सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांनी त्यांच्या सद्गुरु सन्मान सोहळ्यानंतर साधकांना केलेले मार्गदर्शन

सद्गुरु नंदकुमार जाधव

१. गुरुदेवांनी गुरुकृपायोग शिकवला असल्यामुळेच सनातनचे साधक आणि समितीचे कार्यकर्ते यांची जलद आध्यात्मिक प्रगती होत असणे

‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेनेच माझी अध्यात्मात प्रगती झाली आहे. आज त्यांच्याच कृपेने ४ संत सद्गुरु पदापर्यंत पोचले आणि एका साधकाची जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटका झाली आहे. ही सर्व त्यांचीच कृपा आहे. ‘हे सर्व आपण कसे प्राप्त करू शकतो ?’, याचा मार्गही त्यांनीच दाखवला आहे. त्यांनी आम्हा सर्वांना गुरुकृपायोग शिकवला आणि त्यामुळेच सनातनचे साधक अन् समितीचे कार्यकर्ते यांची जलद आध्यात्मिक प्रगती होत आहे. यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.

(सद्गुरु डॉ. वसंत आठवले, सद्गुरु (सौ.) आशालता सखदेव, सद्गुरु नंदकुमार जाधव आणि सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, हे ४ संत सद्गुरु पदावर अन् श्री. निरंजन चोडणकर हा साधक जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाला. – संकलक)

सनातनचे १०८ साधक संत झाले आहेत आणि १२९९ साधक आध्यात्मिक प्रगती करून संतपदाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. ही सर्व प.पू. गुरुदेवांची कृपा आहे. आपण पाहिले, तर अन्य संस्थांमधील साधकांची अशी प्रगती होतांना दिसत नाही; कारण सनातन संस्थेत गुरुदेवांनी ‘गुरुकृपायोग’ हा जलद आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग शिकवला आहे.

२. कलियुगात सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणारे जीव भाग्यवान असण्याची कारणे

२ अ. प.पू. गुरुदेवांनी त्यांच्याविषयी भाव आणि भक्ती असलेले अनेक साधक सिद्ध केले असणे अन् ते अन्य साधकांना साधनेमध्ये साहाय्य करत असणे : आपण सर्वजण भाग्यवान आहोत; प.पू. गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) आपल्यासारखे अनेक साधक घडवले आहेत. त्यामुळे साधकांच्या मनामध्ये प.पू. गुरुदेवांच्या चरणी भक्ती आणि भाव आहे. ते साधक अन्य साधकांनाही साधनेमध्ये साहाय्य करत आहेत. हे साधक ‘ध्यास घेऊन साधना कशी करायला पाहिजे ?’, हेे स्वतःचे आचरण आणि मार्गदर्शन यांतून अन्य साधकांना घडवत आहेत. असे अनेक साधक प.पू. गुरुदेवांनी सिद्ध केले आहेत आणि आणखीही साधक सिद्ध होत आहेत.

२ आ. कलियुगातील साधना करणार्‍या जिवांना ईश्‍वराची तीन रूपे पहायला मिळणे : त्रेतायुगामध्ये लोकांना प्रभु रामचंद्रांच्या रूपामध्ये ईश्‍वराचे दर्शन झाले. द्वापरयुगामध्ये लोकांना भगवान श्रीकृष्णाच्या रूपामध्ये ईश्‍वर पहायला मिळाला. या कलियुगामध्ये आपण सर्वजण भाग्यवान आहोत; कारण आपल्याला ईश्‍वराची तीन रूपे पहायला मिळाली. अमृत महोत्सवाच्या वेळी आपण प.पू. गुरुदेवांना प्रभु श्रीरामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या रूपामध्ये पाहिले. त्रेतायुग आणि द्वापारयुगातील लोकांपेक्षा आम्ही अधिक भाग्यवान आहोत; कारण आम्हाला प्रभु श्रीरामचंद्र, भगवान श्रीकृष्ण आणि स्वतःच्या आचरणातून साधकांना घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले, अशी ईश्‍वराची तीन रूपे पहायला मिळाली.

२ इ. प.पू. गुरुदेवांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यामध्ये साधकांची निवड केली असणे : प्रभु रामचंद्राने रामायण काळामध्ये रामराज्याची स्थापना केली. द्वापारयुगामध्ये भगवान श्रीकृष्णाने धर्मराज्याची स्थापना केली आणि आज या युगामध्ये प.पू. गुरुदेव हिंदु राष्ट्राची स्थापना करणार आहेत. वर्ष २०२३ मध्ये त्यांच्या संकल्पाने हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे आणि या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यामध्ये त्यांनी आपली निवड केली आहे. यासाठी आपण भाग्यवान आहोत आणि यासाठी आपण त्यांच्या चरणी कृतज्ञ आहोत.

३. साधकांनो, ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून, तसेच गुणसंवर्धन करून गुरुकृपा संपादन करा !

गुरुकृयोगामुळेच साधकांची जलद आध्यात्मिक प्रगती होत आहे. तेव्हा हे सर्व लक्षात येऊन ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, तसेच गुणसंवर्धन करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. गुरुदेवांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेमध्ये संत आणि साधक यांची आवश्यकता आहे. प्रत्येकाने ‘आपले स्थान त्यामध्ये असायला हवे’, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे ‘आपल्या सर्वांना मोक्षापर्यंत जायचे आहे.

प.पू. गुरुदेवांनी आपल्याला एक ध्येय दिले आहे. त्यांनी आपल्याला स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन, तसेच गुणसंवर्धन प्रक्रिया शिकवली आहे. त्यानुसार आपण प्रयत्न केले, तर त्यांना अपेक्षित असे साधक सिद्ध होऊ शकतात.

४. साधकांनो, अखंड गुरुस्मरण करून स्वतःची आध्यात्मिक प्रगती करून घ्या !

अमृत महोत्सवाच्या दिवशी महर्षींनी सांगितले, ‘आपल्याला गुरुदेवांची कृपा संपादन करून अध्यात्मात जलद प्रगती करायची असेल, तर गुरुदेवांचे अधिकाधिक स्मरण होणे अपेक्षित आहे.’ त्यांच्या स्मरणानेच आपल्याला त्यांचे चैतन्य मिळेल आणि आपले नामस्मरण होईल. त्याचसमवेत स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, तसेच गुणसंवर्धन, म्हणजेच ईश्‍वराचे गुण स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, तर जलद आध्यात्मिक प्रगती होते.

५. साधकाची प्रगती होते, तेव्हा गुरुदेवांना सर्वाधिक आनंद होत असतो, आपण त्यांना असे प्रयत्न करून साधनेमध्ये प्रगती करून आनंद देऊया आणि त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया !

काही वर्षांपूर्वी माझी गुरुदेवांशी भेट झाली होती, तेव्हा त्यांनी एक उदाहरण सांगितले होते. भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलून धरला होता आणि गोपगोपींनी आपली काठी पर्वताला टेकवली होती. त्या काठीचा अर्थ सांगतांना ते म्हणाले, ‘‘काठी लावणे म्हणजे आपली साधना करवून घेणे.’’ हा अर्थ सर्वांनी लक्षात घेऊन आपली साधना वाढवली पाहिजे.

गुरुदेवांच्या संकल्पाने हिंदु राष्ट्र येणारच आहे; परंतु आपणही आपली साधना वाढवली पाहिजे. आपण साधनेचे प्रयत्न वाढवायला पाहिजेत. साधकांची प्रगती झाली की, प.पू. गुरुदेवांना सर्वाधिक आनंद होतो. त्यांनी आपल्याला पुष्कळ वेळा आनंद दिला आहे. ते आपल्याला भरभरून देतही आहेत. आपण त्यांना अन्य काहीच देऊ शकत नाही. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वांनी साधनेमध्ये प्रगती करून त्यांनासुद्धा आनंद देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आपण ‘केवळ त्यांना आनंद देणे’, असा प्रयत्न करू शकतो. त्यांनी आपल्याला जे दिले आहे, त्यासाठी आपण कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे. त्यांचे सदैव स्मरण करून त्यांच्या चरणांप्रती अखंड कृतज्ञता भावामध्ये राहूया.

६. गुरुदेवांची कृपा आणि हिंदु राष्ट्र स्थापण्याचा संकल्प यांमुळे संपूर्ण भारतातून साधक, कार्यकर्ते अन् हिंदुत्वनिष्ठ या कार्यात सहभागी होत असणे

‘आज ते हिंदु राष्ट्र कसे येणार ?’, त्याचा काही भाग आपण पाहिला आणि अनुभवला आहे. आपण पाहिले की, अखिल भारतीय राष्ट्रीय हिंदू अधिवेशन झाले. त्यानंतर हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षक अधिवेशनही झाले आणि आता हिंदु राष्ट्र कार्यकर्ता कार्यशाळा होत आहे. यांमध्ये आपण सर्वजण सहभागी झालो आहोत. त्यामध्ये गुरुदेवांची कृपा आणि संकल्प यांमुळे संपूर्ण भारतातून कार्यकर्ते, साधक आणि हिंदुत्वनिष्ठ सहभागी होत आहेत. या सर्वांच्या मनामध्ये प.पू. गुरुदेवांप्रती आदर, भाव आणि श्रद्धा आहे. ते सर्व आपल्या भाषणाला आरंभ करतांना प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून अन् त्यांना प्रार्थना करून विषय मांडतात, म्हणजे संपूर्ण भारतातून जितके हिंदुत्वनिष्ठ येथे येत आहेत, त्या सर्वांच्या मनामध्ये प.पू. गुरुदेवांप्रती भाव आणि श्रद्धा आहे. सर्वांना ज्ञात झाले आहे की, प.पू. गुरुदेवच हिंदु राष्ट्राची स्थापना करणार आहेत आणि या कार्यामध्ये आम्हाला सर्वांना त्यांनी सहभागी करवून घेतले आहे. त्यांची प.पू. गुरुदेवांवर एवढी श्रद्धा आहे, तर आपली अनंत पटींनी असायला हवी.

गुरुदेवांना अपेक्षित अशी आपणा सर्वांची साधना व्हावी, सर्वांची प्रगती व्हावी, यासाठी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.’

– (सद्गुरु) नंदकुमार जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.