साधकांवर मातृवत् प्रेम करून त्यांना आधार देणार्‍या देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील वैद्या सुश्री (कु.) माया पाटील !

‘साधिकेच्या लक्षात आलेली वैद्या सुश्री (कु.) माया पाटील यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

वैद्या सुश्री (कु.) माया पाटील

१. उत्साही आणि आनंदी

‘वैद्या सुश्री (कु.) माया पाटील नेहमी हसतमुख आणि आनंदी असतात. त्या सकाळी जेवढ्या उत्साही असतात, तेवढ्याच रात्रीही उत्साही असतात. त्यांच्याकडे रुग्ण साधक गेल्यावर प्रथम त्या साधकाकडे पाहून स्मितहास्य करतात. मायाताईंच्या चेहर्‍यावर कधीच ताण, थकवा किंवा कंटाळा जाणवत नाही.

२. शिकण्याची वृत्ती

त्या ‘ॲलोपॅथी’ आणि ‘आयुर्वेद’ या उपचारपद्धतींचा अभ्यास करतात, तसेच त्या ‘होमिओपॅथी’च्या औषधांविषयीसुद्धा जाणून घेतात.

सौ. मीना खळतकर

३. रुग्ण साधकांची आत्मीयतेने काळजी घेणे

३ अ. साधकाला पुरेसा वेळ देणे : मायाताईंकडे अन्य सेवांचेही दायित्व आहे, तरीही त्या रुग्ण साधकांना पुरेसा वेळ देतात. त्या कधीही साधकांना ‘मला महाप्रसाद ग्रहण करायचा आहे किंवा मला अन्य सेवा आहेत’, असे सांगत नाहीत.

३ आ. साधकाची मनःस्थिती जाणून घेणे आणि त्यांना त्या मनःस्थितीतून बाहेर येण्यास साहाय्य करणे : त्यांच्याकडे साधक गेल्यावर त्या साधकांना केवळ औषध देत नाहीत, तर त्या साधकांच्या मनाची स्थितीही जाणून घेतात. ‘साधकाच्या मनाची स्थिती ठीक नसेल, तर केवळ औषध घेऊन तो बरा होणार नाही’, असे मायाताईंना वाटते. ‘साधकाने त्या मनःस्थितीतून बाहेर यावे’, यासाठी मायाताई त्या साधकाला ‘व्हॉट्सॲप’वर भावजागृतीचा प्रयोग पाठवतात. त्यामुळे साधकाला उत्साहाने व्यष्टी साधना करण्याची उभारी येते.

३ इ. ‘साधकाचा त्रास लवकर न्यून व्हावा’, अशी तळमळ : ‘एखाद्या साधकाला त्रास होत आहे’, असे मायाताईंना समजल्यास त्या साधकाला तत्परतेने औषध देतात. ‘साधकाचा त्रास लवकर न्यून होऊन त्याचा साधनेचा वेळ वाया जाऊ नये’, असा मायाताईंचा विचार असतो.

३ ई. साधकांची प्रेमाने विचारपूस करणे : मायाताईंमध्ये ‘प्रेमभाव, इतरांना साहाय्य करणे आणि इतरांचा विचार करणे’, असे अनेक गुण आहेत. त्या येता-जाता साधकांची प्रेमाने विचारपूस करतात. साधकांना त्यांचा आधार वाटतो.

४. मायाताईंकडे रुग्ण साधक गेल्यावर त्यांचा ‘तो माझ्या गुरूंचा साधक आहे’, असा भाव असतो.

‘साधकांवर मातृवत् प्रेम करून त्यांना आधार देणार्‍या मायाताईंची जलद आध्यात्मिक उन्नती होऊ दे आणि मला त्यांच्यामधील सर्व गुण आत्मसात् करता येऊ देत’, अशी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.’

– सौ. मीना खळतकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.  (९.३.२०२५)