‘मला फेब्रुवारी २०२५ मध्ये दोन स्वप्ने पडली. मला स्वप्नात दिसलेली दृश्ये आणि त्यातून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. ‘सातत्याने देवाचे साहाय्य घेण्याचा संस्कार मनावर दृढ करायला हवा’, हे लक्षात येणे
१ अ. स्वप्नात दिसलेले दृश्य : ‘एकदा मला स्वप्नात दिसले, ‘मी एका उंच ठिकाणी असलेल्या माळ्यावर अडकून पडले आहे. मला तिथून खाली उतरायला भीती वाटत होती. त्या वेळी खाली माझे कुटुंबीय एकमेकांशी गप्पा मारत होते. मी त्यांना मला साहाय्य करण्याविषयी सांगायला हाका मारल्या; मात्र कुणाचेही माझ्याकडे लक्ष नव्हते. जणू काही माझी हाक त्यांच्यापर्यंत पोचत नव्हती. त्यामुळे मी त्यांना पुनःपुन्हा हाका मारत होते. त्यानंतर मी तिथून खाली येण्याचा प्रयत्न करत होते; परंतु मला ते शक्य होत नव्हते. मला एक प्रकारची हतबलता आली होती. मला त्या स्थितीत पुष्कळ भीती वाटत होती.’
१ आ. मनाची विचारप्रक्रिया : त्यानंतर मला जाग आली. तेव्हा माझ्या मनात पहिला विचार आला की, ‘मी माझ्या कुटुंबियांना मला साहाय्य करण्यासाठी हाका मारत होते; परंतु मी माझ्या गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) हाक मारायला पूर्णपणे विसरून गेले होते. मी त्यांना हाक मारली असती, तर त्यांनी मला नक्कीच क्षणात साहाय्य करून खाली उतरवले असते.’ त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘सातत्याने देवाचे साहाय्य घेण्याचा संस्कार मनावर अजून दृढ व्हायला हवा आणि ते करायला मी न्यून पडत आहे.’
२. आपत्काळात ‘गुरूंचे नित्य स्मरण’, हीच संजीवनी असणे
२ अ. स्वप्नात दिसलेले दृश्य : एकदा मला स्वप्नात दिसले, ‘मी घरी आहे. काही अनिष्ट शक्ती मला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या वेळी मी माझ्या आजूबाजूला ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ किंवा अन्य काही सात्त्विक उत्पादने आहेत का ?’, हे शोधण्याचा प्रयत्न करत होते; परंतु मला ते सापडत नव्हते. तेव्हा मला वाटले, ‘त्या शक्तीशी लढायला माझ्याकडे सात्त्विक वस्तू असे काहीच नाही.’ त्याच वेळी माझ्या तोंडून उस्फूर्तपणे ‘प.पू. भक्तराज महाराज की जय’, असे म्हटले गेले आणि ती शक्ती लगेच पळून गेली.’
२ आ. मनाची विचारप्रक्रिया : त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘आपत्काळात स्थुलातून सात्त्विक उत्पादने किंवा ज्यातून स्वतःवर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होतील (आकाशतत्त्वाचे उपाय होण्यासाठी रिकामा खोका इत्यादी), अशा वस्तू मला उपलब्ध होऊ शकतील, असे नाही; मात्र ‘गुरूंचे स्मरण’ आपल्याला नित्य साथ देणारे आहे. त्याचा संस्कार आपल्या मनावर व्हायला हवा. गुरुदेवांनी ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’ हे तत्त्व सांगितले आहे आणि आता त्याचा मला सातत्याने अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. असे केले, तरच आपत्कालीन स्थितीत सहजपणे मी हे करू शकेन.’
‘गुरुदेवांनी ही सूत्रे माझ्या लक्षात आणून दिली’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.३.२०२५)
|