Land Jihad Karnataka Waqf Board : कर्नाटक वक्फ बोर्डाने एका गावातील शेतकर्‍यांच्या १ सहस्र २०० एकर भूमीवर केला दावा

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक वक्फ बोर्डाने राज्यातील विजयपुरा जिल्ह्यात असलेल्या तिकोटा तालुक्यातील होनवाडा गावावर त्याचा अधिकार सांगितला आहे. शाह अमिनुद्दीन दर्ग्याने येथील १ सहस्र २०० एकर भूमीवर हा दावा केला आहे. यानंतर राज्यातील काँग्रेस सरकारने ४१ शेतकर्‍यांना नोटीस पाठवली आहे. यावरून गावातील शेतकर्‍यांनी राज्याचे मंत्री एम्.बी. पाटील यांच्याकडे तक्रार केली. भाजपने या प्रकरणावरून काँग्रेस सरकारवर टीका केली आहे.

होनवाडा ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष सुनील शंकरप्पा तुडीगल म्हणाले की, ही भूमी शाह अमीनुद्दीन दर्ग्याच्या मालकीची असल्याचे नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे; परंतु हा दर्गा शतकानुशतके अस्तित्वात नाही, तर आमच्या कुटुंबांच्या भूमी पिढ्यान्पिढ्या आहेत. सरकारने नोटीस मागे न घेतल्यास आम्ही आंदोलन करू.

कर्नाटकचे मंत्री एम्.बी. पाटील यांनी ‘वक्फच्या मालकी व्यतिरिक्त कुणाच्याही भूमी घेतल्या जाणार नाही’, असे आश्‍वासन शेतकर्‍यांना दिले.

संपादकीय भूमिका

वक्फ कायदा म्हणजे मोगलांच्या आक्रमणापेक्षा भयंकर आहे. तो लवकरात लवकर रहित करणेच त्यावरील योग्य उपाय आहे. केंद्र सरकारने असे धाडस करणे आवश्यक आहे ! संपूर्ण हिंदु समाज सरकारच्या पाठीशी आहे.