धर्मशिक्षणवर्गात सांगितल्याप्रमाणे दत्तगुरूंचा नामजप केल्याने अनेक वर्षे होणारा आध्यात्मिक त्रास न्यून झाल्याचे अनुभवणार्‍या पुणे येथील सौ. वर्षा पांचाळ !

१. डोळ्यांसमोर असंख्य स्वरूपात अक्राळ विक्राळ आकृत्या दिसणे आणि नंतर त्या मानवी सांगाड्यांच्या रूपात दिसणे

मला माझ्या दुसर्‍या मुलाच्या जन्मानंतर पुढील त्रास चालू झाला. मला उघड्या डोळ्यांनी देखील अक्राळ विक्राळ आकृत्या दिसू लागल्या. त्या असंख्य स्वरूपात असायच्या. नंतर त्या मानवी सांगाड्यांच्या रूपात दिसू लागल्या.

२. मानसोपचार तज्ञांचे समुपदेशन आणि औषधे घेऊन अन् काही आध्यात्मिक व्यक्तींनी सांगितलेले उपाय करूनही त्रास न थांबणे

सौ. वर्षा अजित पांचाळ

त्यावर उपाय म्हणून मी मानसोपचार तज्ञांचे समुपदेशन घेतले. मागील दोन वर्षांपासून मी त्यांची औषधे घेत आहे. ती औषधे घेतल्यावर मला दिवसभर झोप येते. ती औषधे घेऊनही माझ्यामध्ये पालट झाला नाही; मात्र आर्थिक व्यय अधिक होत असल्याने माझा मानसिक ताण मात्र वाढत होता. मला होणार्‍या त्रासाबद्दल आम्ही काही आध्यात्मिक व्यक्तींनाही विचारले. त्यावर त्यांनी ‘तुम्हाला पितृदोष आहे’, असे सांगून उपाय करण्यास सांगितले; परंतु त्याने विशेष असा परिणाम जाणवला नाही.

३. धर्मशिक्षणवर्गात जाऊ लागल्यावर तिथे सांगितल्याप्रमाणे कुलदेवीचा आणि पितृदोषांसाठी दत्ताचा नामजप करण्यास आरंभ करणे

वर्ष २०२४ मध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी आमच्या परिसरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन झाले. मीसुद्धा त्या प्रवचनाला गेले होते. त्या प्रवचनात कुलदेवीचा नामजप आणि पितृदोषांसाठी दत्ताचा नामजप यांचे महत्त्व सांगितले. ते ऐकून मी नियमित नामजप करू लागले. माझ्यासोबत माझी मुलगी आणि मुलगाही नामजप करायला बसायचे. नामजप केल्याने मला शांत वाटू लागले. धर्मशिक्षणवर्गामध्ये सेवेचे महत्त्व समजल्यावर मी धर्मप्रेमींना बोलावणे, प्रवचन ठरवणे, धर्मशिक्षणवर्गाची पूर्वसिद्धता करणे, मंदिर स्वच्छतेमध्ये सहभागी होणे, धर्मप्रेमींना संपर्क करणे या सेवांमध्ये पुढाकार घेऊन प्रयत्न करू लागले

४. धर्मशिक्षणवर्गात जाऊ लागल्यावर त्रास न्यून होणे आणि ‘दत्तगुरूंच्या नामजपामुळे तुमचा त्रास न्यून झाला’, असे धर्मशिक्षणवर्ग घेणार्‍या साधकाने सांगणे

त्यानंतर मी धर्मशिक्षणवर्गात जायला प्रारंभ केल्यावर तेथे मला सांगितल्याप्रमाणे कृती करत गेले. मला त्याचा १०० टक्के लाभ झाला. आता मला त्या आकृत्या दिसणे बंद झाले आहे. याबद्दल मी धर्मशिक्षणवर्ग घेणार्‍या साधकाला सांगितल्यावर त्यांनी मला सांगितले, ‘‘दत्तगुरूंच्या नामजपामुळे तुमचा त्रास न्यून झाला.’’ त्यांचे हे बोलणे ऐकल्यावर माझी पुष्कळ भावजागृती झाली.’

– सौ. वर्षा अजित पांचाळ, मोई, पुणे. (जानेवारी २०२५)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक