रायगडावरील वाघ्या श्वानाची समाधी हटवा ! – छत्रपती युवराज संभाजीराजे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

छत्रपती युवराज संभाजीराजे

पुणे – रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी असलेली वाघ्या श्वानाची (कुत्र्याची) समाधी ३१ मेपूर्वी काढून टाकावी, अशी मागणी छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. वाघ्या नामक श्वानाचा शिवकालीन इतिहासामध्ये कुठलाही उल्लेख किंवा संदर्भ सापडत नाही. भारतीय पुरातत्त्व विभागानेही सदर समाधी सरंचना आणि वाघ्या श्वानाचे ऐतिहासिक महत्त्व याविषयी त्यांच्याकडे कोणतीही माहिती अन् पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती केली आहे, असेही पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी वर्ष २०१२ मध्ये वाघ्या श्वानाचा पुतळा तेथून फेकून दिला होता. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. पोलिसांनी तो पुतळा शोधून पुन्हा त्याच ठिकाणी बसवला होता.

इतिहास काय सांगतो ?

वाघ्या हे श्वान (कुत्रा) छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळीव कुत्रा असल्याचे मानले जाते. ‘वाघ्या’ नावाच्या श्वानाचा पुतळा वर्ष १९३० च्या दशकामध्ये त्याच्या निष्ठा आणि शौर्याच्या सन्मानार्थ उभारण्यात आला होता. वर्ष १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर वाघ्या नावाच्या या श्वानाने त्यांच्या चितेत उडी मारून स्वत:हून प्राणत्याग केला असल्याचे सांगितले जाते.

रायगडावरील वाघ्याच्या अस्तित्वाचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध !

वाघ्याची समाधी हटवणे म्हणजे शिवद्रोह ! – इतिहास अभ्यासक संजय सोनवणी

वर्तुळात इतिहास अभ्यासक संजय सोनवणी

पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ्या कुत्र्याच्या अस्तित्वाचा ऐतिहासिक पुरावा उपलब्ध असल्याचे इतिहास अभ्यासक संजय सोनवणी यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाचे पुरावे सादर केले. जर्मन संशोधकांनी १८३४ ते १८५४ दरम्यान केलेल्या अभ्यासात रायगडावरील वाघ्याच्या समाधीचा स्पष्ट उल्लेख आढळतो. वर्ष १९१९ मध्ये राम गणेश गडकरी यांनी लिहिलेल्या ‘राजसंन्यास’ या पुस्तकातही या श्वानाचा उल्लेख आहे. गडकरी हे ब्राह्मण नसून कायस्थ होते, असेही सोनवणी यांनी स्पष्ट केले.

सोनवणी यांनी संभाजी ब्रिगेडवर टीका केली. त्यांनी म्हटले की, पुरातत्त्व विभागाने वाघ्याच्या समाधीविषयी नकारात्मक भूमिका घेतली असल्याचा दावा करणार्‍यांनी त्याचे कागदोपत्री पुरावे सादर करावेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका केली. वाघ्या कुत्र्याच्या समाधीस्थळी काही अनुचित घटना घडल्यास धनगर समाज शांत रहाणार नाही, अशी चेतावणीही त्यांनी दिली, तसेच रायगड स्मारक समितीच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. संभाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली झालेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगून त्यांना समितीच्या अध्यक्षपदावरून दूर करण्याची मागणी केली. वाघ्याच्या समाधीविषयी सरकारने तज्ञ समिती नेमावी, अशी मागणीही त्यांनी केली.