सात्त्विक राख्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन !
‘श्रावण मासातील पौर्णिमेला साजरा केला जाणारा रक्षाबंधन हा दिवस, म्हणजे बहीण-भावाचे नाते घट्ट करणारा दिवस. या दिवशी बहिणीने भावाचे रक्षण होण्यासाठी, भावाच्या मनगटावर राखी बांधण्याची परंपरा फार पूर्वीपासून, म्हणजे द्वापरयुगात आरंभ झाली. भगवान श्रीकृष्णाच्या बोटातून होणारा रक्तस्राव थांबवण्यासाठी बहीण द्रौपदीने स्वतःच्या साडीचा तुकडा भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला बांधला आणि तेव्हापासून बहिणीने भावाचे अन् भावाने बहिणीचे रक्षण करण्याचा हा दिवस साजरा केला जात आहे. राखीच्या या पवित्र बंधनातून भावाला आध्यात्मिक स्तरावर लाभ होत असतो.
‘राखी सात्त्विक अथवा असात्त्विक असणे यांचा राखीच्या स्पंदनांवर, तसेच ती बांधून घेणार्या व्यक्तीच्या प्रभावळीवर काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यात आले. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला.
१. चाचणीतील निरीक्षणे
या प्रयोगात ४ राख्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर त्यांपैकी सर्वाधिक सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने असणार्या १-१ राख्या निवडून त्या राख्या एका व्यक्तीला बांधण्यापूर्वी अन् बांधल्यानंतर २० मिनिटांनी त्या व्यक्तीच्या चाचण्या करून त्याच्यावर होणारा परिणाम अभ्यासण्यात आला.
१ अ. चाचणीतील ४ पैकी ३ राख्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आढळून येणे : राख्यांची निरीक्षणे पुढे दिली आहेत.
वाचकांना सूचना : पुढील लेखात सोनेरी रंगाचे प्लास्टिकचे फूल असणार्या राखीचा उल्लेख ‘असात्त्विक राखी’ आणि सनातन-निर्मित राखीचा उल्लेख ‘सात्त्विक राखी’ असा करण्यात आला आहे.
२. चाचणीचे निष्कर्ष
२ अ. राखी सात्त्विक अथवा असात्त्विक असणे यांचा राखीच्या स्पंदनांवर, तसेच व्यक्तीवर परिणाम होणे : असात्त्विक राखीमध्ये मूलतः नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ आढळली. त्यामुळे व्यक्तीला ही राखी बांधल्यानंतर व्यक्तीमध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आणि त्याच्यातील सकारात्मक स्पंदने पुष्कळ घटली. याउलट सात्त्विक राखीमध्ये मूलतः सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ आढळली आणि व्यक्तीला ही राखी बांधल्यानंतर तिच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन तिच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पुष्कळ वाढली.
२ आ. राख्यांवरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण काढून मग त्यांचा उपयोग करावा ! : आजकाल वातावरण रज-तमप्रधान असल्याने राख्यांवर त्रासदायक स्पंदनांचे आवरण येण्याची शक्यता असते. त्यामुळे बाजारातून राख्या आणल्यावर त्यांवरील आवरण काढून मग त्यांचा उपयोग करावा. हे आवरण काढण्यासाठी त्यांना थोडा वेळ ऊन दाखवू शकतो किंवा ‘सनातन’निर्मित सात्त्विक उदबत्तीच्या धुराने शुद्धी करू शकतो. यामुळे राखीतील त्रासदायक स्पंदने नाहीशी होतील आणि ती बांधल्यावर व्यक्तीला आध्यात्मिक लाभ होईल.
३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. असात्त्विक राखी रज-तमप्रधान असल्याने तिच्यामध्ये नकारात्मक स्पंदने आढळणे : राखी बनवण्यासाठी ज्या घटकांचा वापर केला जातो, राखी बनवणारी व्यक्ती ज्या हेतूने ती राखी बनवते, तसेच राखीचा रंग आणि त्यावर असणारी नक्षी, या सर्वांचा राखीच्या प्रभावळीवर परिणाम होतो, तसेच ज्या व्यक्तीला ही राखी बांधणार, तिच्या प्रभावळीवरही परिणाम होतो. असात्त्विक नक्षी असलेली राखी बनवण्यासाठी वापरलेले घटक आणि राखीची रंगसंगती तामसिक असल्यामुळे तिच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळून आली. या राखीवर त्रासदायक स्पंदनांचे आवरणही होते.
३ आ. सनातनच्या साधकांनी बनवलेल्या सात्त्विक राख्या सत्त्वप्रधान असल्याने त्यांच्यामध्ये सकारात्मक स्पंदने आढळणे : सनातन-निर्मित राख्या सनातनच्या साधकांनी नामस्मरण करत बनवलेल्या आहेत. त्यामुळे त्या मूलतः सात्त्विक आहेत. या राख्यांची रंगसंगतीही सात्त्विक आहे. या राख्या बनवण्याचा उद्देश व्यावसायिक नसून ‘समाजाला सात्त्विकता मिळावी’, हा असल्याने सनातन-निर्मित राख्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा नसून सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा आढळून आली. ही राखी बांधल्यावर चाचणीतील व्यक्तीतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन तिच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढली. थोडक्यात ‘राखीची स्पंदने चांगली (सात्त्विक) असतील, तर व्यक्तीला राखी बांधल्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो’, हे या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात येते.’ (२७.८.२०२३)
– श्री. गिरीश पंडित पाटील, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
इ-मेल : [email protected]