Nawaz Sharif On S Jaishankar Visit : (म्हणे) ‘भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकला दिलेली भेट, हा उभय देशांमधील संबंधांचा नवा आरंभ !’

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे विधान

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी पाकिस्तानला भेट देणे, हा केवळ एक आरंभ आहे. आता दोन्ही देशांनी त्यांचा इतिहास मागे सोडून देऊन पुढे जायला हवे, असे वक्तव्य पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केले. ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या शिखर परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर १७ ऑक्टोबरला ते भारतीय पत्रकारांशी बोलत होते.

शरीफ पुढे म्हणाले की,

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः येथे आले असते, तर बरे झाले असते. असे असले, तरी डॉ. जयशंकर आले, हेही चांगलेच झाले. आपण ७५ वर्षे गमावली, आता पुढील ७५ वर्षांचा विचार करणे आवश्यक आहे.

२. पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वापरलेल्या असभ्य भाषेमुळे पाकचे भारतासमवेतचे संबंध बिघडले. अशी भाषा बोलणे सोडाच; पण नेत्यांनी असा विचारही करू नये.

३. मी दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला; पण ते पुन:पुन्हा बिघडले.

४. पंतप्रधान मोदी मला भेटायला लाहोरला आले होते. (२५ डिसेंबर २०१५ या दिवशी पंतप्रधान मोदी तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या नातवाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी लाहोरला गेले होते.)

५. माझ्या वडिलांच्या पारपत्रामध्ये त्यांचे जन्मस्थान भारतातील अमृतसर होते. आपली संस्कृती समान आहे. नेत्यांमध्ये चांगली वागणूक नसली, तरी दोन्ही देशांतील लोकांचे एकमेकांशी नाते चांगले आहे.

६. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंध पुन्हा प्रस्थापित झाले पाहिजेत. एकमेकांच्या देशांमध्ये संघ न पाठवण्याचा आपल्याला काही लाभ नाही.

७. भारतीय आणि पाकिस्तानी शेतकरी अन् उत्पादक यांनी आपापला माल विकायला अन्यत्र का जावे ? आता माल अमृतसरहून लाहोरमार्गे दुबईला जातो. याचा लाभ कुणाला होत आहे ?

संपादकीय भूमिका

भारताचे पाकसमवेतचे संबंध सुधारायचे असतील, तर पाकने त्याच्या भूमीवरून चालू असलेल्या जिहादी आतंकवादाचा नायनाट केला पाहिजे. यासह दाऊद इब्राहिम, जखिऊर रहमान लखवी, हाफीज सईद यांसारख्या कुख्यात आतंकवाद्यांना भारताकडे सुपुर्द केले पाहिजे, तसेच काश्मीरवरील त्याचा दावा मागे घेतला पाहिजे !