निरोगी जीवनासाठी व्यायाम – ४०
‘आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या अनेक शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा एक प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. या लेखमालेतून आम्ही ‘व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन, ‘अर्गोनॉमिक्स’चे तत्त्व आणि व्याधीनुसार योग्य व्यायाम’, यांविषयीची माहिती देणार आहोत. व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा हा प्रवास सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल ! योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास नसांच्या आजारातून, म्हणजे हाता-पायांना मुंग्या येणे, आग होणे आदींतून सुटण्यास निश्चित साहाय्य होईल. या लेखात आपण ‘व्यायाम केल्यानंतर नसांना कोणते लाभ होतात ?’, ते पाहूया.
१ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘संवेदनांना प्रतिसाद देण्याची प्रक्रिया नसांच्या माध्यमातून पूर्ण केली जाणे आणि शरिरातील आंतर्क्रिया नसांमुळेच होत असून त्यामुळे शरिराला सजीवपणा येणे’, यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/868961.html
४. शरिरात अत्यंत महत्त्वाचे कार्य करणार्या नसा अत्यंत नाजूक असून त्यांच्यावर थोडा आघात झाल्यास तीव्र वेदना होऊन त्या लगेच दुखावणे
शरिरात अत्यंत महत्त्वाचे कार्य करणार्या या नसा मात्र अतिशय नाजूक असतात. त्यांच्यावर थोडा जोराचा आघात झाल्यास मनुष्याला तीव्र वेदना होतात. नसांचे आजार असणार्यांना या वेदनांविषयी नक्कीच ठाऊक असेल; पण त्यासाठी आजारी पडण्याची आवश्यकता नाही. लहानपणी गमतीत किंवा थोडे मोठे झाल्यावर हाताला कुठे धक्का लागल्यावर जवळ जवळ सर्वच सृदृढ व्यक्तींनी आपल्या आयुष्यात कधी कधी याचा अनुभव घेतला असेलच. आपल्या हाताच्या कोपराच्या आतील बाजूस एक नस असते. तेथे मार लागल्यावर किंवा कुणीतरी गमतीत तेथे बोटाने खोडी काढल्यावर हाताला विजेचा झटका लागल्याप्रमाणे संवेदना होेतात. याच ठिकाणी जोरात मार लागल्यास किंवा अस्थीभंग झाल्यास हात लुळाही पडू शकतो. यावरूनच नसांचा नाजूकपणा आणि नसांच्या आजारांची तीव्रता यांचा अंदाज घेता येतो.
५. व्यायामामुळे स्नायू बळकट आणि डौलदार झाल्यावर नाजूक नसांना त्याचा पुष्कळ आधार मिळणे अन् नसांना दुखापत होण्याची शक्यता न्यून होणे
दोन डोंगरांमधून जशी नदी वहाते, त्याप्रमाणेच नसा आणि रक्तवाहिन्या दोन स्नायूंच्या मधून वाट काढतात. त्यांच्या कार्यासाठी हा मार्ग पुष्कळ उपयुक्त असतो. अशा प्रकारे नसा स्नायूंच्या खोलवर असल्याने त्यांना मार लागण्यापासून स्नायू वाचवू शकतात. पैलवानांच्या तुलनेत कृश व्यक्तींच्या नसांना मार लागण्याची शक्यता अनेक पटींनी अधिक असते आणि त्या ‘दुखापतीतून बरे होण्याचा कालावधी कृश व्यक्तींमध्ये अधिक असतोे’, असे लक्षात आले आहे. व्यायामाने स्नायू बळकट आणि डौलदार झाल्यावर नाजूक नसांना त्याचा पुष्कळ आधार मिळतो. त्यामुळे नसांना दुखापत होण्याची शक्यता न्यून होते, तसेच नसांना दुखापत झाली असल्यास ती लवकर भरूनही निघते.
नसांच्या घातक आणि वेदनादायी आजारांपासून स्वतःचे रक्षण करायचे असल्यास योग्य मार्गदर्शनाखाली नियमित व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे.’ (समाप्त)
– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा. (२५.१२.२०२४)