Puja Started At Gyanvapi : ज्ञानवापीच्या ‘व्यास’ तळघरात रात्रीपासूनच पूजेला प्रारंभ !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील ज्ञानवापी परिसरातल्या व्यास तळघरात जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर ३१ वर्षांनी पूजेला प्रारंभ करण्यात आला. ३१ जानेवारीला न्यायालयाने दुपारी ४ च्या सुमारास पूजा करण्यास आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी पूजेची व्यवस्था करून दिल्यानंतर रात्री ११ च्या सुमारास पूजा आणि शयन आरती करण्यात आली. तळघरात मूर्ती ठेवून पूजन करण्यात आले. दीपप्रज्वलन करून श्री गणेश आणि लक्ष्मीदेवी यांची आरती करण्यात आली. तळघराच्या भिंतीवरील त्रिशूळासह इतर धार्मिक प्रतीकांचीही पूजा करण्यात आली. तळघराच्या मार्गावर लावण्यात आलेले अडथळे आणि लोखंडी कुंपण हटवण्यात आले आहे.

या संदर्भात हिंदु पक्षकारांचे अधिवक्ता मदन मोहन यादव यांनी सांगितले की, या तळघरात असलेल्या मूर्तींची पूजा आणि आरती करण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रशासनाला न्यायालयाने ७ दिवसांची मुदत दिली होती; मात्र काही घंट्यांतच प्रशासनाने व्यवस्था करून दिल्यानंतर पूजा आणि आरती करण्यात आली.

हिंदु पक्षकार दिवसांतून ५ वेळा करणार आरती !

सध्या येथे सर्वसामान्य नागरिकांना दर्शन आणि पूजा करण्यास प्रवेश देण्यात आलेला नाही. हिंदु पक्षकारांनाच सध्या पूजा आणि आरती करण्याची अनुमती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

रातोरात अशी झाली व्यवस्था !

वाराणसी जिल्हा न्यायालयाने ३१ जानेवारी या दिवशी दुपारी ४ च्या सुमारास पूजा करण्याचा आदेश दिला होता. यानंतर जिल्हाधिकारी एस्. राजलिंगम् सायंकाळी ७ वाजता पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासमवेत काशी विश्‍वनाथ धाम येथे पोचले. जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी मंदिर प्रशासनासमवेत बैठक घेतली. रात्री ८ वाजता अधिकार्‍यांनी ज्ञानवापीच्या तळघराची बाहेरून तपासणी केली. रात्री ९ वाजता काशी विश्‍वनाथ मंदिरात दर्शनासाठी येणार्‍यांची गर्दी अल्प झाल्यानंतर प्रशासनाने गेट क्रमांक ४ मधून लोकांना प्रवेश बंद केला. कडेकोट बंदोबस्तात ९.३० च्या सुमारास विश्‍वनाथ मंदिराच्या पूर्वेकडील अडथळे (बॅरिकेड्स) हटवण्याचे काम चालू झाले. घंट्याभरात सर्व अडथळे हटवण्यात आले. यानंतर काशी विश्‍वनाथ ट्रस्टच्या कर्मचार्‍यांनी व्यास तळघराची स्वच्छता केली. ट्रस्टतर्फे पूजेचे साहित्य तळघरात आणण्यात आले. ट्रस्टच्या ५ पुजार्‍यांना बोलावले. त्यानंतर प्रार्थना करण्यात आली. पूजेच्या वेळी वाराणसीचे आयुक्त, काशी विश्‍वनात मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आचार्य गणेश्‍वर शास्त्री द्रविड आणि पंडित ओमप्रकाश मिश्रा तळघरात उपस्थित होते. श्री. गणेश्‍वर शास्त्री द्रविड यांच्या नेतृत्वाखाली विश्‍वनाथ मंदिराचे पुजारी ओमप्रकाश मिश्रा यांनी पूजा केली. ओमप्रकाश मिश्रा हे काशी विश्‍वनाथ मंदिराच्या गर्भगृहाचे पुजारी आहेत. पूजेनंतर काही लोकांना चरणामृत आणि प्रसादही देण्यात आला. आचार्य गणेशवर शास्त्री द्रविड यांनी कलशाची स्थापना केली. त्यानंतर मंत्रोच्चार करून श्री गौरी, श्री गणेश आणि श्री लक्ष्मीदेवी यांना आवाहन करण्यात आलेे. पुराधिपतीच्या अंगणात सर्व देवतांचे स्मरण आणि पूजा करण्यात आली. देवतांना नैवेद्य, फळे अर्पण करून आरती करण्यात आली. याविषयी वाराणसीचे जिल्हाधिकारी एस्. राजलिंगम् म्हणाले की, मी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले.

तळघराच्या ठिकाणी काशी विश्‍वनाथाचे मंदिरच आहे ! – जितेंद्र नाथ व्यास

देवाची पूजा आणि आरती करण्याचा अधिकार मिळाला, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. ज्ञानवापीच्या तळघरात आम्ही पूजा केली. आमचे कुटुंबीय आणि ५ पुजारी या वेळी उपस्थित होते. तसेच आयुक्तही उपस्थित होते. त्या सगळ्यांच्या उपस्थितीत आम्ही तळघरात पूजा आणि आरती केली, असे व्यास कुटुंबातील जितेंद्र नाथ व्यास यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, तळघराच्या ठिकाणी काशी विश्‍वनाथाचे मंदिरच आहे. ते स्वयंभू मंदिर होते आहे आणि राहिल. तुम्ही ते झाकले, तरीही ते मंदिरच आहे. भिंतींवर स्वस्तिक, कमळ यांच्या आकृत्या आहेत. हे हिंदु मंदिरच आहे.

(म्हणे) ‘न्यायालयाचा निर्णय चुकीचा !’ – असदुद्दीन ओवैसी

असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, न्यायाधिशांनी घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. हे ‘धार्मिक पूजा स्थळ कायदा १९९१’चे उल्लंघन आहे. ३० वर्षांनंतर मशिदीच्या तळघरात पूजा करण्यास अनुमती देण्यात आली आहे. तिथे मूर्ती कुठे आहेत ? मूर्ती कुणी पाहिल्या ?

येथे ‘६ डिसेंबर’ची (बाबारी ढाचा पाडल्याची) पुन्हा पुनरावृत्ती होऊ शकते. श्रीराममंदिर खटल्याचा निकाल देतांना आम्ही श्रद्धेच्या आधारावर निकाल दिल्याचे सांगितले होते. आता या गोष्टी भविष्यातही चालू रहाणार आहेत. तुम्ही व्यवस्था समितीला आव्हान देण्यासाठी ३० दिवसांचा अवधी दिला असता. आता व्यवस्था समिती या चुकीच्या निर्णयाविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात दाद मागू शकते.

मुसलमान पक्षाने हिंदु पक्षाच्या पूजेच्या अधिकारावर स्थगिती आणण्याची केली मागणी !

ज्ञानवापी प्रकरणातील मुसलमान पक्षकार असलेल्या अंजुमन इंतेजामिया मशीद कमेटीने जिल्हा न्यायालयाकडे निवेदन दिले आहे. त्यामध्ये हिंदु पक्षाला दिलेला पूजेचा अधिकार स्थगित करण्यात यावा, तसेच मुसलमान पक्षाला त्यांची भूमिका ठेवण्यासाठी १५ दिवस देण्यात यावेत. ‘यातून आम्हाला आमची भूमिका अधिक सशक्तपणे ठेवता येईल’, असे मुसलमान पक्षाचे म्हणणे आहे. यावर अतिरिक्त जिल्हा न्यायाधिशांनी सुनावणी करत सांगितले की, आता जिल्हा न्यायाधिशांचे पद रिक्त असल्याने त्यांची नियुक्ती झाल्यानंतरच पुढील सुनावणी होईल.

संपादकीय भूमिका

वर्ष १९९३ ला तत्कालीन सरकारने तोंडी आदेश देऊन वर्ष १५५१ पासून चालू असलेली येथील पूजा बंद केली ते चुकीचे होते, असे ओवैसी कधी म्हणतील का ?