प्रयागराज : संगमक्षेत्रात कडेकोट बंदोबस्त, तर इतत्र काही ठिकाणी वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा

प्रयागराज, १४ जानेवारी (वार्ता.) – संगम क्षेत्रात पोलिसांनी अत्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. आखाडे, तसेच सर्वसामान्य भाविक यांनी कुठल्या मार्गाने संगम क्षेत्रात यायचे, कुणी कुठे स्नान करायचे आणि नंतर कुठल्या मार्गाने परतायचे, हे देखील सुनिश्‍चित करण्यात आले होते. एकीकडे संगम क्षेत्रात कानाकोपर्‍यात पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला होता, तर दुसरीकडे त्रिवेणी मार्ग, काली मार्ग, संगम लोअर मार्ग, तसेच मुक्ती मार्ग येथील अनेक ठिकाणी, विशेषतः चौकाचौकात वाहतूक पोलीस नव्हते. यातील काही मार्गांवरून आखाड्यांच्या मिरवणुका जात होत्या, तर दुतर्फा भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. आखाड्यांच्या गाड्यांमुळे भाविकांना रस्ता न ओलांडता आल्यामुळे अनेक ठिकाणी प्रचंड गर्दी होऊन चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांच्या वाहतूक व्यवस्थेतील या अक्षम्य त्रुटीविषयी नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता.