कतारमध्ये भारतीय नागरिकांची फाशीपासून सुटका !

‘कतारमध्ये कार्यरत असलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी आणि १ खलाशी यांची हेरगिरीच्या आरोपातून नुकतीच मुक्तता झाली अन् ते थेट मायदेशी भारतात परतले. त्यांच्यावर कतारने दीड वर्षापूर्वी इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचे आरोप ठेवले होते आणि त्यांना थेट मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती.

सुटका झालेल्या निवृत्त नौदल अधिकार्‍यांपैकी काही जण

१. कतारमध्ये कार्यरत असलेले नौदलाचे निवृत्त अधिकारी आणि खलाशी यांना मृत्यूदंडाची शिक्षा

कतार स्वतःचे नौदल बळकट करू इच्छित होता. त्यासाठी त्याने ‘अल् दहारा ग्लोबल टेक्नॉलॉजी’ आस्थापनाला कंत्राट दिले होते. त्या वेळी भारतीय नौदलातून निवृत्त झालेले ७० कर्मचारी नेमण्यात आले होते. नौदल बळकट करण्यासाठी आणि तेल व्यापार सुरक्षित व्हावा, यासाठी कतार पाणबुड्याही सिद्ध करत होता. त्यासाठीच आस्थापनाने केलेला अहवाल म्हणे थेट अमेरिका आणि इस्रायल येथे पोचला. त्या आस्थापनात इतर देशांचे आणि स्थानिक कर्मचारी होते; पण हेरगिरीचा आरोप मात्र थेट भारतीय निवृत्त नौदल अधिकार्‍यांवर ठेवला गेला. त्यामुळे कतारमध्ये कार्यरत असलेले नौदलाचे ७ निवृत्त अधिकारी आणि १ खलाशी यांना उत्तरदायी ठरवून थेट मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

२. भारतीय नौदल अधिकार्‍यांना सोडवण्यासाठी भारताचे शर्थीचे प्रयत्न

संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामानाविषयीच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते. तेथे त्यांची कतारचे अमीर यांच्या समवेत बैठक झाली. ‘त्यात हा विषय हाताळला जाईल’, अशी आशा होती. मृत्यूदंडाच्या शिक्षेला निवृत्त नौदलाचे अधिकारी आणि खलाशी यांनी त्यांचे अपिल प्रविष्ट केले. त्यानंतर मृत्यूदंडाची शिक्षा रहित होऊन त्यांना कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. यातच भारतीय मुत्सद्देगिरीचा अर्धा विजय झाला होता. पुढील काम परराष्ट्र्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर आणि सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे सोपवले गेले. गेले अनेक मास ते कतारच्या संपर्कात होते. शेवटी त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले. त्यामुळे अलीकडेच भारतीय नौदलाचे निवृत्त कर्मचारी भारतात सुखरूप परतले.

३. भारत आणि कतार यांच्यातील व्यापारी संबंधांचा परिणाम !

भारत आणि कतार यांच्यात मोठ्या प्रमाणावर व्यापार होतो. सध्या भारताला लागणारा ४० टक्के नैसर्गिक वायू कतारमधून आयात करण्यात येतो. या कराराचे वर्ष २०२८ मध्ये नूतनीकरण करायचे होते; पण त्याच्या ४ वर्षे अलीकडेच या कराराचे नूतनीकरण होऊन ‘हा करार आता वर्ष २०४८ पर्यंत राहील’, असे ठरले. सध्या भारताचा कतारशी अंदाजे १ सहस्र ५०० कोटी डॉलर्सचा (१ लाख २४ सहस्रांहून अधिक कोटी रुपये) व्यापार आहे. कतारमध्ये त्याच्या लोकसंख्येच्या २० टक्के कर्मचारी भारतीय आहेत. जगभरातून जे कर्मचारी म्हणून कतारमध्ये जातात, त्यातील ९० टक्के कामगार केवळ भारतातून तेथे गेलेले असतात. हा आर्थिक दृष्टीकोन आणि भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे महत्त्व लक्षात घेऊन कतारने सर्व ७ निवृत्त नौदल अधिकारी आणि एक खलाशी यांना सोडण्याचा निर्णय घेतला.

४. पंतप्रधान मोदी, परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर आणि अजित डोवाल यांच्या मुत्सद्देगिरीला यश !

सध्या भारत व्यापारानिमित्त इस्रायल, अमेरिका, संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया यांच्या समवेत आहे. मागे झालेल्या ‘जी-२०’ परिषदेत (भारत आणि युरोपमधील १९ देशांच्या अर्थमंत्र्यांची संघटना) भारत-पश्चिम आशिया-युरोप या आर्थिक महामार्गाची घोषणा झाली. कतार आणि इराण हे देश अन्य आखाती देशांपासून वेगळे असून त्यांचा एक वेगळा गट आहे. त्यामुळे कतार हा हमास आणि तालिबानी आतंकवादी यांच्याविषयी सहानुभूती असणारा देश आहे. भारताचे इतर आखाती देशांसमवेत संरक्षणाविषयीचे संबंध आहेत, हेही कतारला सहन होत नव्हते. अशा अनेक कारणांमुळे भारतीय नौदल अधिकार्‍यांवर मृत्यू घोंगावत होता; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कणखर नेतृत्व, तसेच भारतीय परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर आणि अजित डोवाल यांनी केलेल्या मुत्सद्देगिरीमुळे या प्रकरणात यश मिळाले.

मागील १० वर्षांत जेव्हा जेव्हा विदेशात रहाणारे भारतीय नागरिक संकटात सापडले होते, तेव्हा तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी त्या सर्वांना सोडवले. रशिया आणि युक्रेन यांच्या भयंकर युद्धातून सहस्रो भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या मायदेशी परत आणले, तसेच कोविड महामारीच्या काळातही अडकलेले अनेक भारतीय सुखरूप मायदेशी परतले.

५. भारत लवकरच विश्वगुरु होईल, म्हणजेच ‘हिंदु राष्ट्र’ स्थापित होईल !

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव सध्या पाकिस्तानात हेरगिरीच्या आरोपावरून अटकेत आहेत. त्यांनाही वर्ष २०१७ मध्ये मृत्यूदंडाची कठोर शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्व आणि एक महाशक्ती म्हणून भारताचा होत असलेला उदय या गोष्टी लक्षात घेऊन पाकिस्तान आजपर्यंत जाधव यांच्या केसालाही हात लावू शकला नाही. यातून एक गोष्ट लक्षात येते की, राजा प्रजाहितदक्ष असला की, जनतेचे रक्षण होते. अशा वेळी प्रजाहितदक्ष चक्रवर्ती राजांचा पुरातन काळ आठवल्याविना रहात नाही. अशा वेळी भारत लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वगुरु होईल, म्हणजेच ‘हिंदु राष्ट्र’ स्थापित होईल, अशी आशा बाळगूया !’

श्रीकृष्णार्पणमस्तु ।

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (१५.२.२०२४)