बालसाधिका कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर हिला स्वतःचा संतसन्मान सोहळा होत असल्याचे स्वप्नात, तसेच जागृत अवस्थेत उघड्या डोळ्यांनी दिसणे

६५ टक्के आध्यात्मिक पातळीची बालसाधिका कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय ९ वर्षे) हिला स्वतःचा संतसन्मान सोहळा होत असल्याचे स्वप्नात, तसेच जागृत अवस्थेत उघड्या डोळ्यांनी  ४ – ५ वेळा दिसणे

‘स्वतःचा संतसन्मान सोहळा होत असल्याचे स्वप्नात, तसेच जागृत अवस्थेत साक्षीभावाने पहाणारी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर हिचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
कु. श्रिया राजंदेकर

‘मला साधारण ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात स्वप्न पडले. त्यामध्ये मी पुढीलप्रमाणे पाहिले.

‘प्रत्यक्ष माझाच ‘संतसन्मान सोहळा’ चालू आहे. त्यामध्ये आश्रमातील मोठ्या चित्रीकरण कक्षामध्ये सर्व संतांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. व्यासपिठावर परात्पर गुरु डॉक्टर एका आसंदीत बसले आहेत. बाजूला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदामावशी सिंगबाळ एका आसंदीत बसून आमच्याशी बोलत आहेत. व्यासपिठावर माझा लहान भाऊ पू. वामन (वय २ वर्षे), आई, बाबा आणि मी बसलो आहोत. सर्व जण आनंदित आहेत. समोर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका, पू. जलतारेआजी आणि सगळेच संत बसले आहेत.

या सन्मान सोहळ्यात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदामावशी यांनी माझ्याविषयीची सूत्रे सांगून मी ‘संत’ असल्याचे घोषित केले, तर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांनी माझे औक्षण केले. तसेच परात्पर गुरु डॉक्टर यांनी माझा सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विनायकमामा (शानभाग) यांनी केले. ‘संत’ असल्याचे घोषित झाल्यावर मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांवर डोके टेकवून नमस्कार केला. मग मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदामावशींना नमस्कार केला. नंतर मी सर्व संतांना नमस्कार केला.’

हे स्वप्न पडल्याच्या दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर मी आईला सांगितले, ‘‘आई, मी माझ्याच संतसन्मानाचे स्वप्न पाहिले गं ! ते इतके खरे होते की, मला ते चांगलेच आठवते. असे वाटते, ‘तसे घडले आहे.’ (‘हे स्वप्न सांगतांना श्रिया अगदी स्थिर होती आणि ती मला शांतपणे सर्व सांगत होती. स्वतःचाच संतसन्मान स्वप्नात दिसूनसुद्धा तिच्यात कुुठेच स्वतःचे कौतुक, आश्‍चर्य, अती आनंद असे काही नसल्याचे जाणवले. ती सर्व तटस्थपणे आणि सहजतेने ते मला सांगत होती. तिला त्याचे काहीच वाटत नव्हते.’ – सौ. मानसी राजंदेकर (कु. श्रिया हिची आई))

हे स्वप्न पडल्यानंतर सलग थोड्या थोड्या दिवसांच्या अंतराने ४ – ५ वेळा मला ते स्वप्न दृश्यरूपात उघड्या डोळ्यांनी भिंतीवर चलचित्राप्रमाणे दिसलेे. मी पलंगावर आडवी पडलेली असतांना समोरच्या भिंतीवर मला ते दृश्य दिसते. तेव्हा माझ्या मनात काहीच नसते. माझे डोळे समोर दिसणार्‍या भिंतीकडे अचानक एकदम स्थिर होतात. असे वाटते, ‘मी पलंगावर आडवी पडलेली नसून त्या भिंतीवरच्या सोहळ्याच्या चित्रातच आहे.’ ते दृश्य बघता बघता मला कधी झोप लागते, ते कळतच नाही. कधी ते दृश्य रात्री झोप लागण्या आधी दिसते, तर कधी पहाटे दिसते. काही दिवसांपूर्वी मी आश्रमात रहायला होते, तेव्हाही मला ते दृश्य दिसले होते. हल्ली आम्ही ३०.१०.२०२० या दिवशी आश्रमातून घरी आलो. त्यानंतर २.११.२०२० या दिवशी पहाटे मला माझ्या संतसन्मान सोहळ्याचे स्वप्न पुन्हा पडले. प्रत्येक वेळी मला पहिल्यांदा दिसले होते, तसेच दृश्य दिसले. त्यात काहीच पालट नव्हता.’

– कु. श्रिया राजंदेकर (वय ९ वर्षे), फोंडा, गोवा. (१२.११.२०२०)

(‘संतसन्मान सोहळ्याचे दृश्य दिसल्यावर श्रिया प्रत्येक वेळी मला ते सांगते; परंतु ‘हे मला का दिसते ?’, असा प्रश्‍न तिला पडत नाही किंवा त्याचे कौतुकही तिला वाटत नाही. तिने केवळ ‘आई, हे मला उघड्या डोळ्यांनी कसे गं दिसते ?’, इतकाच प्रश्‍न विचारला. तसेच ‘मला हे जे सारखे दिसते, ते प्रत्यक्षात कधी होणार ?’, असा प्रश्‍न तिने मला एकदासुद्धा विचारला नाही. तसेच एकदा त्याविषयी सांगून झाल्यावर ती परत त्या संदर्भात काहीच बोलत नाही किंवा विचारत नाही. यावरून तिच्या मनाच्या स्थिरतेची जाणीव मला होते.’- सौ. मानसी राजंदेकर)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक