बीजिंग (चीन) – रशियाचे पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर व्लादिमिर पुतिन चीनच्या २ दिवसांच्या दौर्यावर आहेत. हा दौरा रशिया-युक्रेन युद्धाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे; कारण रशियाचे सैन्य युक्रेनच्या खार्किव शहरात शिरकाव करत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पुतिन यांचे भव्य स्वागत केले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेते द्विपक्षीय संबंध आणि लोकांशी संबंधित आंतरराष्ट्रीय अन् प्रादेशिक सूत्रे यांवर चर्चा करतील. पुतिन चीनचे पंतप्रधान ली कियांग यांचीही भेट घेणार आहेत.
१. आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी ‘अल् जझीरा’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘चीनने युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला पाठिंबा देत रहावे’, अशी मागणी पुतिन करतील.
२. रशिया-युक्रेन युद्धाच्या आरंभीच्या काळात पुतिन आणि जिनपिंग म्हणाले होते की, उभय देशांतील परस्पर भागीदारीला मर्यादा नाहीत.
३. गेल्या वर्षी मार्चमध्ये जिनपिंग यांनी रशियाला भेट दिली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, हा दोन्ही देशांमधील नवीन युगाचा आरंभ आहे.
चीनच्या अपेक्षा !
जिनपिंग रशियाकडून स्वस्त दरात गॅस आयात करणे आणि ‘पावर ऑफ सायबेरिया’ नावाच्या पाइपलाईनविषयी चर्चा करतील. या पाइपलाइनद्वारे रशिया सायबेरियातून मंगोलियामार्गे चीनला गॅस पुरवतो.
रशियाच्या आशा !
या वेळी पुतिन युक्रेनविरुद्ध आधुनिक शस्त्रे आणि लांब पल्ल्याच्या ड्रोनचा करार करण्याचा प्रयत्न करतील.