दांभिकतेची अडगळ !

‘इथला राम वेगळा, तिथला राम वेगळा’, यात ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी नवीन वेगळे काय सांगितले ? ते सर्वांना ठाऊक आहे. भारताबाहेरीलही काही देशात श्रीरामाच्या अस्तित्वाच्या खुणा दिसून येतात. राम सर्वव्यापी आणि विश्वव्यापी आहे. ५०० वर्षांच्या संघर्षानंतर २२ जानेवारी या दिवशी भारताच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण साजरा झाला. त्याचे मनापासून स्वागत करण्याऐवजी नेमाडे आणि इतर काही विघ्नसंतोषी मंडळी त्यात बिब्बा घालत आहेत. खरे तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परकीय आक्रमणाच्या ज्या ज्या खुणा होत्या, त्या पुसण्याचे काम देशाचे पंतप्रधान या नात्याने जवाहरलाल नेहरू यांनी करायला हवे होते. सरदार वल्लभभाई पटेल आणि इतरांनी ठोस अन् ठाम भूमिका घेतली; म्हणून सोरटी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार तरी झाला. हे पुष्कळ मोठे आणि महत्त्वाचे काम त्या वेळी होऊन गेले. तो जिर्णोध्दार निर्विघ्नपणे पार पडू नये म्हणून नेहरूंनी अडथळे निर्माण केलेच; पण सरदार वल्लभभाई पटेल पुरून उरले आणि हिंदुद्वेषी नेहरू अन् काँग्रेसच्या नाकावर टिच्चून सोरटी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. ते झाले नसते, तर अयोध्या, काशी, मथुराप्रमाणे तीही डोकेदुखी ठरली असती.

भालचंद्र नेमाडे

१. पराकोटीचा हिंदुद्वेष विरोधकांना खड्डयात घालणार !

‘राम आणि रामायण निव्वळ कवीकल्पना आहे. राम अयोध्येत त्या जागीच जन्मला याचा पुरावा काय ?’, रामसेतूचे अस्तित्व ज्यांनी नाकारले, अशी आणि ज्योतिष, शुभ-अशुभ, मुहूर्त, देव यांची ज्यांनी आजवर टिंगलटवाळी केली, हेटाळणी केली, ती ही मंडळी श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा याविषयी काहीही बरळत आहेत. हिंदु धर्म, संस्कृती, अस्मिता आणि देवीदेवता यांविषयी तुम्ही जितके म्हणून वाईट बरळाल, टीका कराल, ते तुम्हालाच खड्डयात घालणारे ठरणार आहे.

श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने सकल हिंदू एक होत आहे. अयोध्येतील श्रीराममंदिर हे नेहरू ते डॉ. मनमोहन सिंह यांपैकी कोणत्याही पंतप्रधानाने उभारण्यात पुढाकार घेतला असता आणि ते करून दाखवले असते, तर आम्ही त्यांचेही कौतुक केले असते अन् आतासारखा आनंदोत्सव साजरा केला असता. असे असले, तरी पराकोटीचे अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आणि पराकोटीचा हिंदुद्वेष हाच तुमचा एककलमी कार्यक्रम होता अन् यापुढेही रहाणार आहे.

२. विचारांची समृद्ध अडगळ साफ होणे महत्त्वाचे !

काशी, मथुरा आणि अयोध्या ही भारत अन् हिंदु यांच्या अस्मितेची प्रतिके आहेत. भगवान शिव, श्रीकृष्ण, श्रीराम हे भारताचे मानबिंदू आहेत. ‘आधी काशी, आता अयोध्या आणि येत्या काही वर्षांत मथुराही परकीय, विध्वंसक, लुटारू, आक्रमक इस्लामी बेडीतून मुक्त होईल’, असा विश्वास सर्व भारतियांना वाटतो आहे. त्यामुळे भालचंद्र नेमाडे आणि इतरांनी कितीही चोची मारल्या, तरी काही फरक पडणार नाही. तथाकथित पुरोगामी, दांभिक समाजवादी, साम्यवादी, सर्वधर्मसमभावी आणि हिंदुद्वेषी या सर्वांचे बुरखे आता टराटरा फाटत आहेत. यामुळे या अशा विचारांची समृद्ध अडगळ साफ केली जात आहे.

– श्री. शेखर जोशी (१८.१.२०२४)
(साभार : फेसबुक)