीय गायनाचे प्रयोग करण्याचे ठरवणे आणि तल्लीन होऊन शास्त्रीय गायन करत असतांना गायनातील चैतन्यामुळे एका साधकाला आध्यात्मिक त्रास होणे : संगीताच्या प्रयोगांचे अभ्यास म्हणून परीक्षण करत असतांना संगीत सेवेचे दायित्व पहाणार्‍या साधिका कु. तेजलताईंनी ‘प्रयोगाविषयी काही नवीन सुचवायचे आहे का ?’, असे विचारले. तेव्हा मी त्यांना माझ्या प्रत्यक्ष गायनाच्या सादरीकरणाविषयी विचारले आणि त्यांनी होकार दिल्यावर माझ्या शास्त्रीय गायनाचे प्रयोग घ्यायचे ठरले. दुसर्‍या दिवशी मला एक राग एक घंटा गायला सांगितला. त्याप्रमाणे मी ‘यमन’ रागाचा विस्तार करून रागाची बंदिश सादर केली. मी गाण्यात तल्लीन झालो होतो. त्या वेळी एका साधकाला आध्यात्मिक त्रास होऊ लागला. गायनात तल्लीन झाल्यामुळे मी केवळ ‘काय घडले ?’, हे पाहिले आणि पुन्हा एकाग्रतेने गायन चालू ठेवले. (‘गायकाची साधना चांगली असेल, तर त्याच्या आवाजात चैतन्य निर्माण होऊन अनिष्ट शक्तींचा त्रास असणार्‍या व्यक्तीला त्याचा त्रास होतो. श्री. चिटणीस हे प्रथमच ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’तील संगीत प्रयोगात गायले आणि त्यांच्या भावपूर्ण गाण्याचे सामर्थ्य पहिल्याच सत्रात साधकांना अनुभवायला मिळाले.’ – संकलक)

१०. संगीताचे प्रयोग करतांना जाणवलेली सूत्रे

१० अ. संगीताच्या प्रयोगानंतर ‘यू.ए.एस्.’ चाचणी आणि सूक्ष्मातील जाणणार्‍या साधकांनी गायनाचे केलेले सूक्ष्मपरीक्षण पाहून प्रभावित होणे आणि संगीताच्या उपचारांचे पुढील संशोधन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयात करण्याचा निर्णय घेणे : ‘माझा संगीताचा प्रयोग संपल्यावर माझी आणि काही साधकांची धन अन् ऋण प्रभावळ मोजली गेली. प्रयोगाच्या आधी आणि प्रयोगानंतर मोजलेल्या प्रभावळीत चांगला फरक पडला होता. माझी आणि साधकांची धन प्रभावळ वाढली होती आणि ऋण प्रभावळ अल्प झाली होती. ‘यू.ए.एस्.’ चाचणीच्या साहाय्याने प्रभावळीचे मोजमाप करण्याची पद्धत मला नवीन असल्याने ही पद्धत पाहून मी प्रभावित झालो; कारण ‘संगीताचा एवढा सूक्ष्म स्तरावर परिणाम होतो !’, हे मी आधी ऐकले होते; परंतु इथे ते पुराव्यानिशी सिद्ध झाले होते. ‘संगीत उपचार क्षेत्रात ही फारच मोठी क्रांती होती’, असे मला वाटले. साधकांनी केलेले सूक्ष्मपरीक्षण आणि या यंत्रांद्वारे केले गेलेले प्रभावळीचे मोजमाप, या दोन अद्भुत घटकांमुळे मी प्रभावित झालो अन् यापुढे संगीत उपचारांचे पुढचे संशोधन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयातच करायचा मी निर्णय घेतला.

१० आ. ‘मालकंस’ राग गातांना पूर्वी कधीही न जाणवणारी एकाग्रता जाणवणे आणि ध्यानाची अवस्था अनुभवणे : गायनाच्या पहिल्या प्रयोगात मी ‘यमन’ राग गायला. दुसर्‍या प्रयोगात ‘मालकंस’ राग गायला. हा राग मनाला शांतता देणारा आहे. मी राग गायला आरंभ केल्यावर पहिल्या स्वरापासूनच माझे मन एकाग्र होऊ लागले. मला ध्यानात्मक अवस्था प्राप्त होऊन मन कमालीचे शांत झाले होते. इतकी एकाग्रता, गाण्यात तल्लीन होणे आणि ध्यानाची अवस्था यापूर्वी मला कधीही लाभली नव्हती.

११. शेगावचे संत गजानन महाराज यांच्या संदर्भात आलेली अनुभूती

११ अ. श्री. राम होनप यांनी ‘शेगावचे संत गजानन महाराज यांनी एक निरोप दिला आहे’, असे सांगितल्यावर भारावून जाणे आणि डोळ्यांतून आनंदाश्रू येणे, त्यांचा निरोप ऐकण्यासाठी कान अधीर होणे आणि संत गजानन महाराज यांनी ‘तू उपचारांकडे लक्ष न देता साधनेवर लक्ष केंद्रित कर’, असा निरोप दिल्याचे श्री. राम होनप यांनी सांगणे : श्री. राम होनप या प्रयोगाचे सूक्ष्मपरीक्षण करत होते. त्यांनी मला सांगितले, ‘‘तुमचे आलाप चालू असतांना तुम्ही एकदम ध्यानावस्थेत होतात. तेव्हा मला शेगावचे संत गजानन महाराज सूक्ष्मातून दिसले आणि त्यांनी तुमच्यासाठी एक निरोप दिला आहे.’’ रामदादांचे हे वक्तव्य ऐकून मी पूर्ण भारावून गेलो आणि माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले. मी गजानन महाराज यांचा निस्सीम भक्त आहे. महाराजांचा निरोप ऐकण्यासाठी माझे कान अधीर झाले. महाराज रामदादांना म्हणाले, ‘त्याला सांग मी आलोय. तू उपचारांकडे लक्ष न देता साधनेवर लक्ष केंद्रित कर.’ तेव्हाच मी ओळखले, ‘महाराजांनीच मला रामनाथी आश्रमात साधना करण्यासाठी पाठवले आहे.’ (‘या प्रसंगी श्री. राम होनप यांना ‘श्री. प्रदीप चिटणीस यांची गजानन महाराजांवर निस्सीम श्रद्धा आहे’, हे ठाऊक नव्हते.’ – संकलक)

११ आ. परात्पर गुरुदेवांनी संत गजानन महाराजांच्या वाक्याचा अर्थ सांगितल्यावर जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटणे आणि प्रती मास ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या संशोधनात्मक कार्यासाठी येणे : मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना महाराजांच्या निरोपाचा अर्थ विचारला. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘तुमची संगीत साधना बर्‍यापैकी आहे; पण तुमची आध्यात्मिक साधना होणे आवश्यक आहे.’’ परात्पर गुरुदेवांनी संत गजानन महाराजांच्या वाक्याचा अर्थ उलगडल्यावर माझा जीवनाकडे पहाण्याच्या दृष्टीकोनात पालट होऊ लागला. पाँडेचरी येथील ‘कोर्स’ पूर्ण करून मी प्रती मास महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संशोधनात्मक कार्यासाठी येऊ लागलो. अनेक रागांचे अनेक रोगांवर विशेषतः आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांसाठी पुष्कळ प्रयोग झाले आणि त्याचे सकारात्मक निष्कर्ष मिळू लागले.

१२. संगीताच्या प्रयोगाच्या वेळी गातांना आलेल्या अनुभूती

१२ अ. मूलतः गायनाची शैली जोरकस नसूनही अनिष्ट शक्तींचा त्रास असणार्‍या साधकांसाठी गायनाचा प्रयोग करतांना आपोआप जोरकस शैलीत गायन होणे : महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या व्यासपिठावर प्रयोग करतांना मला निरनिराळ्या अनुभूती आल्या. अनिष्ट शक्तीचा त्रास असणार्‍या साधकांसाठी गायनाचा प्रयोग करतांना साधकांना आध्यात्मिक त्रास होऊ लागल्यास अधिक जोरकसपणे गायले जाते. त्या वेळी ‘अनिष्ट शक्तींशी सूक्ष्म युद्धच चालू आहे’, असे मला वाटायचे. अशा वेळी अतिद्रुत लयीत गमकेच्या, म्हणजे अति जोरकस आणि भारदस्त ताना अन् तार सप्तकातील स्वर यांचा प्रयोग केला जायचा. माझी गायनाची नैसर्गिक गायन शैली अतिशय संथ, शांत, ध्यान करण्यास पोषक अशी आहे; परंतु साधकांना आध्यात्मिक त्रास होऊ लागल्यास माझ्या गायनाचे स्वरूप आपोआप पालटायचे. मला याचे आश्‍चर्य वाटायचे. माझी गायन शैली शांत असल्यामुळे माझ्या नाजूक गळ्याला जोरकस गायन कधी पेलले नाही.

(गमक : ‘राग गायन किंवा वादनात, तसेच आलाप गायन किंवा वादन प्रक्रियेत स्वराला कंप किंवा आंदोलित करून तो राग गाणे किंवा वाजवणे’, याला ‘गमक’ म्हणतात.)

१२ आ. यापूर्वी जोरकस गायन केल्यावर घशाला त्रास होणे आणि पुढील १५ दिवस गायन न केल्यासच आवाज पूर्ववत् होणे; मात्र रामनाथी आश्रमात पहिल्या गायन प्रयोगाच्या वेळी आक्रमक आणि जोरकस स्वरूपाचे गायन केल्याने गळ्यावर पुष्कळ ताण येऊनही पुढच्या प्रयोगाच्या वेळी तेवढ्याच जोरकसपणे गायन करता येणे : मी गायनाचा सराव करतांना असे जोरकस गायन १ – २ वेळा केले होते; परंतु तसे केल्यावर दुसर्‍या दिवशी माझा आवाज बसून कान, नाक आणि घसा तज्ञांकडून औषधोपचार घ्यावे लागले होते आणि पुढील १५ दिवस गायन न केल्याने माझा आवाज पूर्ववत होत होता. मी रामनाथी आश्रमात पहिल्या गायन-प्रयोगाच्या वेळी आक्रमक आणि जोरकस स्वरूपाचे गायन केले आणि पुढचा प्रयोग लगेच एक घंट्याने होता. पहिला गायन-प्रयोग झाल्यावर मला वाटले, ‘आता पुढचा प्रयोग करणे अशक्य होईल; कारण माझ्या गळ्यावर खूप ताण पडला आहे.’ मी गुरूंवर सर्व सोडून दिले आणि प्रयोग चालू केला. तेव्हा आश्‍चर्य म्हणजे माझा आवाज चांगला लागून पुन्हा तेवढ्याच जोरकसपणे मला गायन करता आले. साधकांसाठी चांगले उपाय होण्यासाठी मी पूर्ण शक्तीनिशी गायलो. रात्री अडीच वाजता प्रयोग संपले.

(क्रमश: उद्याच्या अंकी)

– श्री. प्रदीप चिटणीस, ठाणे, महाराष्ट्र. (२०.३.२०२०)


भाग ३ वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/425499.html

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक