डोकेदुखी दूर होण्यासाठीही व्यायाम असतात का ?

निरोगी जीवनासाठी व्यायाम – ३९

आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्‍या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. या लेखमालेतून आम्ही ‘व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन, ‘अर्गाेनॉमिक्स’चे (ergonomics चे) तत्त्व आणि आजारानुसार योग्य व्यायाम’, यांविषयीची माहिती सादर करणार आहोत. व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा हा प्रवास प्रेरणादायी ठरेल. योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास मानेच्या समस्या सुटण्यास निश्चित साहाय्य होईल. या लेखात आपण डोकेदुखीसाठी आवश्यक असलेले व्यायामाचे प्रकार पाहूया.

‘साधी डोकेदुखी असो किंवा तीव्र स्वरूपाची अर्धशिशी असो, ती आपल्या कामात व्यत्यय आणायला पुरेशी असते; पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की, काही वेळा आपली काम करण्याची पद्धतच त्याला कारणीभूत असू शकते.

याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/866849.html

डोकेदुखीचे प्रातिनिधिक चित्र

१. डोकेदुखीची कारणे

सर्वसाधारणपणे १५ ते २० टक्के वेळा मानेवरील तणावामुळे डोकेदुखी चालू होते. ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना असलेल्या डोकेदुखीची कारणे जवळजवळ ४२ टक्के वेळा मानेशी संबंधित असतात. मानेच्या मणक्यांचे आजार, नसांच्या समस्या आणि स्नायूंवरील ताण इत्यादी डोकेदुखीची कारणे असतात.

मेंदूपर्यंत पोचणार्‍या सर्व संवेदना आणि मेंदूपासून येणारे सर्व कार्य-आवेग मानेच्याच माध्यमातून जातात. इतकेच नव्हे, तर आपल्या ५ ज्ञानेंद्रियांपैकी ४ ज्ञानेंद्रियांना (कान, डोळे, जीभ आणि नाक यांना) मानेतूनच रक्तप्रवाह पोचतो. मानेचे त्रास चालू झाल्यावर ‘डोकेदुखी, डोळ्यांसमोर अंधारी येणे आणि कानांत विशिष्ट आवाज येणे’, असे त्रासही होतात.

श्री. निमिष म्हात्रे

२. डोकेदुखीवर उपाय

आपली बसण्याची पद्धत चुकली, तर मानेच्या स्नायूंवर ताण येतो. कालांतराने हे स्नायू अशक्त होऊ लागतात. तेथील नसा आणि रक्तवाहिन्या यांवर दाब पडू लागतो अन् डोकेदुखी चालू होते. काही जणांना होत असलेल्या अर्धशिशीप्रमाणेच ही डोकेदुखी असते. अशी डोकेदुखी ‘मानेला मर्दन करणे किंवा बिंदूदाबन’, यांमुळे दूर होऊ शकते. डोकेदुखीपासून कायमस्वरूपी सुटका हवी असल्यास नियमित व्यायाम आणि ‘अर्गाेनॉमिक्स’चे (ergonomics चे) नियम पाळणे अपरिहार्य आहे.

३. काम करतांना मानेच्या स्नायूंवर ताण न येण्यासाठी घ्यायची काळजी

अ. बसून काम करतांना प्रती २ घंट्यांनी ५ मिनिटांचे व्यायामप्रकार करावेत.

आ. मानेच्या स्नायूंवरील ताण न्यून होण्यासाठी आणि शक्ती वाढण्यासाठी खाली दिलेला ‘क्यू.आर्. कोड’वर स्कॅन करून मानेचे व्यायामप्रकार करावेत.

इ. संगणकीय सेवा करत असल्यास ‘आसंदी, पटल, तसेच संगणकीय पडदा (स्क्रीन) यांची उंची योग्य प्रकारे आहे ना ?’, याची निश्चिती करावी.

मानेच्या समस्या बर्‍या करण्यापेक्षा टाळलेल्याच बर्‍या ! मानेमुळे उद्भवणारी डोकेदुखी आणि मानेच्या अन्य त्रासांसाठी चलचित्रे (व्हिडिओज्) उपलब्ध आहेत, ती अवश्य पहावीत.

यासाठी समवेत दिलेली लिंक उघडून पहावी.

https://youtube.com/playlist?list=PLF1n2ZzRX7FnAdARqAdPEtOmgTNZ3DZld&si=OtAnl_W1z_yiSZyu

ज्यांना  मानेचे त्रास असल्यास वैद्यकीय मार्गदर्शन घेऊनच हे व्यायाम करावेत.’ (२४.१२.२०२४)

– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा.

निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise