सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या वेळी पुणे जिल्‍ह्यातील साधकांना आलेल्‍या अनुभूती

‘११.५.२०२३ या दिवशी महर्षींच्‍या आज्ञेने फर्मागुडी, फोंडा येथे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्‍मोत्‍सव सोहळा साजरा करण्‍यात आला. या सोहळ्‍याला पुणे जिल्‍ह्यातून जुन्‍नर, मंचर, तळेगाव, पिंपरी, चिंचवड, पुणे शहर, भोर, शिरवळ या सर्व ठिकाणांहून एकूण १ सहस्र १०० साधक आले होते. यांत साधक, साधकांचे नातेवाईक, काही नव्‍याने जोडलेले धर्मप्रेमी, साधना सत्‍संगाच्‍या माध्‍यमातून जोडलेले जिज्ञासू हेही आले होते. या सोहळ्‍याला जाणार्‍या साधकांसाठी नियोजन करणार्‍या साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.   

(भाग १)

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाला गोव्‍याला जाणार्‍या साधकांचे नियोजन करतांना पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

पू. (सौ.) मनीषा पाठक

‘फोंडा, गोवा येथे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्‍मोत्‍सव (ब्रह्मोत्‍सव) कार्यक्रमाच्‍या आदल्‍या दिवशी पुण्‍यातून निघाल्‍यावर रात्रीची विश्रांती, सकाळी उठून वैयक्‍तिक आवरणे, अल्‍पाहार, दुपारचा महाप्रसाद, हे सर्व नियोजन गुरुदेवांनीच आमच्‍याकडून करवून घेतले. ७ मासांच्‍या बालकापासून ते ८० वर्षांच्‍या वृद्ध साधकापर्यंत सर्व वयोगटांतील व्‍यक्‍ती या सोहळ्‍याला प्रत्‍यक्ष आल्‍या होत्‍या.

जसे वारकरी विठ्ठलाच्‍या भेटीसाठी आतुर असतात, तसे साधक या ब्रह्मोत्‍सवाला जाण्‍यासाठी आतुर झाले होते. प्रवासाला जातांना प्रत्‍येक साधकाची भावजागृती होत होती. त्‍यामुळे साधकांना येणार्‍या अडचणी भावाच्‍या स्‍तरावर स्‍वीकारता आल्‍या. गुरुदेवांच्‍या कृपेने गोव्‍याहून परतीच्‍या प्रवासातही रात्री साधकांच्‍या जेवणाची व्‍यवस्‍था झाली. इतक्‍या रात्रीही त्‍यांना उपाहारगृह मिळून सर्व साधक तेथे जेवू शकले.

या सर्व नियोजनात पुणे जिल्‍ह्यातील काही साधक सेवा करत होते. त्‍यांनाही शिकायला मिळाले. प्रवासात साधकांना वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूतीही आल्‍या. प्रत्‍यक्ष ब्रह्मोत्‍सव पहातांना साधकांचा भाव जागृत झाला. गुरुदेवांच्‍या कृपेने आम्‍हा सर्वांना हा ब्रह्मोत्‍सव आणि गुरुदेवांची कृपा अनुभवता आली, यासाठी गुरुदेवांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– (पू.) सौ. मनीषा पाठक (सनातनच्‍या १२३ व्‍या (समष्‍टी संत), पुणे (जुलै २०२३)

१. सर्वश्री सागर शिरोडकर, अमोल मेहता, योगेश डिंबळे, एक साधक आणि चैतन्‍य तागडे (आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के, वय ३८ वर्षे)

१ अ. ‘साक्षात् सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना भेटायला जायचे आहे’, असा भाव ठेवल्‍याने सेवा करतांना कुठेच ताण किंवा कर्तेपणाचा विचारही न येणे : ‘आपल्‍याला सच्‍चिदानंद परब्रह्म

डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवासाठी जायचे आहे’, असा आम्‍हाला निरोप मिळाला. तेव्‍हा आम्‍ही साधकांना ‘वारकरी जसे ऊन, पाऊस आणि वारा या कशाचीही तमा न बाळगता विठ्ठलाच्‍या भेटीच्‍या ओढीने जातात, तसेच आपल्‍यालाही ब्रह्मोत्‍सवाला साक्षात् सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना भेटण्‍यासाठी जायचे आहे’, असा भाव ठेवण्‍यास सांगितले. आम्‍ही साधकांच्‍या प्रवासाचे नियोजन करतांना सतत हाच भाव ठेवल्‍याने आम्‍हाला प्रतिकूल परिस्‍थितीचा त्रास झाला नाही. सर्व साधक केवळ गुरुदेवांच्‍या भेटीच्‍या ओढीने जात असल्‍याने सर्वांच्‍या चेहर्‍यांवर आनंद होता. साधकांच्‍या प्रवासाच्‍या नियोजनाची सेवा करतांना आम्‍हाला कुठेच ताण आला नाही किंवा कर्तेपणाचीही जाणीव नव्‍हती.

१ आ. ब्रह्मोत्‍सवासाठी गोव्‍याला जाण्‍यासाठी ‘जुनावणे ट्रॅव्‍हल्‍स’ या आस्‍थापनाने साधकांना अल्‍प दरांत ‘बसेस’ उपलब्‍ध करून देणे : ब्रह्मोत्‍सवासाठी पुण्‍यातून शेकडो साधकांचे फोंडा येथे जाण्‍याचे, निवासाचे आणि परत येण्‍याचे असे २ दिवसांचे नियोजन करायचे होते. त्‍यासाठी आम्‍ही अनेक प्रवासी (ट्रॅव्‍हल्‍स) आस्‍थापनांना संपर्क केले; पण कोणत्‍याही आस्‍थापनाकडे एका ठिकाणी सर्व बसेस उपलब्‍ध होत नव्‍हत्‍या. तेव्‍हा गुरुदेवांच्‍या कृपेने पुण्‍यातील सर्वांत जुनी ट्रॅव्‍हल्‍स कंपनी ‘जुनावणे ट्रॅव्‍हल्‍स’ यांच्‍याकडे आम्‍हाला हव्‍या असलेल्‍या विविध प्रकारच्‍या, म्‍हणजे ‘एसी’(वातानुकूलित), ‘नॉन-एसी’ (वातानुकूलित नसलेल्‍या) आणि ‘स्‍लीपर’ (झोपण्‍याची सोय असलेल्‍या) अशा बसेस उपलब्‍ध झाल्‍या. त्‍यामुळे सर्व साधकांची जाण्‍या-येण्‍याची सोय चांगली  झाली. आस्‍थापनाच्‍या व्‍यवस्‍थापकांनी आध्‍यात्मिक कार्यक्रम असल्‍यामुळे अल्‍प मूल्‍य आकारण्‍याचे मान्‍य केले आणि साधकांना कोणताही त्रास होऊ दिला नाही.

साधकांची संख्‍या दिवसागणिक वाढत होती. साधक पुणे जिल्‍ह्याच्‍या १५ बसेस आणि ८४ चारचाकी वाहने यांनी आले. ही संपूर्ण सेवा करतांना आलेल्‍या अडचणींसाठी आम्‍ही पू. (सौ.) मनीषाताईंनी (पू. (सौ.) मनीषा पाठक, सनातनच्‍या १२३ व्‍या (समष्‍टी) संत यांनी) सांगितल्‍याप्रमाणे गुरुदेवांना आळवले. तेव्‍हा आम्‍हाला गुरुदेवांच्‍या अस्‍तित्‍वाची अनुभूती घेता आली.

१ इ. कोल्‍हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्‍ह्यांतील साधकांनी ब्रह्मोत्‍सवाला जाणार्‍या साधकांची अल्‍पाहार आणि दुपारचे जेवण यांसह निवासव्‍यवस्‍थाही करणे : साधक पुण्‍यातून निघाल्‍यावर त्‍यांचा मुक्‍काम कोल्‍हापूरला होता. साधकांना सकाळचा अल्‍पाहार आणि दुपारच्‍या जेवणाचे ‘पार्सल’ हेसुद्धा देवाच्‍या कृपेमुळे मिळाले. सद़्‍गुरु स्‍वातीताई (सद़्‍गुरु स्‍वाती खाडये) आणि पू. (सौ.) मनीषाताई यांनी स्‍वतः कोल्‍हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्‍ह्यांत जाऊन सर्व व्‍यवस्‍था पाहिली. खरे तर, एक सहस्र शंभर (११००) इतक्‍या साधकांची सर्व व्‍यवस्‍था करणे, ही पुष्‍कळ व्‍याप्‍ती असलेली सेवा होती; पण कोल्‍हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्‍ह्यांतील साधकांच्‍या सहकार्यामुळे नियोजन सहज शक्‍य झाले.

१ ई. ब्रह्मोत्‍सवाच्‍या सोहळ्‍याला जातांना आषाढी एकादशीला विठ्ठलाच्‍या भेटीला जाणार्‍या वारकर्‍यांप्रमाणे दिव्‍य सोहळा अनुभवण्‍यास मिळणे : ब्रह्मोत्‍सवाला जाण्‍यासाठी समन्‍वयाची सेवा करतांना आम्‍हा ५ साधकांना जराही थकवा जाणवला नाही. देवाने सर्व साधकांना गुरुदेवांच्‍या भेटीला घेऊन जाण्‍याचे नियोजन करण्‍याची सेवा दिली. सर्व साधकांच्‍या भावामुळे आम्‍हा सर्वांनाच ‘न भूतो न भविष्‍यति ।’ (अर्थ – ‘कधी मिळाला नाही आणि भविष्‍यात पुढेही मिळणार नाही’), असा आनंद मिळाला. त्‍या वेळी साधकांना आषाढी एकादशीला विठ्ठलाच्‍या भेटीला जाणार्‍या वारकर्‍यांप्रमाणे दिव्‍य सोहळा अनुभवायला मिळाला. त्‍याबद्दल गुरुदेवांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !

१ उ. प्रवास निर्विघ्‍नपणे होणे : ब्रह्मोत्‍सवानंतर परतीच्‍या प्रवासात रात्री ‘बसेस’ गगनबावडा घाटातून येतांना ‘बस’मध्‍ये रामाचा नामजप लावला होता. गाड्यांमध्‍ये भजने लावली होती. त्‍यामुळे तो अवघड प्रवासही निर्विघ्‍नपणे पार पडला. पूर्ण प्रवासात जातांना आणि येतांना कुठेही अडचण आली नाही. सर्व साधक सुखरूप गेले आणि परत आले. ही केवळ गुरुमाऊलींचीच कृपा !

२. श्री. सागर शिरोडकर

अ. साधकांच्‍या गोवा येथे जाण्‍याच्‍या प्रवासाचे नियोजन करतांना आमच्‍यामध्‍ये एखादा निर्णय घेतांना कधीही द्विधा मनस्‍थिती निर्माण झाली नाही, तसेच निर्णयही अतिशय गतीने घेतले गेले.

आ. पू. (सौ.) मनीषाताईंना विचारून निर्णय घेणे आणि प्रत्‍येक प्रसंगात एकमेकांचे मत घेणे, यांमुळे आम्‍हाला विचारून घेण्‍याची सवय लागली. आमच्‍यामध्‍ये प्रेमभाव वाढला.

इ. वाहतूक, निवासव्‍यवस्‍था आणि अन्‍य अडचणी यांविषयी आम्‍ही एकमेकांशी सतत बोलून घेत असल्‍यामुळे आम्‍हाला येणार्‍या अडचणी एकमेकांच्‍या लक्षात येऊ लागल्‍या आणि त्‍यांवर गुरुदेवांना शरण जाऊन अन् पू. (सौ.) मनीषाताईंना विचारून घेऊन कृती केल्‍याने आम्‍हा सर्वांना गुरुकृपा अनुभवता आली.

ई. वाहतूक आणि निवास यांमध्‍ये सतत पालट होत होते. त्‍यांना सामोरे जातांना आम्‍ही सतत वर्तमानकाळात रहायला शिकलो.

उ. साधकांचे वय आणि क्षमता बघता १२ घंट्यांपेक्षा अधिक प्रवास असूनही साधकांनी कसलीही तक्रार न करता सर्व प्रवास आनंदाने केला. त्‍यामुळे सर्वांना ब्रह्मोत्‍सवाचा आनंद अनुभवता आला. गुरुदेवांनी या माध्‍यमातून आमच्‍याकडून संघटितपणे प्रयत्न करून घेतले. त्‍याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.

सर्व सूत्रांसाठी दिनांक (१३.३.२०२४)

(क्रमशः)

भाग २ : https://sanatanprabhat.org/marathi/860082.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक