सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या वेळी पुणे जिल्‍ह्यातील साधकांना आलेल्‍या अनुभूती

‘११.५.२०२३ या दिवशी महर्षींच्‍या आज्ञेने फर्मागुडी, फोंडा येथे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्‍मोत्‍सव सोहळा साजरा करण्‍यात आला. या सोहळ्‍याला पुणे जिल्‍ह्यातून जुन्‍नर, मंचर, तळेगाव, पिंपरी, चिंचवड, पुणे शहर, भोर, शिरवळ या सर्व ठिकाणांहून एकूण १ सहस्र १०० साधक आले होते. यांत साधक, साधकांचे नातेवाईक, काही नव्‍याने जोडलेले धर्मप्रेमी, साधना सत्‍संगाच्‍या माध्‍यमातून जोडलेले जिज्ञासू हेही आले होते. या सोहळ्‍याला जाणार्‍या साधकांसाठी नियोजन करणार्‍या साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत. 

यातील काही भाग आपण ३ डिसेंबर या दिवशी पाहिला. आज त्‍यापुढील भाग पाहूया.            

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

(भाग २)

भाग १ : https://sanatanprabhat.org/marathi/859817.html

३. श्री. अमोल मेहता 

३ अ. ब्रह्मोत्‍सवाच्‍या सोहळ्‍याची सेवा करतांना ‘विठूरायाच्‍या दर्शनाला जात आहोत’, हा भाव ठेवल्‍याने मन शांत आणि स्‍थिर रहाणे : ब्रह्मोत्‍सवाला जाणार्‍या साधकांच्‍या समन्‍वयाची सेवा करतांना पू. (सौ.) मनीषाताईंनी ‘परिस्‍थिती कशीही आणि कोणतीही आली, तरीही आपल्‍याला नकारात्‍मक विचार करायचा नाही. प्रतिक्रिया व्‍यक्‍त करायच्‍या नाहीत. साधकांना आयोजकांच्‍या स्‍थितीला जाऊन समजून घ्‍यायचे आहे आणि १०० टक्‍के सकारात्‍मक राहून प्रयत्न करायचे आहेत’, असे सांगितले होते. त्‍यानुसार सेवा करतांना अनेकदा कठीण प्रसंग आले, तरी आमच्‍या मनाची स्‍थिती ढासळली नाही की, साधकांविषयी प्रतिक्रिया आल्‍या नाहीत. पू. (सौ.) मनीषाताईंनी ‘प्रत्‍येक साधकाला वैकुंठभूमीत घेऊन जायचे आहे’, असा भाव ठेवायला सांगितला. त्‍यामुळे ‘साधकांना समजून घेणे आणि त्‍यांच्‍या अडचणी लक्षात घेऊन त्‍यांना उपाय सांगणे’, असे प्रयत्न होत होते. साधकांच्‍या सूचीत वेळोवेळी पालट व्‍हायचेे. साधकांचे निर्णय पालटत होते, तरीही मन स्‍थिर होते. ‘प्रत्‍येक साधकाला गुरुदेवांच्‍या दर्शनासाठी घेऊन जायचे आहे’, असा भाव मनात रहात होता. ही सेवा करतांना ‘विठूरायाच्‍या दर्शनाला जात आहोत’, हा भाव ठेवल्‍याने मन शांत आणि स्‍थिर होते.

३ आ. समन्‍वयाची सेवा करतांना येणार्‍या अडचणींच्‍या वेळी अनुभवलेली गुरुकृपा

१. मला १ मास आधीपासून पित्ताचा (‘हायपर अ‍ॅसिडिटी’चा) पुष्‍कळ त्रास होत होता; मात्र ब्रह्मोत्‍सवासाठी ‘बस’गाड्यांचे नियोजन पहातांना अत्‍यल्‍प झोप होऊनही मला कोणताही शारीरिक त्रास झाला नाही. मला ही सेवा करतांना पुष्‍कळ आनंद मिळत होता.

२. ‘बस’गाड्या ठरवतांना अपेक्षित संख्‍येेत ‘बस’गाड्या मिळण्‍यात अडचण येत होती. त्‍या वेळी पू. (सौ.) मनीषाताईंनी सांगितल्‍याप्रमाणे आम्‍ही केवळ ‘गुरुदेव, गुरुदेव’ एवढेच शरणागतीने म्‍हणत होतो. तेव्‍हा ती अडचण लगेच सुटायची.

३. एका प्रसंगात एका ‘बस’मधील साधकांची लांजा (रत्नागिरी) येथे निवासव्‍यवस्‍था करायची होती; पण बसचालकाने तेथे जाण्‍यास नकार दिला. तेव्‍हा पू. (सौ.) मनीषाताई आणि सद़्‍गुरु स्‍वातीताई यांच्‍याशी संपर्क होत नव्‍हता. त्‍यामुळे मी गुरुदेवांना सूक्ष्मातून विचारले, ‘आता काय करू ?’ तेव्‍हा आतून उत्तर आले, ‘कोल्‍हापूर येथे त्‍यांची निवासव्‍यवस्‍था करू शकतो.’ त्‍यानुसार प्रयत्न केल्‍यावर कोल्‍हापूर येथे साधकांच्‍या घरी रहाण्‍यासाठी जागाही लगेच मिळाली.’

४. श्री. शशांक सोनवणे

अ. ‘मला नोकरीमुळे सेवा करता आली नव्‍हती. त्‍यामुळे पू. (सौ.) मनीषाताईंकडून ‘केंद्रातील साधकांच्‍या बस प्रवासाच्‍या समन्‍वयकाची सेवा तू करू शकतोस’, असा निरोप मिळाल्‍यावर मला पुष्‍कळ आनंद झाला आणि माझा कृतज्ञताभाव वाढला. ही सेवा करत असतांना मला ‘पुष्‍कळ सकारात्‍मकता, उत्‍साह आणि प्रसन्‍नता जाणवत होती.’

आ. या कालावधीत मला सहसाधकांकडून नियोजनातील बारकावे शिकायला मिळाले. जिल्‍हास्‍तरावर समन्‍वय करणारे साधक त्‍यांच्‍या व्‍यवसायाच्‍या नियोजनात व्‍यस्‍त असूनही ‘गुरुकार्यासाठी असलेले त्‍यांचे प्राधान्‍य, गुरूंच्‍या सेवेप्रती असलेला भाव आणि उत्तरदायी साधकांचे आज्ञापालन’, हे त्‍यांचे गुण मला प्रकर्षाने अनुभवता आले. ‘हे गुण माझ्‍यात निर्माण व्‍हावेत’, अशी इच्‍छा माझ्‍या मनात निर्माण झाली.

इ. प्रत्‍यक्ष पुण्‍यातून निघण्‍याच्‍या दिवशी बस आणण्‍यासाठी देवानेच मला नियोजित ठिकाणी वेळेपूर्वी पोचवले. वेळेपूर्वी पोचल्‍यामुळे मला तेथे अचानक उद़्‍भवलेल्‍या अडचणींसाठी समन्‍वय करायला पुरेसा वेळ उपलब्‍ध झाला. तेव्‍हा माझी भावजागृती झाली.

ई. प्रवासाच्‍या दिवशी रात्री घाटामध्‍ये वेडीवाकडे वळणे असल्‍याने ‘डाव्‍या बाजूची एक डिकी (साहित्‍य ठेवण्‍यासाठीचा जागा) आपोआप उघडली गेली’, हे चालकाच्‍याही लक्षात आले नाही. रस्‍त्‍यावरून जाणार्‍या एका व्‍यक्‍तीने ओरडून सांगितल्‍यामुळे हे लक्षात आले. याचा परिणाम म्‍हणून बाजूच्‍या वाहनाला धडक बसून अपघात होऊ शकला असता; परंतु गुरूंच्‍याच कृपेने असा कोणताही अनर्थ घडला नाही.

उ. पुण्‍यातून निघतांना प्रत्‍यक्षात त्‍याच डिकीमध्‍ये सर्व साधकांनी स्‍वत:चे सामान ठेवले होते; परंतु एका साधकाला ‘ते सामान या डिकीतून पडू शकते’, असे वाटल्‍याने ते सर्व सामान मागील सुरक्षित डिकीत ठेवण्‍यात आले. या प्रसंगावरुन ‘गुरूंनीच त्‍या साधकाच्‍या माध्‍यमातून जाणीव करून दिली’, अशी अनुभूती घेता आली.

ऊ. रात्रीचा प्रवास अतिशय घनदाट जंगलातून असूनही आम्‍ही सर्व साधक निवासस्‍थानी सुखरूप पोचलो. रात्रीच्‍या निवासाचे ठिकाण अतिशय पवित्र, म्‍हणजे सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांचे निवासस्‍थान होते. गुरुकृपेने ‘सद़्‍गुरूंच्‍या निवासस्‍थानी रहाण्‍याची व्‍यवस्‍था झाली’, यासाठी कृतज्ञता वाटत होती. दिवसभर एवढा प्रवास करूनही ‘सद़्‍गुरु स्‍वातीताईंच्‍या चैतन्‍यमय निवासस्‍थानी रात्री झोपूच नये’, असे मला वाटत होते. माझ्‍या साधनेचा आरंभ आणि सध्‍याचा साधनेचा प्रवास सद़्‍गुरु स्‍वातीताईंच्‍या कृपेमुळेच होत आहे. त्‍यांच्‍या निरपेक्ष प्रेमामुळे त्‍या मला संधी उपलब्‍ध करून देतात. त्‍या रात्री ‘प.पू. गुरुदेव आणि सद़्‍गुरु स्‍वातीताई यांना अपेक्षित असे मला घडता येऊ दे’, अशी श्री गुरूंच्‍या चरणी कळकळीने प्रार्थना झाली.

ए. प्रवासादरम्‍यान ‘समन्‍वयाची सेवा गुरुदेवच करवून घेत आहेत’, असा माझा भाव होता. इतर वेळी मी भावाच्‍या स्‍तरावर प्रयत्न करतांना माझे स्‍वभावदोष आणि अहं यांचे अडथळे येतात; मात्र ब्रह्मोत्‍सवाच्‍या माध्‍यमातून मला गुरुकृपा अनुभवता आली. ब्रह्मोत्‍सवाचा सोहळा पाहून माझे मन शांत झाले.

ऐ. परतीच्‍या प्रवासात वाटेत अचानक बसचे चाक ‘पंक्चर’ झाले. पहाटेची वेळ होती, तसेच गावही लहान असल्‍याने दुकाने बंद होती. साधकांना घरी वेळेत पोचायचे होते. अशा परिस्‍थितीमध्‍ये रस्‍त्‍यावरून जाणार्‍या एका गावकर्‍याने स्‍वत:हून थांबून चाकाची दुरुस्‍ती करण्‍यासाठी आवश्‍यक साधने उपलब्‍ध करून दिली आणि स्‍वतः ते चाक दुरुस्‍त करण्‍याचा प्रयत्नही केला. येथेही ‘गुरुदेव आपल्‍या पदोपदी सोबत आहेत’, अशी अनुभूती मला घेता आली.

ओ. ब्रह्मोत्‍सवाची सेवा करतांना अनेक प्रकारे सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्‍या कृपेची मी अनुभूती घेतली. ‘तेच आपले सर्वस्‍व आहेत. केवळ तेच आपला उद्धार करू शकणार आहेत’, या विचारांनी माझा कृतज्ञताभाव जागृत होत होता.

औ. गुरुमाऊलींच्‍या कृपाशीर्वादाने मला या सेवेत सहभागी होता आले आणि मला सेवेतील आनंद अन् चैतन्‍य अनुभवता आले, यासाठी गुरुदेवांच्‍या पवित्र चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

सर्व सूत्रांसाठी दिनांक (१३.३.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक