प्रयागराज कुंभपर्व २०२५
महाकुंभपर्वात घडलेली चेंगराचेंगरीची घटना अत्यंत दर्दैवी आहे. यामध्ये निष्पाप भाविकांचा हाकनाक बळी गेला. या घटनेमागील नेमकी कारणे, प्रशासकीय त्रुटी आणि उपाय यांवर टाकलेला प्रकाश !
श्री. नीलेश कुलकर्णी, विशेष प्रतिनिधी, सनातन प्रभात, प्रयागराज.
१. अलोट आणि अनियंत्रित गर्दी !
यंदाचा महाकुंभपर्व १४४ वर्षांनंतर आल्याने देश-विदेशांतून भाविक मोठ्या प्रमाणात प्रयागराजमध्ये आले. प्रशासन आरंभीपासूनच ‘मौनी अमावस्येच्या दिवशी किमान १० कोटी भाविक येतील’, असे सांगत होते. त्यादृष्टीने पोलीस आणि प्रशासन यांनी नियोजन केलेही; परंतु त्यात अचूकता दिसून आली नाही आणि हेच चेंगराचेंगरी होण्यामागचे सर्वांत प्रमुख कारण ठरले. मौनी अमावस्येच्या १-२ दिवस अगोदरपासूनच प्रयागराजमध्ये देशभरातील कोट्यवधी भाविक आले. याचा कुंभक्षेत्रासह संपूर्ण प्रयागराजमधील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. १ कि.मी. अंतर कापायला १ ते २ घंटे इतका वेळ लागत होता. घटनेच्या १-२ दिवसांपूर्वीच गर्दी नियंत्रणाच्या बाहेर जात असल्याचे चित्र होते. तेव्हाच प्रशासनाने यावर उपाययोजना का काढल्या नाहीत ?, हा प्रश्न आहे.
२. बहुतांश पांटुन पूल बंद ठेवणे, ही घोडचूक !

प्रशासनाने पांटुन पूलावरची (नदीवरून ये-जा करण्यासाठी बांधलेल्या तात्पुरत्या पुलाची) भाविकांची वाहतूक, हे अत्यंत कळीचे सूत्र बनवले होते. १३ जानेवारीला झालेले पहिले मुख्य स्नान आणि १४ जानेवारीला झालेले पहिले अमृत स्नान या दिवशीही या नदीवर बांधलेल्या ३० पांटून पुलांपैकी भाविकांसाठी आरंभी केवळ १ आणि नंतर २-३ पांटून पूल, तर आखाड्यांसाठी २ पूल चालू ठेवले होते. अर्थात् तेव्हाही चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती उद्भवलीच होती. ‘उरलेले पूल बंद ठेवून प्रशासनाने काय साध्य केले ?’, हे कळायला मार्ग नाही. ही घोडचूकच म्हणावी लागेल.
‘सनातन प्रभात’ने १५ दिवसांपूर्वीच विविध समस्यांकडे वेधले होते प्रशासनाचे लक्ष !![]() १३ जानेवारीला झालेल्या पहिल्या पर्व स्नानाचे वृत्त देतांना ‘सनातन प्रभात’ने १४ जानेवारीच्या अंकात ‘चाचणी परीक्षेत पोलीस-प्रशासन काठावर पास; व्यवस्था सुधारण्याला वाव !’, या मथळ्याखाली चौकट प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये पांटून पुलावर अव्यवस्था, दिशादर्शक फलकांचा अभाव आदी सूत्रांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यावर तेव्हाच उपाययोजना काढली गेली असती, तर आज चेंगराचेंगरीसारखी दुर्दैवी घटना घडली नसती. – श्री. नीलेश कुलकर्णी, विशेष प्रतिनिधी, सनातन प्रभात, प्रयागराज. हे वाचा → ♦ प्रयागराज : संगमक्षेत्रात कडेकोट बंदोबस्त, तर इतत्र काही ठिकाणी वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा ♦ Mahakumbh 2025 : पांटुन पूल अचानक बंद करण्यात येत असल्याने भाविकांना त्रास ! ♦ चाचणी परीक्षेत पोलीस-प्रशासन काठावर पास; व्यवस्था सुधारण्याला वाव ! |
३. प्रशासन नेमके कुठे चुकले ?
अ. साडेतीन कोटी आणि १० कोटी भाविकांसाठी समान नियोजन ! : शासनाने मौनी अमावास्येच्या अमृत स्नानाची जय्यत सिद्धता केली होती. यापूर्वी झालेल्या २ यशस्वी स्नानांमुळे पोलीस-प्रशासनाचा आत्मविश्वास दुणावला होता. तथापि पहिल्या अमृत स्नानच्या तुलनेत मौनी अमावस्येच्या अमृत स्नानाला होणार्या तिप्पट गर्दीच्या तुलनेत नियोजन पूर्वीसारखेच ठेवले. थोडक्यात साडेतीन कोटी भाविक आले, तरी तेच नियोजन आणि १० कोटी भाविक आले, तरी थोड्याफार उपाययोजना वगळता तेच नियोजन ! संगम नोजची क्षमता मर्यादित असल्याने कुठल्याही परिस्थितीत भाविकांना संगम नोजकडे जाऊ न देणे, हे पोलीस आणि प्रशासनाचे धोरण होते. मग तरीही भाविक रात्रीच संगम नोजजवळ कसे पोचले ? त्या वेळी पोलीस काय करत होते ?, याचे उत्तर जनतेला मिळायला हवे.
आ. भाविकांमध्ये जनजागृतीच नाही ! : दुसरी गोष्ट म्हणजे ‘भाविकांनी संगम नोजकडे न जाता अन्यत्र निर्माण केलेल्या घाटावर स्नान करावे’, याविषयी सरकारने भाविकांमध्ये जागृती केली नाही. नाही म्हणायला एक-दोन वेळा मुख्यमंत्र्याच्या भाषणात त्यांनी हा उल्लेख केला खरा; परंतु अशा गोष्टी भाविकांना किमान ८-१० दिवस अगोदरपासून सातत्याने सांगाव्या लागतात. त्यासाठी प्रसारमाध्यमे, सोशाल मीडिया, तसेच अन्य जनजागृती करणार्या माध्यमांचा वापर करावा लागतो. तो झाला नाही. प्रशासन तर ‘जनतेने काय करावे ? आणि काय करू नये ?, याचे एक प्रसिद्धपत्रक काढून मोकळे झाले.
इ. कुठेही सूचना किंवा दिशादर्शक फलक नाही ! : भाविकांना संगम नोजकडे जायचे नाही, हे लक्षात येण्याचे काही कारणच नव्हते; कारण कुंभक्षेत्रीच काय; पण प्रत्यक्ष संगम नोजवरही कुठल्याही प्रकारचे सूचना किंवा दिशादर्शक फलक आजही नाहीत. त्यामुळे भाविक बुचकळ्यात पडतात आणि पोलिसांनी अडवल्यावर वादावादी होते. येथे पोलीस बळही अनावश्यक वाया जाते. नवीनच आलेल्या भाविकांना संगम कुठे आहे ? कुठे जायचे कसे कळणार ? असे फलक प्रशासनाने लावले असते, तर संमम नोजवरची गर्दी टाळता आली असती. प्रशासनाने फलक लावण्यासारखी प्राथामिक उपाययोजनाही न काढणे, हे अनाकलनीय आहे.
४. ध्वनीक्षेपकांचा प्रभावी वापर नाही ! : सरकरने कुंभक्षेत्री, विशेषतः संगम नोजवर भरपूर प्रमाणात ध्वनीक्षेपक लावले आहेत. त्याचा म्हणावा तसा प्रभावी वापर होतांना दिसत नाही. येथेही दोन-चार वेळा सूचना देऊन पाट्याटाकूपणा केला जातो. विशेष म्हणजे या ध्वनीक्षेपकांद्वारे ज्या घोषणा दिल्या जात होत्या, त्या स्पष्ट आणि मोठ्या आवाजात ऐकूही येत नव्हत्या. या ध्वनीक्षेपकांद्वारे भाविकांना सातत्याने योग्य त्या सूचना स्पष्टपणे दिल्या असत्या, तर कदाचित् चेंगराचेंगरीची दुर्घटना टाळता आली असती.
एकूणच प्रशासनाचा मौनी अमावस्येच्या दिवशीच्या अमृत स्नानाच्या नियोजनातील अपरिपूर्णता आणि अतीआत्मविश्वास, यांमुळे ही घटना घडली, असे महणायला वाव आहे.
५. भाविकांमध्ये संयम हवाच ! : चेंगराचेंगरी होण्यामागे भाविकांमधील बेशिस्तपणा, हेही प्रमुख कारण आहे. आपल्याला स्नान करायला मिळावे, यासाठी प्रयत्न करतांना इतरांना त्याचा काय त्रास होतो आहे ? किंवा त्यांची काय हानी होत आहे ?, याकडे भाविकांनी लक्ष द्यायला हवे. त्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांच्यात संयम, समयसूचकता, इतरांचा विचार करणे आदी गुणही वाढू शकतील आणि अशा घटना भविष्यात पुन्हा कधीही घडणार नाहीत !
– श्री. नीलेश कुलकर्णी, विशेष प्रतिनिधी, सनातन प्रभात, प्रयागराज.