पुण्यात कोरोनाची दुसरी लाट रोखणे शक्य !

पुणे – शहरातील कोरोनाचे प्रमाण अधिक असणार्‍या प्रभागांमध्ये कोरोना विरुद्ध समूह रोगप्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) विकसित झाल्याचे पुणे हे देशातील पहिले शहर ठरले आहे. त्यामुळे योग्य काळजी घेतल्यास कोरोनाची दुसरी लाट रोखणे शक्य होईल, असा विश्‍वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने केलेल्या सिरो सर्वेक्षणाच्या संशोधनातून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.

येरवडा, कसबा पेठ, शनिवार पेठ, रास्ता पेठ, रविवार पेठ, लोहियानगर, कासेवाडी आणि नवी पेठ, तसेच पर्वती या प्रभागांतील नागरिकांच्या रक्ताचे नमुने सिरो सर्वेक्षणात घेतले होते. यातील ८५ टक्के नागरिकांमधील प्रतिपिंडे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे. संबंधित संशोधनात आयसरचे डॉ. अर्णब घोष, फरिदाबाद येथील ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटचे संकर भट्टाचार्य, विद्यापिठाच्या आरोग्यशास्त्र विभागाच्या डॉ. आरती नगरकर, डॉ. अभय कुडाळे आदींचा सहभाग आहे. संबंधित संशोधन मेडिकल अर्काईव्ह या प्रकाशनपूर्व शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे.