प्रेमभाव आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्‍या देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील वैद्या सुश्री (कु.) माया पाटील !

‘उद्या चैत्र शुक्ल प्रतिपदा (३०.३.२०२५) या दिवशी वैद्या सुश्री (कु.) माया पाटील यांचा ५४ वा वाढदिवस आहे. मी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास आहे. मागील वर्षात सुश्री (कु.) माया पाटील यांच्याशी माझा अधूनमधून संपर्क आला. त्यांची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. 

वैद्या सुश्री (कु.) माया पाटील यांना ५४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

वैद्या सुश्री (कु.) माया पाटील

१. नम्रता

‘मायाताईंना रात्री-अपरात्री रुग्ण साधकांना साहाय्य करावे लागते. त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित, तसेच अन्य तातडीच्या सेवा असतात. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरीही त्या कुणाशीही मोठ्या आवाजात आणि प्रतिक्रियात्मक बोलत नाहीत. त्या प्रत्येक प्रसंगात साधकांना समजून घेऊन नम्रतेने वागतात. त्यांच्या वागण्यातून ‘त्या उच्चशिक्षित (बी.ए.एम्.एस्.) आहेत किंवा उच्चभ्रू कुटुंबातून आल्या आहेत’, हे जाणवतही नाही.

पू. शिवाजी वटकर

२. प्रेमभाव

त्या सर्व साधकांशी आपुलकीने आणि आत्मीयतेने वागतात. त्या साधकांची जाता-येता विचारपूस करतात. त्यांच्याकडे अनेक सेवांचे दायित्व आहे, तरीही त्या सहजतेने रुग्ण साधकांची काळजी घेतात, उदा. साधकांवर उपचार करण्यासह पथ्याचे पदार्थ सुचवणे, रुग्ण साधकांना मानसिक आधार देणे, साधकांना नामजपादी उपाय सुचवणे इत्यादी. त्यांच्यातील प्रेमभावामुळे समाजातील अनेक वैद्य आणि आधुनिक वैद्य सनातनच्या रुग्ण साधकांना साहाय्य करतात, उदा. वैद्य संदेश चव्हाण आणि वैद्या (सौ.) गायत्री चव्हाण प्रत्येक मासात देवद आश्रमात येऊन रुग्ण साधकांची विनामूल्य तपासणी करून औषधोपचार करतात.

३. गुरूंप्रती भाव

पूर्वी मायाताईंमध्ये त्यांच्या कुटुंबियांविषयी भावनाशीलता होती आणि त्यांना स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी काळजी वाटत असे. आता त्यांनी सर्वकाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर सोपवले आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या आई श्रीमती प्रमिला पाटील (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ८३ वर्षे) आणि अन्य कुटुंबीय यांच्या साधनेविषयी काळजी वाटत नाही. त्या परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा ठेवून तळमळीने, परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न करतात.

मायाताईंमधील ‘शिकण्याची वृत्ती, नम्रता, गुरुकार्य आणि ईश्वरप्राप्ती यांची तळमळ, प्रांजळपणा, गुरूंप्रती भाव’ हे गुण आम्हा साधकांमध्ये येवोत, तसेच मायाताईंच्या साधनेतील अडथळे दूर होऊन त्यांची आध्यात्मिक प्रगती होवो’, अशी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना करतो.’

– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.३.२०२५)