Bilaspur Teacher Video : बिलासपूर (छत्तीसगड) येथील सरकारी शाळेत दारू पिणारा शिक्षक निलंबित !

मद्यधुंद शिक्षक संतोष कुमार केवट

बिलासपूर (छत्तीसगड) – येथील एका प्राथमिक शाळेत संतोष कुमार केवट नावाच्या एका मद्यधुंद शिक्षकाचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. हा शिक्षक शाळेमध्ये दारू पित होता. या वेळी व्हिडीओमध्ये तो ‘तुम्हाला कुणाला दारू पाहिजे, तर सांगा. शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी आदी कुणीही मला काहीही करू शकत नाहीत’, असे म्हणतांना दिसत आहे. हा व्हिडिओ मस्तुरी ब्लॉक अंतर्गत मचाहा प्राथमिक शाळेचा आहे. हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत मद्यधुंद शिक्षकाविरुद्ध चौकशी करण्याचे निर्देश दिले. ज्यामध्ये सदर घटना खरी असल्याचे आढळून आले. त्यानंतर मद्यधुंद शिक्षकाला जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांनी निलंबित केले आहे. या प्रकरणी गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

१. शिक्षक संतोष कुमार केवट दारूच्या नशेत शाळेत पोचल्याचे सांगण्यात आले. या वेळी त्याच्या शर्टाच्या खिशात दारूची बाटली होती. तो मुलांसमोर विचित्र कृत्य करत होता, ज्याला पाहून एका तरुणाने शिक्षकाचा व्हिडिओ बनवण्यास आरंभ केला. मद्यधुंद शिक्षक संतोष कुमार प्रार्थनेसाठी रांगेत उभ्या असलेल्या मुलांजवळ गेला. आधी तो मुलांना म्हणाला, ‘आता झाले, घरी जा, आज सुट्टी आहे.’ यानंतर तो मुलांना घेऊन वर्गाच्या दिशेने गेला. काही वेळातच तो जेवण घेऊन शाळेच्या कर्मचार्‍यांच्या खोलीमध्ये गेला. त्यानंतर त्याने दारूची बाटली बाहेर काढली आणि मुख्याध्यापिका तुलसी चौहान यांच्यासमोर न डगमगता दारू पिण्यास सुरुवात केली.

२. या वेळी व्हिडिओ बनवणार्‍या तरुणाने साहाय्यक शिक्षक संतोषकुमार केवट याला दारूच्या बाटलीविषयी विचारले असता तो म्हणाला की, आमची निवड आहे, आम्ही काहीही करू शकतो. ही माझी इच्छा आहे. तुला काय करायचे आहे ? मी प्रतिदिन पितो. कोणतीही अडचण नाही. माझ्याकडे सर्व काही आहे. मी कुणाला घाबरत नाही. आयुष्यात खूप ताण असतो.

संपादकीय भूमिका

जे शिक्षक स्वतःच व्यसनी आहेत, ते विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ? अशांना अटक करून कारागृहात टाकले पाहिजे !