Mahakumbh Parva Snan : अपूर्व उत्साहात १ कोटी ६५ लाख भाविकांचे त्रिवेणी संगमावर पर्व स्नान !

प्रयागराज महाकुंभपर्व २०२५

  • १४ जानेवारी या दिवशी होणार पहिले अमृत स्नान !

  • ३ कोटी भाविक येण्याचा अंदाज !

  • भजने, भक्तीगीते गात भाविकांचे जथ्ये पोचले कुंभनगरी प्रयागराजमध्ये

श्री. प्रीतम नाचणकर, श्री. यज्ञेश सावंत आणि श्री. नीलेश कुलकर्णी

भाविकांचे त्रिवेणी संगमावर पर्व स्नान

प्रयागराज, १३ जानेवारी (वार्ता.) – ज्याची पुष्कळ दिवसांपासून जगभरातील कोट्यवधी भाविक वाट पहात होते, त्या महाकुंभमेळ्याला आजपासून अपूर्व उत्साहात प्रारंभ झाला. कुंभनगरी आज लाखो भाविकांच्या आगमनाने अक्षरश: ओसंडून वहात होती. एका बाजूला देवनदी गंगा, दुसर्‍या बाजूला यमुना आणि खालून प्रवाहित होणारी सरस्वती यांच्या संगमावर आज अनुमाने १ कोटी ६५ लाख भाविकांनी  ‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’ असा उद्घोष करत पहिले पर्व स्नान केले. या वेळी संपूर्ण कुंभक्षेत्र भक्तीतरंग आणि चैतन्य यांनी भारीत झाले होते. भाविकांच्या चेहर्‍यावर पर्वस्नानाचा आनंद ओसंडून वहात होता. भाविक त्रिवेणी संगमावर श्रद्धेची डुबकी घेत स्वत:ला धन्य धन्य समजत होते. १४४ वर्षांनी आलेल्या या महाकुंभाला येत्या दीड महिन्यात कोट्यवधी भाविक उपस्थिती दर्शवून या पर्वणीचा लाभ घेणार आहेत.

येथील त्रिवेणी संगमावर देश-विदेशांतील अनुमाने १ कोटी ६५ लाख भाविकांच्या अपूर्व उत्साहात १३ जानेवारी या दिवशी पहिले पर्व स्नान पार पडले. पहाटे ४ वाजल्यापासूनच पर्व स्नानाला आरंभ झाला. कडाक्याच्या थंडीतही संगमावर जाण्यासाठी सर्व रस्त्यांवर भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. ते साधारण ६-७ कि.मी. अंतर पार करून संगमावर पोचले. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी या स्नानाचा लाभ घेतला. विशेषतः कल्पवास (एक प्रकारचे व्रत) करण्यासाठी आलेल्या भाविकांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग होता. ‘जय सियाराम’च्या नामघोषात या सर्वांनी त्रिवेणी संगमावर स्नान केले आणि नंतर गंगापूजन आणि आरती करून प्रथेप्रमाणे नदीत दिवे सोडले. विदेशी नागरिकांचा लक्षणीय सहभाग, हे या पर्व स्नानाचे वैशिष्ट्य ठरले. १४ जानेवारी या मकरसंक्रातीच्या दिवशी याच ठिकाणी पहिले राजसी स्नान होणार आहे. या स्नानासाठी अनुमाने ३ कोटी भाविक येण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. यात प्रामुख्याने सर्व आखाड्यांतील साधू-संतांचाही समावेश आहे. आजच्या स्नानासाठी जलसंधारण विभागाने गंगा नदीत अतिरिक्त पाणी सोडले होते. त्यामुळे गंगा नदीच्या प्रवाहाचा वेग नेहमीपेक्षा अधिक होता. मुख्य म्हणजे गंगा नदीतील पाणी अत्यंत स्वच्छ असल्याने भाविकांना स्नानाचा आनंद अनुभवता आला. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी असा महाकुंभमेळ्याचा कालावधी आहे.

संगमतीरी स्नान करताना साधू-संत

क्षणचित्रे

१. प्रशासनाने सुव्यवस्थेसाठी स्वयंसेवाकांचे साहाय्य घेतले.

२. अनेक साधू-संत आणि भाविक हे संगमतीरी स्नान करून झाल्यानंतर जप, तप, भजन, कीर्तन, पोथी वाचन आदींमध्ये मग्न होते.

३. स्नान करून परततांना बरेच भाविक स्वतःसमवेत भावपूर्णपणे गंगाजल नेत होते.

चाचणी परीक्षेत पोलीस-प्रशासन काठावर पास; व्यवस्था सुधारण्याला वाव !

अमृत स्नानाच्या तुलनेत पर्व स्नानाला भाविकांची गर्दी निम्म्याने कमी असते. त्यामुळे आजचे पर्व स्नान हे पोलीस आणि प्रशासन यांच्यासाठी चाचणी परीक्षा होती. पुढील सुत्रांवरून येथील व्यवस्था पहाता पोलीस आणि प्रशासन या परीक्षेत काठावर पास झाले, असे म्हणता येईल आणि १४ जानेवारीला होणार्‍या पहिल्या अमृत स्नानाच्या दिवशी त्यांच्या व्यवस्थेत सुधारणा करण्याला वाव आहे, असे भाविकांचे म्हणणे आहे.  

१. पांटून पुलावर अव्यवस्था ! : पांटुन पुलाच्या (नदीवर ये-जा करण्यासाठी बांधण्यात आलेला तात्पुरत्या पुलाच्या) तोंडाशी भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने ५० मीटरच्या अंतरावर काही वेळ चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. काही क्षण तणावाचे वातावरण निर्माण झाले. नियमित मार्गांवर लोकांची चालण्याची गती पांटुन पुलावर मंदावल्यामुळे पुलाच्या तोंडावर अधिक गर्दी झाली. तेथे पोलीस उभे असूनही त्यांना ही परिस्थिती नियंत्रणात आणता आली नाही.

२. दिशादर्शक फलकांचा अभाव ! : संगमाच्या ठिकाणी जाण्यासाठी जागोजागी दिशादर्शक फलक नसल्यामुळे नवीन आलेल्या भाविकांचा गोंधळ होत होता. त्यांना वारंवार विचारणा करावी लागत होती. भाविकांची संगमावर प्रवेश आणि परतीचा मार्ग हा प्रशासनाने सुनिश्‍चित केला असला, तरी भाविकांना सहज दिसतील असे मोठे फलक ठिकठिकाणी लावणे अपेक्षित होते, जेणेकरून भाविकांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही; परंतु अशी कुठलीही व्यवस्था दिसून आली नाही. त्यामुळे येणारे आणि जाणारे भाविक एकाच रस्त्यावर येत होते अन् त्यामुळे अनावश्यक गर्दी होत होती.

३. गर्दीत हरवलेल्यांसाठीच्या व्यवस्थेत अक्षम्य ढिसाळपणा ! : संगमावर गर्दीत हरवलेल्या व्यक्तींना सहाय्य करण्यासाठी पोलिसांनी मोठा गाजावाजा करून यंत्रणा उभारली; परंतु प्रत्यक्षात या व्यवस्थेत अक्षम्य ढिसाळपणा दिसून आला. अशा लोकांसाठी संगमावर केवळ १ कक्ष उभारण्यात आल्याचे दिसून आले. त्या कक्षावर फलकही लावला नव्हता. तेथे हरवलेल्यांच्या नातेवाईकांच्या नावाने उद्घोषणा करून त्यांनी ‘पूल क्र. १ जवळ यावे’ असे आवाहन करण्यात येत होते. तथापि कुणालाच हा पुल कुठे आहे ?, हे ठाऊक नव्हते. त्यामुळे आणखी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. नातेवाईक रडकुंडीला आलेले दिसले. तेथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ४ ते १० या वेळेत त्यांच्याकडे किमान ३ सहस्र हरवल्याविषयीच्या तक्रारी आल्या होत्या. या कक्षाविषयी सरकारने आवश्यक त्या गांभीर्याने जनजागृती केली नसल्याचे दिसून आले.

४. महिलांची गैरसोय : स्नानानंतर घाटावर महिलांना कपडे पालटण्यासाठी प्रशासनाकडून अनेक कक्ष उभे करण्यात आले आहेत; परंतु हे कक्ष घाटापासून काही अंतर दूर असल्याने प्रचंड गर्दीत तेथपर्यंत सर्वच महिलांना पोचणे शक्य होत नव्हते. त्यामुळे महिलांच्या सोयीच्या दृष्टीने हे कक्ष घाटाच्या जवळ असणे अपेक्षित होते.

५. भिकार्‍यांचा त्रास ! : संगमावर स्नान करून आल्यानंतर दान करण्याची परंपरा आहे. त्यामुळे संगमावर मोठ्या संख्येने भिकारी जमले होते. स्नान करून आलेल्यांच्या ते अक्षरशः मागे लागत होते. त्यामुळे भाविकांना त्रास होत होता.