नव्या १०० नेपाळी रुपयांच्या नोटेवर नेपाळच्या नकाशात भारताचा काही भाग दाखवल्यावरून दर्शवला होता विरोध !
काठमांडू (नेपाळ) – नेपाळच्या नव्या चलनी नोटांवर नेपाळचा नकाशा छापण्यात येणार आहे. त्यामध्ये काही भारतीय प्रदेशांना नेपाळचा भाग दाखवण्यात येणार असल्याने नेपाळच्या राष्ट्रपतींचे आर्थिक सल्लागार चिरंजीबी नेपाळ यांनी जाहीर विरोध दर्शवला होता. ‘नेपाळ सेंट्रल बँके’चे गव्हर्नर राहिलेले चिरंजीबी यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केल्याने त्यांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली होती. यावरून आता त्यांनी स्वत:च पदाचे त्यागपत्र दिले आहे.
१. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील नेपाळ मंत्रीमंडळाने १०० रुपयांच्या नवीन नोटा छापण्याचा निर्णय घेतला. यावर भारताच्या लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी भागांचा समावेश असलेला नेपाळचा नवीन नकाशा दर्शवण्यात येणार आहे.
२. भारताच्या एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत चिरंजीबी यांनी चलनी नोटांवर भारतीय भाग दर्शवण्याच्या सरकारच्या निर्णयाला ‘अतार्किक’ म्हटले होते. चिरंजीबी यांच्या या वक्तव्याचा माजी पंतप्रधान, तसेच अन्य अनेक राजकारणी यांनी विरोध करत त्यांना पदावरून हटवण्याची मागणीही केली होती.
३. यापूर्वी १८ जून २०२० या दिवशी नेपाळच्या घटनेत दुरुस्ती करून नेपाळने एकतर्फीपणे लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा हे आपला प्रदेश म्हणून घोषित केले. हे तिन्ही क्षेत्र ऐतिहासिकदृष्ट्या भारतासमवेत आहेत. भारताने नेपाळच्या या कृतीचे वर्णन ‘एकतर्फी कृत्य’ म्हणून केले, तसेच नेपाळकडून प्रादेशिक दाव्यांचा कृत्रिम विस्तार ‘अक्षम्य’ असल्याचे म्हटले होते.
संपादकीय भूमिकामालदीवप्रमाणेच नेपाळही चीनच्या तालावर नाचून आत्मघातच करत आहे. दक्षिण आशियाई पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याकडून ही सर्वार्थाने इवलीशी राष्ट्रे काही शिकणार नसतील, तर दैवाने तरी त्यांची साथ का द्यावी ? |