भारतातील गुजरात राज्यातील सौराष्ट्र भागात असलेले ‘सोमनाथ मंदिर’ हे देशात सर्वाधिक आक्रमण झालेले मंदिर म्हणून प्रसिद्ध असले, तरी या मंदिरात वैशिष्ट्यपूर्ण जडणघडण आहे. सोरटी सोमनाथ मंदिर महंमद गझनी आणि अन्य क्रूर आक्रमकांनी १७ वेळा तोडले अन् हिंदु राजांसह-प्रजेने १७ वेळा त्याची पुनर्उभारणी केली.
भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले हे ज्योतिर्लिंग आहे. हिंदु संस्कृती, सभ्यता आणि श्रद्धास्थाने यांवर कितीही भयावह आक्रमणे झाली, ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तरी ती पुन्हा नवतेजाने, चैतन्याने पुन्हा उभी रहाते, याचे प्रतीक सोमनाथ मंदिर आहे.
१. सोमनाथाची उत्पत्ती
दक्ष प्रजापती यांनी सोमाच्या (चंद्राच्या) एका अपराधामुळे चिडून ‘त्याचा क्षय होईल’, असा शाप दिला. या शापामुळे दु:खी होऊन सोम भगवान शंकराकडे जातो. तेथे तो भगवान शिवाला शापाविषयी सांगून यातून मुक्तीचा उपाय विचारतो. भगवान शिव सोमाला ‘हा एक आशीर्वाद समजून कृतस्मल पर्वताजवळील एका प्राचीन तीर्थाच्या ठिकाणी जाऊन तपश्चर्या कर’, असे सांगतात. याच जागेवर सोमाने १ सहस्र वर्षे तपश्चर्या केल्यावर सोमाला त्याचे तेज पुन्हा प्राप्त होते. त्यामुळे या जागेला प्रभासक्षेत्र म्हणतात.
२. सोमाकडून मंदिराची उभारणी
७ कोटी ९९ लाख २५ सहस्र वर्षांपूर्वी वैवस्वत मन्वंतरात त्रेतायुगात सोमाने त्याचे आराध्यदेव भगवान शिवाचे अतिशय भव्य सुवर्णमंदिर बांधले. हे मंदिर श्रद्धा, भक्ती आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे. १२ ज्योतिर्लिंगांमध्ये सोमनाथ हे पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते.
भगवान शिवाचा परमभक्त रावणानेही सोने, चांदी आणि रत्ने यांचा वापर करून एका भव्य शिवमंदिराची निर्मिती केल्याचे दाखले आहेत.
याच सौराष्ट्रातील स्थानावर जंगलामध्ये पहुडलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या पायाला जरा नावाच्या एका पारध्याने सोडलेला बाण लागला आणि इ.स.पूर्व ३१०२ मध्ये चैत्र शुक्ल प्रतिपदेला दुपारी २ वाजून २७ मिनिटांनी याच ठिकाणी श्रीकृष्णाने स्वत:च्या मानवी देहाचा त्याग केला. हरि आणि हर यांच्या मीलनाचे हे एक अद्भुत स्थान आहे.
त्यानंतर अनेक शतके लोटली गेली. येथे भगवंताची भक्ताकडून भक्तीने आराधना होत होती.
३. शिवसमुदायाचे बळकटीकरण
स्कंदपुराणानुसार दुसर्या शतकाच्या प्रारंभी भगवान शिवाचे भक्त असलेल्या पाशूपत ब्राह्मणांनी या ठिकाणी शिव समुदायाचे बळकटीकरण केले. तिसर्या शतकात प्रभासक्षेत्री व्यापार उदीम पुष्कळ वाढला होता. त्या वेळी भारताच्या बाहेरूनही व्यापारी प्रभासक्षेत्री येऊन रत्ने घेऊन जात आणि त्या बदल्यात सोने-चांदी देत.
४. ज्ञान आणि संस्कृती यांचे मीलन अन् भारताचा सुवर्णकाळ
८ व्या शतकात चालुक्य आणि प्रतिहार राजांनी तिसर्या वेळी मंदिराचा जीर्णाेद्धार केला. या मंदिरात रत्ने, सोने यांनी आच्छादलेले खांब होते, अतिशय मौल्यवान हिरे, माणिक यांनी संपूर्ण मंदिर आच्छादलेले होते.
सोमनाथ मंदिरातील शिवपिंडी ही चुंबकीय शक्तीच्या आधारे हवेत तरंगत होती. यावरून तेव्हा भारतीय विज्ञानाची प्रगल्भता लक्षात येते. शिवपिंडी भूमीपासून काही अंतरावर स्थापित होती. हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटे. मंदिरात १ टनहून अधिक वजनाची सोन्याची घंटा सोन्याच्या साखळीने वाजवली जात होती. हा भारताचा सुवर्णकाळ होता. सहस्रो ब्राह्मण वेदमंत्रांचे उच्चारण करत, तर ५०० हून अधिक नर्तिका भगवान शिवासमोर नृत्य सादर करत असत. यामुळे मंदिर अखंड चैतन्याने आणि भक्तीरसाने ओतप्रोत भरलेले होते.
भारतभरातील राजे, महाराजे या ठिकाणी येऊन सोमनाथाचे दर्शन घेत, या ठिकाणची व्यवस्था चांगली होण्यासाठी मोठा दानधर्म करत.
५. महंमद गझनीचे आक्रमण
सिंधच्या पलीकडे महंमद गझनीला सोमनाथातील अपार धनसंपदेची माहिती मिळाली होती. ही संपत्ती लुटण्यासाठी आणि मूर्ती नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने ६ जानेवारी १०२६ या दिवशी ३० सहस्र घोडेस्वार, ८४ सहस्र उंटस्वार आणि ८४ सहस्र सैनिक यांच्या साहाय्याने सोमनाथ मंदिरावर आक्रमण केले. मंदिराच्या रक्षणासाठी ५० सहस्रांहून अधिक शिवभक्तांनी जिवाची पर्वा न करता लढाई केली; मात्र क्रूर गझनीने सर्वांचे शिरकाण करून सोमनाथ मंदिरातील अगणित संपत्ती सहस्रो हत्ती, घोडे यांवर लादून गझनीला नेली.
मुसलमान आक्रमक मंदिरावर आक्रमण करून मंदिर तोडत, तर नंतर शिवभक्त, हिंदु राजे आणि साधू एकत्र येऊन पुन्हा मंदिराचे बांधकाम करत.
वर्ष १३०० मध्ये अल्लाउद्दीन खिलजी, वर्ष १३४५ मध्ये महंमद तुघलक, वर्ष १३९५ मध्ये मुझ्झफर शाह, वर्ष १४९० मध्ये महंमद बेगडा, तर शेवटचे आक्रमण औरंगजेबाने केले होते. त्याचप्रमाणे पोर्तुगीज दिग्रॅस्तो यानेही मंदिरावर आक्रमण केले. वर्ष १७८३ मध्ये इंदूरची राणी अहिल्यादेवी होळकर आणि ग्वाल्हेरचे श्रीमंत पाटीलबुवा शिंदे यांनी सोमनाथ मंदिराच्या अवशेषांजवळच दुसरे मंदिर उभारले. जे आजही अस्तित्वात आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी बांधलेल्या सोमनाथ मंदिरात अभिषेकादी धार्मिक विधी होतात.
सोमनाथ मंदिराला आद्यशंकराचार्य यांच्यापासून स्वामी विवेकानंद यांच्यापर्यंत अनेक महापुरुषांनी भेट देत यात्रा केली आहे.
६. सोमनाथभक्त महाराणी चोलादेवी
महाराणी चोलादेवी या स्वत: एक महाराणी होत्या, त्याचप्रमाणे त्या एक उत्तम नर्तकीसुद्धा होत्या. त्या नृत्याच्या माध्यमातून भगवान शिवाची भक्ती करत होत्या. त्या निरंतर भगवान शिवाची आराधना करत होत्या. त्यांचा विवाह गुजरातचे महाराज भीमदेव यांच्यासमवेत झाला, तरी त्यांचे मन राजप्रासादात रमले नाही. त्या मनाने भगवान शिवाजवळ असत. एक दिवस त्यांनी राजप्रासादाचा कायमचाच त्याग केला आणि पुन्हा सोमनाथ मंदिरात पोचल्या. त्यांनी भगवान शिवाच्या उपासनेत नृत्य चालू केले आणि भगवान शिवासाठी शेवटचे नृत्य करून त्यांनी भगवान शिवाच्या चरणी प्राणत्याग केला.
७. सरदार पटेलांकडून सोमनाथ मंदिराच्या जीर्णाेद्धाराचा संकल्प
भारत स्वतंत्र झाल्यावर जुनागढाच्या नवाबाने जुनागढ संस्थान पाकमध्ये विलीन करण्याचे ठरवले; मात्र लोकांनी याविरुद्ध मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणी केली आणि ३ मासांच्या विरोधानंतर जुनागढ संस्थान भारतात विलीन झाले. विक्रम संवत्सरच्या नवीन वर्षाचा प्रारंभ, म्हणजे १३ नोव्हेंबर १९४७ मध्ये सरदार वल्लभभाई पटेल हे स्वत: सोमनाथ क्षेत्री आले आणि सोमनाथाला वंदन करून जीर्णाेद्धाराचा संकल्प केला. वर्ष १९५१ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी मंदिराचे भूमीपूजन केले आणि नंतर बनलेले मंदिर आज दिसते आहे.
८. दक्षिण ध्रुवापर्यंत जलमार्ग दाखवणारा सोमनाथ मंदिरातील दिशास्तंभ !
या मंदिराच्या परिसरात एका दिशास्तंभाची उभारणी केली आहे. यावर दिशादर्शक त्रिशूळ असून खाली संस्कृतमध्ये लिहिले आहे, ‘या तिराच्या दिशेने सरळ गेल्यास दक्षिण ध्रुवापर्यंत वाटेत कोणतीही भूमी असणार नाही, केवळ जलमार्गच असणार.’ हा ज्योतीमार्ग आश्चर्यकारक आहे. खरोखरच त्या मार्गात भूमीचा प्रदेश नाही. आपल्या पूर्वजांनी शेकडो वर्षांपूर्वी हा मार्ग कसा शोधून काढला असणार, हे आश्चर्यच आहे.
सोमनाथ मंदिर हे समुद्राला लागूनच आहे. मंदिराच्या परिसरातील संरक्षण भिंतीना लाटा येऊन आदळत असतात, जणू त्या सोमनाथाचा प्रतिदिन अभिषेक करत असतात, असेच वाटते. सोमनाथ मंदिराचा इतिहास सांगणारा ‘लाईट अँड साऊंड शो’ रात्री मंदिर परिसरात असतो. त्यातून मंदिराचा वैभवशाली इतिहास सांगण्यात येतो.
९. भगवान श्रीकृष्णाशी संबंधित स्थाने
सोमनाथ येथे भालका तीर्थ मंदिर आहे. येथेच व्याधाचा बाण श्रीकृष्णाच्या पायाच्या अंगठ्याला लागला. त्या जवळ देहोत्सर्ग तीर्थ आहे. येथे भगवान श्रीकृष्णाने हिरण नदीच्या काठी नीजधामाला प्रस्थान केले. या ठिकाणी गीता मंदिरही आहे. येथून काही अंतरावर बलदेव गुहा आहे, ज्या ठिकाणी बलरामानेही देहत्याग करून नीजधामी प्रस्थान केले.
सोमनाथ येथे पांडवकालीन गुहा, त्याचप्रमाणे हिरण, कपिला आणि सरस्वती या नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे.
अशा प्रकारे हरि आणि हर यांच्या मीलनाचे हे अनोखे स्थान शतकानुशतके भक्तांना ईश्वरप्राप्तीसाठी, ध्येयप्राप्तीसाठी प्रेरणा, शक्ती आणि ऊर्जा प्रदान करत आहे.’
श्री गुरुचरणार्पणमस्तु ।
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (२५.८.२०२४)