सनातन संस्‍थेच्‍या वतीने देशभरात ७७ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्‍सव’ भक्‍तीमय वातावरणात साजरा !

मुंबई – हिंदु धर्मातील अद्वितीय अशी श्रेष्‍ठ परंपरा म्‍हणजे ‘गुरु-शिष्‍य परंपरा’ होय ! गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी गुरूंप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍याची परंपरा अनादी काळापासून चालू आहे. गुरुपौर्णिमेला नेहमीपेक्षा १ सहस्रपटीने कार्यरत असलेल्‍या गुरुतत्त्वाचा लाभ समाजाला घेता यावा, यासाठी २१ जुलै २०२४ या दिवशी सनातन संस्‍थेच्‍या वतीने देशभरात ७७ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यामध्‍ये मराठी भाषेत ६४ ठिकाणी, हिंदी भाषेत ८, तामिळ भाषेत २, तर गुजराती आणि मल्‍ल्‍याळम् भाषेत प्रत्‍येकी एका ठिकाणी ‘गुरुपौणिमा महोत्‍सवां’चे आयोजन करण्‍यात आले होते. महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्‍यासपूजा आणि सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्‍तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

काही ठिकाणी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्‍या गुणवंत विद्यार्थ्‍यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मान्यवर वक्‍त्‍यांनी ‘आनंदप्राप्‍ती आणि रामराज्‍याची स्‍थापना यांसाठी साधना’ या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले, ‘रामराज्‍यरूपी हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना होणार’, ही काळ्‍या दगडावरची रेघ आहे. रामराज्‍याचे आपल्‍याला साक्षीदार नाही, तर साथीदार व्‍हायचे आहे. आपणही रामराज्‍यात रहाण्‍यासाठी साधना करत धर्माचरणी बनले पाहिजे. सर्वोच्‍च प्रतीचा सतत टिकणारा आनंद केवळ साधनेनेच मिळतो. आपल्‍याला ईश्‍वरप्राप्‍ती करायची ओढ असो वा नसो, एक चांगले समाधानी जीवन जगता येण्‍यासाठीही साधना करणे महत्त्वाचे आहे. त्‍यामुळेच गुरुपौर्णिमेच्‍या निमित्ताने साधना करण्‍याचा आणि ती वाढवण्‍याचा संकल्‍प करायला हवा.’ गुरुपौर्णिमा महोत्‍सवात ‘स्‍वसंरक्षण प्रात्‍यक्षिके’ही दाखवण्‍यात आली.

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ७१ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्‍सव उत्‍साहात साजरा !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने देशभरात मराठी, बंगाली, तेलगु, कन्‍नड आणि हिंदी भाषांमध्ये ७१ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्‍सव’ मोठ्या उत्‍साहात पार पडला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे साधक आणि जिज्ञासू त्‍या त्‍या ठिकाणी मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍व विद्यालया’च्‍या वतीने गुरुपौर्णिमा महोत्‍सव साजरा !

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍व विद्यालया’च्‍या वतीने मुंबई आणि कर्नाटकातील बेंगळुरू येथे इंग्रजी भाषेत, तर नाशिक येथे मराठी भाषेत गुरुपौर्णिमा महोत्‍सव मोठ्या उत्‍साहात साजरा झाला. या वेळी श्री व्‍यासपूजा करण्‍यात आली. त्‍यानंतर महर्षी अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे कार्य, अभ्‍यासक्रम आणि संशोधनकार्य यांचा संक्षिप्‍त परिचय करून देण्‍यात आला. ‘गुरु-शिष्‍य परंपरा आणि सनातन धर्माची वैज्ञानिकता’ या विषयावर मार्गदर्शन करण्‍यात आले. त्‍यानंतर ‘टेम्‍पल रिसर्च’ या विषयावरील व्‍हिडिओचे प्रसारण करण्‍यात आले.

गुरुपौर्णिमा सोहळ्‍यात सनातनच्‍या ग्रंथांचे प्रकाशन

२१ जुलै या दिवशी कतरास (झारखंड) येथील सोहळ्‍यात हिंदी भाषेतील ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवलेजी की अनमोल सीख खंड २ – आचरण एवं सूक्ष्म आयाम से सिखाना’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्‍यात आले, तर चेन्‍नई येथील सोहळ्‍यात तमिळ भाषेतील ‘गुरूंचे महत्त्व’ आणि ‘गुरूंचे वागणे’ या ग्रंथांचे प्रकाशन करण्‍यात आले.