निरोगी जीवनासाठी व्यायाम – ४०
‘आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या अनेक शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा एक प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. या लेखमालेतून आम्ही ‘व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन, ‘अर्गाेनॉमिक्स’चे तत्त्व आणि व्याधीनुसार योग्य व्यायाम’, यांविषयीची माहिती देणार आहोत. व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा हा प्रवास सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल !
योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास नसांच्या आजारातून, म्हणजे हाता-पायांना मुंग्या येणे, आग होणे आदींतून सुटण्यास निश्चित साहाय्य होईल. या लेखात आपण ‘व्यायाम केल्यानंतर नसांना कोणते लाभ होतात ?’, ते पाहूया.
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/867325.html
१. नसांमुळे आपल्या शरिराच्या हालचाली, पचनक्रिया, श्वसन आणि हृदयाचे ठोके यांचे कार्य सुरळीतपणे चालणे
नसा (nervs) म्हणजे आपल्या शरीररूपी यंत्राचे ‘वायरिंग’ आणि ‘प्रोग्रॅमिंग’ (संगणकावर विविध कार्ये करण्यासाठी आवश्यक असलेल्या संगणकीय प्रणाली) होय ! बाहेरून सुदृढ दिसणारे शरीर नसांच्या आजारांमुळे बंद पडलेल्या संगणकाप्रमाणेच निकामी होऊ शकते. वास्तविक आपल्या शरिराच्या हालचाली, पचनक्रिया आणि श्वसन, इतकेच नव्हे, तर हृदयाचे ठोकेसुद्धा नसांमुळे सुरळीतपणे कार्य करतात.
२. संवेदनांना प्रतिसाद देण्याची प्रक्रिया नसांच्या माध्यमातून पूर्ण केली जाणे
आपल्याला पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून बाहेरील जगाच्या संवेदना जाणवतात. मेंदूद्वारे त्याचे अवलोकन करून पंचकर्मेंद्रियांच्या माध्यमातून आवश्यक त्या क्रिया तत्परतेने केल्या जातात. ही सर्व प्रक्रिया नसांच्याच माध्यमातून पूर्ण होते, उदा. आपल्या हाताला चटका लागल्यावर त्वरित हात दूर करण्याची कृती नसांच्याच माध्यमातून होते.
३. शरिरातील आंतर्क्रिया नसांमुळेच होत असून त्यामुळे शरिराला सजीवपणा येणे
बाह्य जगच नव्हे, तर शरिरातील आंतर्क्रिया, उदा. श्वसन आणि हृदयाची गती, रक्तदाबाचे नियमन, तसेच पाचकरस स्रवणे इत्यादी सर्वच क्रियांसाठी नसांचे कार्य अटळ आहे. थोडक्यात सांगायचे झाले, तर शरिरात अंतर्बाह्य ज्या क्रिया होत असतात, त्या नसांमुळेच होत असून त्यामुळे शरिराला सजीवपणा येतो.
(क्रमशः ३ जानेवारी या दिवशी)
– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा. (२५.१२.२०२४)
निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/869693.html