अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरच श्रीरामाचे मंदिर होण्यासाठी दिलेले योगदान !

जगविख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ ब्रिज बासी लाल यांचे रामजन्मभूमी खटल्यातील योगदान !

ब्रिज बासी लाल

२ मे १९२१ या दिवशी झाशी येथे जन्मलेले ब्रिज बासी लाल (बी.बी. लाल) हे देशातील ख्यातनाम पुरातत्वशास्त्रज्ञ आहेत. ते १९६८ ते १९७२ या कालावधीत भारतीय पुरातत्व विभागाचे मुख्य संचालक होते. त्यांनी युनेस्कोसह अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये काम केले आहे. ते संस्कृत भाषा आणि वेदांचेही तज्ञ आहेत. ख्यातनाम ब्रिटीश पुरातत्वतज्ञ मार्टिमर व्हिलर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या विषयांचा अभ्यास चालू केला. वर्ष १९७५ ते १९८० या काळात रामजन्मभूमी परिसरातील १४ ठिकाणचे संशोधन त्यांच्या हाती सोपवण्यात आले. याच काळात त्यांनी बाबरीच्या ढाच्याखाली आणि त्या परिसरात व्यापक उत्खनन केले. त्यातून त्यांनी बाबरीपूर्व काळात त्याच स्थानी हिंदूंचे भव्य मंदिर होते, हे पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. त्यांनी या संदर्भात दिलेला अहवाल रामजन्मभूमी प्रकरणात न्यायालयाने पुरावा म्हणून स्वीकारला आहे. याच उत्खननामुळे लाल यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली. वर्ष २००८ मध्ये त्यांचे ‘राम, त्याचे ऐतिहासिकत्व, मंदिर व सेतू : साहित्य, पुरातत्व आणि इतर शास्त्रीय पुरावे’ या नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यातही त्यांनी ‘बाबरीच्या ठिकाणी पूर्वी हिंदु मंदिर कसे होते ?’, याचे पुरावे दिले आहेत. त्यांना वर्ष २००० मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


नोकरी जाण्याची वेळ आली असतांनाही श्रीराममंदिराविषयी ठाम भूमिका घेणारे प्रा. महंमद !

प्रा. महंमद

श्रीरामजन्मभूमी प्रकरणात पुरातत्वीय आणि ऐतिहासिक पुरावे पूर्णपणे हिंदूंच्या बाजूने होते. वर्ष १९७६-१९७७ मध्ये ज्येष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञ बी.बी. लाल यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत उत्खनन करून पुरावे गोळा करणार्‍या समूहामध्ये पुरातत्व खात्याचे माजी संचालक पद्मश्री के.के. महंमद यांचाही सहभाग होता. वर्ष १९९० मध्ये इरफान हबीब, रोमिला थापर इत्यादी साम्यवादी इतिहासकारांनी वृत्तपत्रांत विधाने प्रसिद्ध केली की, अयोध्येतील बाबरी ढाच्यात उत्खननात काहीही सापडले नाही आणि तो ढाचा सपाट भूमीवर उभा आहे. ‘पुरातत्वशास्त्रज्ञ प्र्रा.बी.बी. लाल यांनाही उत्खननात काहीही आढळले नाही’, असे खोटेच सांगितले गेले. त्यामुळे ‘बाबरी ढाच्याच्या खाली मंदिर असल्याचा पुरावा आहे’, असे म्हणणे चुकीचे असल्याचा दावा या साम्यवाद्यांनी वर्तमानपत्रात केला. दुसर्‍या दिवशी प्रा. लाल यांनी वर्तमानपत्रांना मुलाखत देऊन सांगितले की, साम्यवाद्यांनी चुकीचे तथ्य प्रसिद्ध केले आहे. तेथे मंदिराचे अस्तित्व असल्याचे पुरावे मिळाले आहेत. यानंतर प्रा. लाल यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न केला गेला. सर्व जण त्यांना खोटे ठरवण्यासाठी पुढे सरसावले. त्या वेळी ‘हे सर्व चुकीचे होत आहे’, असे मला वाटले. त्यानंतर मी अयोध्येतील उत्खननात सहभागी असल्याचे प्रसारमाध्यमांसमोर सांगितले. ‘तेथे मंदिराचा पुरावा सापडला आहे. प्रा. लाल यांनी सत्यच सांगितले आहे’, असे मी प्रसारमाध्यमांसमोर ठामपणे सांगितले. माझे विधान प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले. मला नोकरीवरून काढून टाकण्याची सिद्धता करण्यात आली. मला देहलीत बोलावून पुष्कळ फटकारण्यात आले; पण मी ठामपणे सांगितले की, मी खोटे बोलू शकत नाही. माझी नोकरी गेली, तरी माझ्या शब्दांवर मी ठाम राहीन. त्या वेळी वरिष्ठ आय.ए.एस्. अधिकारी एच्. महादेवन् आणि मद्रास विद्यापिठाचे प्रा. के.बी. रमण यांनी मला साहाय्य केले. त्यामुळे माझी नोकरी वाचली; पण माझे गोव्यात स्थानांतर करण्यात आले.


श्रीरामजन्मभूमी खटल्यामध्ये ‘रामलला विराजमान’च्या वतीने ४० वर्षे खटला लढणारे ९२ वर्षीय ज्येष्ठ अधिवक्ता के. परासरन् !

ज्येष्ठ अधिवक्ता के. परासरन्

‘९ नोव्हेंबर २०१९ या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने श्रीरामजन्मभूमी खटल्याचा निकाल दिला. गेल्या अनेक दशकांपासून हा खटला रखडलेला होता. असे असतांनाही ‘रामलला विराजमान’ यांची बाजू गेली ४० वर्षे वरिष्ठ अधिवक्ता के. परासरन् (वय ९२ वर्षे) यांनी समर्थपणे मांडली आहे. या खटल्यामध्ये हिंदु आणि मुसलमान पक्षकार जसे होते, तसेच एक पक्षकार स्वतः प्रभु श्रीराम म्हणजेच ‘रामलला विराजमान’ हेही होते. या खटल्यामध्ये अधिवक्ता के. परासरन् यांनी पुष्कळ महत्त्वपूर्ण भूमिका निभावत अत्यंत अभ्यासूपणे आणि गांभीर्याने सूत्रे मांडली आहेत. त्यामुळेच समस्त रामभक्तांना अपेक्षित असा निकाल सर्वाेच्च न्यायालयाकडून मिळाला आहे.

अयोध्या खटल्याचा इत्थंभूत अभ्यास !

अधिवक्ता के. परासरन् यांचा अयोध्या खटल्याचा इतका अभ्यास होता की, ते अनेकदा न्यायालयासमोर खटल्यातील महत्त्वाचे दिनांक अगदी बोलता बोलता सांगायचे. ‘कोणत्या दिवशी काय घडले होते ?’, हे अधिवक्ता परासरन् बोटांची आकडेमोड करून सांगायचे. त्यांनी ‘अयोध्या’ या विषयावर एवढे संशोधन आणि वाचन केले आहे की, त्याच्यावरच एक पुस्तक लिहिता येईल !