निरोगी जीवनासाठी व्यायाम – ३७
आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. या लेखमालेतून आम्ही ‘व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन, ‘अर्गोनॉमिक्स’चे नियम आणि आजारानुसार योग्य व्यायाम’ यांची माहिती देत आहोत. व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा हा प्रवास प्रेरणादायी ठरेल ! पचन सुधारण्याच्या दृष्टीने व्यायामासंबंधी लक्षात आलेली सूत्रे १८ डिसेंबर या दिवशी वाचली, त्यातील पुढचा भाग येथे देत आहे.
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/864592.html
२. व्यायाम चालू करतांना ध्यानात घ्यावयाची सूत्रे
अ. व्यायामाला प्रारंभ करतांना तो हळूहळू करावा. यासाठी वेळेचे नियोजन करा आणि व्यायामात सातत्य ठेवा. आपले शरीर सांगेल, त्याप्रमाणे व्यायाम करा !
आ. प्रतिदिन मध्यम स्वरूपाचा व्यायाम करणे अधिक लाभदायी असते. अधूनमधून आणि अधिक तीव्र स्वरूपाचा व्यायाम करणे टाळा.
इ. व्यायाम चालू करत असाल, तर चालणे किंवा हलक्या स्वरूपाची योगासने करा. त्यामुळे पचनाला त्रास होणार नाही.
ई. व्यायाम करतांना आणि नंतर पुरेसे पाणी प्या; कारण पचन अन् आतड्यांची हालचाल होणे, यांसाठी पाणी महत्त्वाचे आहे.
उ. खाल्ल्यानंतर लगेच व्यायाम करू नका. मध्ये १ – २ घंट्यांचेे अंतर ठेवा; म्हणजे पचन व्यवस्थित होईल.
ऊ. आपली क्षमता आणि पोटाची स्थिती लक्षात घेऊन बेताने व्यायाम करा. जर तुम्हाला पचनाचे कोणतेही आजार असतील, तर आधुनिक वैद्यांचे मार्गदर्शन घ्या.
३. आहार आणि व्यायाम यांची योग्य सांगड आवश्यक !
व्यायामाचा अधिकाधिक लाभ करून घेण्यासाठी त्याला पूरक आहाराची आवश्यकता असते. आहारात आवश्यक ती सर्व पोषणतत्त्वे आपल्या प्रकृतीनुसार निवडून घ्यावीत. सर्वसाधारणपणे भारतीय जेवणात सर्व पोषणतत्त्वांचा समावेश असतोच; पण ‘स्वतःच्या प्रकृतीला काय आवश्यक आहे ?’, यानुसार वैद्यांचे मार्गदर्शन घेऊन त्यात न्यून-अधिक करू शकतो. ‘व्यायाम करणार्यांनी शक्यतो अतीतिखट अन्न खाणे टाळल्यास पचनक्रिया लवकर सुधारते’, असे लक्षात आले आहे.
४. पूर्ण धान्ये, फळे आणि भाज्या हा आहार सूक्ष्म जीवाणूंसाठी पूरक असणे
पूर्ण धान्ये (पूर्ण धान्य म्हणजे धान्याचा असा प्रकार, जो त्याच्या नैसर्गिक रूपात असतो आणि ज्यामध्ये धान्याचे सर्व भाग – ‘ब्रान (बाह्य आवरण)’, ‘एंडोस्पर्म (मध्य भाग)’ आणि ‘जर्म (आतील भाग)’ – कायम ठेवले जातात.), फळे आणि भाज्या हा आहार सूक्ष्म जीवाणूंसाठी पूरक असतो.
५. शक्यतो जेवणापूर्वी ३० मिनिटे आणि जेवणानंतर २ घंटे व्यायाम करू नये. जेवणाच्या वेळा प्रतिदिन नियमित ठेवाव्यात.’ (८.१२.२०२४)
– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा.