|
श्री. यज्ञेश सावंत

मुंबई, १८ मार्च (वार्ता.) – नागपूर येथे १७ मार्चच्या सकाळी ११ वाजता ‘औरंगजेबाची कबर हटवा’, यासाठी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या वेळी त्यांनी औरंगजेबाची गवताच्या पेंढ्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली. यामुळे पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवले. सायंकाळी अफवा पसरवण्यात आली की, सकाळी जी कबर जाळली, त्याच्या कापडावर धार्मिक लिखाण होते. यानंतर २ सहस्रांहून अधिकच्या जमावाने रस्त्यावर उतरून दुचाकी, चारचाकी, तसेच नागरिकांची घरे यांची हानी केली. पोलिसांवर आक्रमण करून ३ पोलीस उपायुक्तांसह ३३ पोलिसांना घायाळ केले. हे आक्रमण पूर्वनियोजित होते. यातील दंगलखोरांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असे निवेदन उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत नागपूर येथील दंगलीविषयी सभागृहाला अवगत करतांना केले.
🚨 #NagpurViolence Was Pre-Planned—Rioters Won’t Be Spared! – Dy CM Eknath Shinde
"People still praising Aurangzeb after Chhava Movie are traitors"
🔴 33 Police Personnel Injured, Including 3 DCPs!
🔥 Riots saw petrol bombs, swords, axes & stone-pelting! Hundreds of… pic.twitter.com/1BcVVtu6cG
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 18, 2025
उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, अख्तर रोडवरील नमाज आटोपून २०० ते २५० जणांचा जमाव ‘आग लावा’, ‘नष्ट करा’, अशा घोषणा देऊ लागला. या हिंसक घोषणांमुळे पोलिसांनी त्यांना पांगवले. या वेळी काहीजण ‘बजरंग दलाविरुद्ध पोलीस तक्रार प्रविष्ट करायची आहे’, असे सांगून गणेशपेठ पोलीस ठाण्यात आले. त्यांची तक्रार ऐकून घेण्यात आली. याच वेळी हंसापुरी भागात २०० जणांचा जमाव दगडफेक करू लागला. त्यांनी लाठ्या-काठ्या घेऊन, तसेच शस्त्रांद्वारे वार केले. भालदापुरा येथेही मोठ्या जमावाकडून पोलिसांवर आक्रमण करण्यात आले. तेथे अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. ३३ पोलीस घायाळ झाले, ३ पोलीस उपायुक्तही घायाळ आहेत. या प्रकरणी ५ गुन्हे नोंद आहेत, रात्री ८ नंतर झालेल्या या दंगलीमध्ये पेट्रोलबाँब फेकण्यात आले. तलवारींनी आक्रमण करण्यात आले.
राज्याचा गुप्तचर विभाग आणि गृहमंत्रालय झोपले आहेत का ? – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

राज्याचा गुप्तचर विभाग आणि गृहमंत्रालय अकार्यक्षम असल्यामुळे पोलीस दंगलीच्या ठिकाणी वेळेत पोचू शकले नाहीत. राज्याचा गुप्तचर विभाग आणि गृहमंत्रालय झोपले आहेत का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. काही सत्ताधारी मंत्री दंगल भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळलेली आहे. येणार्या काळात दंगली रोखण्यात आल्या पाहिजेत. या विषयावर चर्चा झाली पाहिजे.
नागपूर येथील दंगलसदृश परिस्थिती हा पूर्वनियोजित कट ! – प्रवीण दरेकर, भाजपचे गटनेते, विधान परिषद

औरंग्याचे उदात्तीकरण करण्याची मजल पुष्कळ वाढली आहे. शेकडो दुचाकी फोडल्या, भालदापुर्यातील अनेक दुचाकी खाली पाडून त्यांची हानी केली. महाल परिसरात अनेक चारचाकी गाड्यांची हानी केली. २ चारचाकींमध्ये १०-१० किलोचे दगड आणून ठेवले होते. समाजकंटकांनी पोलिसांना लक्ष्य केले. चिटणीस पार्क परिसरात पोलिसांनी समाजकंटकांची धरपकड चालू केल्यावर वरच्या मजल्यावरून दगड फेकले, एका पोलीस उपायुक्तावर कुर्हाडीने आक्रमण केले. अग्नीशमन दलाच्या सैनिकांवरही चाकू फेकले, तलवारी फेकल्या. पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर जमावाने आक्रमण केले. यात त्यांच्या दोन्ही हातांवर जखमा झाल्या आहेत. पोलीस तेथे वेळेत पोचले अन्यथा अनर्थ झाला असता. वेगवेगळ्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. पोलिसांवर वरच्या मजल्यावर दगडफेक केली, हा पूर्वनियोजित कट होता. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा हा प्रयत्न आहे. यामागील सूत्रधार कोण, हे शोधून काढले पाहिजे. कालच्या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. सरकारने या प्रकरणी निवेदन व्यक्त करावे.
नागपूर येथे कधीही न घडलेली दंगल ! – अभिजित वंजारी, आमदार, काँग्रेस
कधीही न घडलेली दंगल नागपूर येथे घडली. लोकांवर दगडफेक केली, पोलिसांवर दगडफेक केली, चिकित्सालयामध्ये घुसून मारहाण केली. जातीय दंगल घडवून आणण्यासाठी असामाजिक तत्त्वांनी लाभ घेतला का, हे पहावे.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांप्रमाणे आता महाराष्ट्रातही दंगलखोरांवर वचक बसवण्यासाठी जनतेने त्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्याची मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये ! |