उन्हाळ्यात अपरिहार्यपणे गाडीने अथवा बसने प्रवास करावा लागलाच, तर बर्याच लोकांना प्रवासात, तिथे पोचल्यावर किंवा परत आल्यावर उन्हाच्या तडाख्याने पोट बिघडते, डोके चढते किंवा पोटाची काहीतरी तक्रार चालू होते. पुढील सूचना आपल्याला उन्हाचा किती त्रास होतो आणि स्वतःचे वय यांनुसार वापरता येतील. सध्याचे ऊन सगळ्यांना अधिकच त्रास देत आहे, हे दिसले म्हणून प्रवासासाठी काही सोप्या सूचना येथे देत आहे.
१. सकाळी लवकर प्रवासाला बाहेर पडा, म्हणजे उन्हाचा प्रश्न बर्यापैकी न्यून होईल. याखेरीज अधिक प्रमाणात वाहतूक लागत नाही, हा अजून एक लाभ.
२. सध्या सगळेच वातानुकूलित चारचाकी वाहनाने प्रवास करतात. वातानुकूलित चारचाकी वाहनामधून एकदम उन्हात किंवा कडक उन्हातून एकदम २१ डिग्री वातानुकूलित चारचाकी वाहनामध्ये बसू नका.
३. लहान मुले समवेत असतील, तर तुमच्या गावच्या पाण्याचा साठा त्यांच्यासाठी स्वतःजवळ ठेवा. उन्हाळ्यात पोट बिघडायची शक्यता अधिक असते. पाणी पालटले, तर मुलांमध्ये पोट बिघडायची शक्यता अधिकच असते.
४. मुख्यतः डोके आणि डोळे यांच्यासाठी काही ना काही संरक्षक (स्कार्फ, टोपी) जवळ ठेवा.

५. प्रवासात लिंबाचे सरबत पुष्कळ सहज प्यायले जाते. भरपूर लिंबूही अनेकांना घशाशी येते, प्रवास आणि ऊन असले, तर फारच त्रास जाणवतो. योग्य ती काळजी घेऊन बाकी सांगितलेले पर्याय वापरता येतील.
६. स्वतःसमवेत खायला सोपे असे पदार्थ, म्हणजे खाकरा, लाह्यांचा चिवडा, मखाणा ठेवा. तिखट किंवा तळकट खाऊ ठेवण्यापेक्षा खजूर, मनुका, फळे असे ठेवता येईल. एकदम भरपूर खाण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाने खा.
७. प्रवासात मध्येच चहासाठी थांबण्यापेक्षा नारळ पाणी, नीरा किंवा फळाचा स्टॉल उपयोगी पडेल. रस्त्यातील दुकानात सरबत हे पाण्याच्या प्रश्नांमुळे शक्यतो नको किंवा काही दुकानदार हे तिथेच पाण्याची बाटली विकत घेऊन दिली, तर त्याचे सरबत करून देतात. असेही करता येऊ शकते. प्रवासाच्या रस्त्यात ती सोय नसेल, तर लिंबू आणि मीठ, साखर पॅकेट उपयोगी पडते.
८. उन्हातून गाडीत बसल्यावर किंवा उन्हात उतरल्यावर एकदम गटगट पाणी पिण्यापेक्षा घोट घोट पाणी प्या. लाह्याचे पाणी खडीसाखर घालून बाटलीत भरून प्रवासाच्या दिवसाला उपयोगी पडेल.
९. लहान मुलांना अधिक आणि सतत खायला देऊन चारचाकी वाहनाने प्रवास टाळा. खाण्याच्या वेळेलाच खायला दिले, तर प्रवासाचा त्रास अल्प होतो.
१०. पित्त न वाढणारी, उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून आणि त्रास झाल्यास लागणारी स्वतःला सुयोग्य औषधे वैद्यांच्या सल्ल्याने स्वतःसमवेत घेऊन जा.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.