‘व्यायाम’ हाच मानेच्या समस्यांवरील कायमस्वरूपी उपाय आहे !

निरोगी जीवनासाठी व्यायाम – ३८

आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्‍या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. या लेखमालेतून आम्ही ‘व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन, ‘अर्गाेनॉमिक्स’चे (ergonomics चे) तत्त्व आणि आजारानुसार योग्य व्यायाम’, यांविषयीची माहिती सादर करणार आहोत. व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा हा प्रवास प्रेरणादायी ठरेल. योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास मानेच्या समस्या सुटण्यास निश्चित साहाय्य होईल. या लेखात आपण मानेसाठी आवश्यक असलेले व्यायामाचे प्रकार आणि कालावधी पाहूया.

‘मागील २० वर्षांत जगभरात मानेच्या त्रासांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अगदी वयाच्या २५ ते ३० व्या वर्षी मानेच्या मणक्यांच्या समस्या उद्भवल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. याला कारणीभूत असलेली बैठी जीवनशैली, प्रदीर्घ काळ संगणक आणि भ्रमणभाष वापरणे इत्यादींना जरी पर्याय नसला, तरी त्या दृष्टीने आपले शरीर सिद्ध करणे आपल्याच हातात आहे.

याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/865199.html

१. मानेचे कार्य 

मानेचे मुख्य कार्य ‘डोक्याला शरिराशी (धडाशी) जोडणे’, हे आहे. मान ही मेंदू आणि डोके यांच्या सर्व अवयवांना रक्तपुरवठा अन् संवेदना पोचवते, तसेच आपला दृष्टीक्षेप कार्यानुरूप वाढवण्यासाठी (सर्व बाजूंना पहाण्यासाठी) मानेचाच वापर करावा लागतो. ‘हालचाल करणे’, हा मानेचा प्रमुख गुण आहे.

श्री. निमिष म्हात्रे

२. मानेच्या मणक्याचे स्वास्थ्य त्यांच्या हालचालीवर अवलंबून असणे

अलीकडच्या काळात कामापासून मनोरंजनापर्यंत आपली मान एकाच स्थितीत स्थिर असते. बहुधा संगणकीय किंवा बैठी कामे करतांना, तसेच मोकळ्या वेळेत दूरचित्रवाणी संच आणि भ्रमणभाष बघतांनाही मानेची हालचाल फारशी होत नाही. मानेच्या मणक्याचे स्वास्थ्य हे त्यांच्या हालचालीवर अवलंबून असते. मानेची हालचाल पूर्ण असेल, तर मणक्याचे आजार लवकर होत नाहीत. मानेची हालचालच आजार दूर ठेवण्याचे सर्वोत्तम साधन आहे.

३. खांद्यांचा मानेवर होणारा परिणाम 

आपण एक प्रयोग करूया. ताठ बसून मानेची वर-खाली हालचाल करा आणि खांदे पुढे घेऊन पाठीला पोक काढून मग मानेची हालचाल करा. यामध्ये खांदे पुढे घेऊन पोक काढून बसल्यावर मानेची पूर्ण हालचाल शक्य होत नाही. यावरून ‘खांद्यांचा मानेवर कसा परिणाम होतो ?’, हे आपल्या लक्षात येते.

४. मानेसह खांद्यांचेही व्यायाम करणे आवश्यक ! 

मणक्यांना आधार देण्यासाठी आणि हालचाल टिकवून ठेवण्यासाठी मानेच्या स्नायूंमध्ये बळ असणे आवश्यक आहे. मान आणि डोके यांचे वजन मान अन् खांदे यांचे स्नायू एकत्रितपणे पेलतात. त्यामुळे मानेचे एकूण स्वास्थ्य हे बर्‍याच प्रमाणात खांद्यांच्या स्नायूंवर अवलंबून असते. मानेच्या स्नायूंवरील ताण दूर करण्यासाठी आणि ‘तो पुन्हा येऊ नये’, यासाठी मानेसह खांद्यांचेही व्यायाम करावेच लागतात.

मानेचे स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी आम्ही मान आणि खांदे यांच्या काही सोप्या व्यायाम प्रकारांची चलचित्रे (व्हिडिओज्) बनवली आहेत. ती आपण अवश्य पहावीत.

यासाठी समवेत दिलेली लिंक उघडून पहावी. https://youtube.com/playlist?list=PLF1n2ZzRX7FnAdARqAdPEtOmgTNZ3DZld&si=OtAnl_W1z_yiSZyu

ज्यांना मानेचे त्रास चालू झाले आहेत, त्यांनी वैद्यकीय सल्ला घेऊन हे व्यायाम करावेत.’ (१४.१२.२०२४)

– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा.

निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise