Second Mandir Parishad KARNATAKA : आता लढा मथुरा श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीचा ! – प्रसिद्ध कथावाचक पू. देवकीनंदन ठाकूर  

मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी कर्नाटक राज्याची दुसरी मंदिर परिषद बेंगळुरू येथे प्रारंभ

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून अधिवक्त्या प्रमिला नेसरगी, श्री. नंदकुमार, पू. रमानंद गौडा, दीपप्रज्वलन करतांना पू. देवकीनंदन ठाकूर, श्री. आर्.व्ही. गौरीशंकर, श्री. गोविंद बाबू पुजारी आणि श्री. सुनील घनवट

बेंगळुरू (कर्नाटक) – अयोध्येत श्रीराम मंदिर उभारले गेले. आता तुम्ही (हिंदू) मथुरेला येणार कि नाही ? मथुरेत श्रीकृष्णजन्मभूमी बनवायची आहे कि नाही ? आतपर्यंत बरेच सहन केले. यापुढे हिंदू सहन करणार नाहीत. हिंदू आपले हक्क पुन्हा मिळवतील, अशी घोषणा करत प्रसिद्ध कथावाचक तथा विश्‍व शांती सेवा ट्रस्टचे संस्थापक पू. देवकीनंदन ठाकूर यांनी मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी हिंदूंना पुढे येण्याचे आवाहन केले. कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथील गंगाम्मा थिम्मय्या कन्व्हेन्शन हॉल, बसवेश्‍वर नगर येथे ‘कर्नाटक मंदिर महासंघ’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या वतीने आयोजित द्वितीय ‘कर्नाटक मंदिर अधिवेशन’त ते बोलत होते.

कथावाचक पू. देवकीनंदन ठाकूर

या वेळी राज्यभरातील मंदिर विश्‍वस्त, प्रतिनिधी, पुरोहित आणि मंदिर संरक्षणासाठी लढणारे अधिवक्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पू. देवकीनंदन ठाकूर पुढे म्हणाले की, सनातन बोर्डाची (मंडळाची) आवश्यकता आहे. कर्नाटक सरकारने राज्यात सनातन मंडळाची स्थापना करावी. आपली संस्कृती वाचवण्यासाठी मंदिरांचे रक्षण करणे आवश्यक आहे. हिंदू संघटित झाले, तरच हे शक्य होईल.

उपस्थित हिंदू

या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या प्रमिला नेसरगी, कर्नाटक सरकारच्या धर्मदाय विभागाचे माजी आयुक्त श्री. नंदकुमार, शृंगेरी महासंस्थानचे माजी प्रशासक पद्मश्री श्री. आर्.व्ही गौरीशंकर, वरलक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक श्री. गोविंद बाबू पुजारी आणि मंदिर महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक श्री. सुनील घनवट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. या परिषदेत कर्नाटक राज्यातील मंदिरांचे विश्‍वस्त, प्रतिनिधी, पुजारी आणि मंदिर संवर्धनासाठी लढणारे अधिवक्ता उपस्थित होते.

श्री. मोहन गौडा

परिषदेत मार्गदर्शन करणार्‍या वक्त्यांनी महासंघाच्या उपक्रमाच्या देशव्यापी यशावर प्रकाश टाकला. कर्नाटक मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक श्री. मोहन गौडा यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या विकासासाठी आणि संरक्षणासाठी हिंदूंना संघटित होण्याचे आवाहन केले. या परिषदेच्या वेळी सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘रुग्णांची भक्तीभावाने सेवा कशी करावी ?’ या कन्नड भाषेतील ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले.