‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ची १०० वर्षे : उज्ज्वल राष्ट्रभक्तीचा निरंतर प्रवास !

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’च्या स्थापनेचे शताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने…

एखाद्या स्वयंसेवी संघटनेने त्याच्या मूळ ध्येयापासून विचलित न होता आणि संघटनेत कुठल्याही प्रकारची शकले न होता शताब्दीकडे वाटचाल करणे, हाच मुळात एक विक्रम आहे; पण या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्धिष्णू (वाढत्या) कार्याचा आढावा घेणे हेही एक मोठे आव्हानच आहे !

मुळात संघाची शताब्दी ही गोष्ट रा.स्व. संघाचे संस्थापक सरसंघचालक पूजनीय डॉ. हेडगेवार यांच्या कल्पनेपेक्षा आणि अपेक्षेपेक्षा विपरित आहे. त्यांनी कायम ‘संघ ही समाजातील कृत्रिम व्यवस्था आहे आणि संघ अन् समाज हे जर एकरूप झाले, तर या व्यवस्थेची आवश्यकता उरणार नाही’, अशी मांडणी केली. आपल्या उण्यापुर्‍या १५ वर्षांच्या कार्यकाळात अविरत कष्ट करतांना ‘याची देही याची डोळा’ कार्य पूर्णत्वाकडे नेण्याची त्यांची आकांक्षा होती. म्हणूनच ते म्हणत ‘संघाला ‘ज्युबिली’ (विशेष वार्षिकोत्सव) साजरी करायची नाही !’

अर्थात् आपल्या शेवटच्या सार्वजनिक प्रगट कार्यक्रमात ‘मी हिंदु राष्ट्राचे छोटे स्वरूप येथे बघत आहे’, असे समाधान व्यक्त करत वर्ष १९४० मध्ये त्यांनी त्यांची जीवन यात्रा संपवली आणि संघाच्या या प्रदीर्घ वाटचालीतील दुसर्‍या टप्प्यात संघाने प्रवेश केला. त्यापूर्वी ही १५ वर्षे कशी होती संघाची वाटचाल ? हे बघणे महत्त्वाचे ठरेल !

१. पू. डॉ. हेडगेवार यांचे रा.स्व. संघ स्थापनेपूर्वीचे चिंतन

पू. डॉ. हेडगेवार

मुळात काँग्रेसची स्वातंत्र्य चळवळ, क्रांतीकारकांची स्वातंत्र्यासाठी चाललेली धडपड याच्याशी जवळून संबंध असणारे डॉ. हेडगेवार यांना संघ ही संघटना निर्माण करण्याची आवश्यकता का वाटली ? हे समजल्याखेरीज संघाची १०० वर्षांची वाटचाल समजणे शक्य नाही. ‘आपला देश स्वातंत्र्यासाठी लढत असतांना या देशाला समृद्धी, शौर्य, भौगोलिक अनुकूलता असे सर्व असतांना देश पारतंत्र्यात का गेला ? जर पारतंत्र्यात गेला, तर नेमका कधीपासून या देशाच्या पारतंत्र्याचा प्रारंभ झाला ? केवळ इंग्रज हेच आक्रमक होते का ? मग खैबर खिंडीतून येणारी निरंतर टोळधाड कोण होती ? या देशाचा राष्ट्र म्हणून आधार काय ? हे राष्ट्र सनातन राष्ट्र असेल, तर भविष्यातील स्वतंत्र भारतात या राष्ट्राची उभारणी कुठल्या आधारावर करावी लागेल ?

वरील प्रश्नांचे योग्य चिंतन न करता केवळ ‘इंग्रज हटाव’ या एकाच सूत्रावर आम्ही विचार करत राहिलो, तर उद्या पुन्हा कुणीतरी आक्रमक येईल आणि पुन्हा आमच्यावर राज्य करील. त्यामुळे स्वातंत्र्याची चळवळ चालवतांना दुसरीकडे समाजसंघटन हाही महत्त्वाचा बिंदू लक्षात घेऊन त्यासाठी कुणीतरी पुढे यावे लागेल’, असे पू. डॉ. हेडगेवार यांचे चिंतन होते.

२. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना आणि पू. डॉ. हेडगेवार यांनी स्थापित केलेला आदर्श

‘असंघटित हिंदु समाज, आक्रमण आणि पारतंत्र्यातून निर्माण झालेल्या कुप्रथा, दोष ! जी विविधता आमचे वैशिष्ट्य होते, तिच्याच आधारावर निर्माण झालेले भेद आणि यातून आलेली आत्मविस्मृती यांवर जोपर्यंत उपाय शोधला जात नाही, तोपर्यंत स्वातंत्र्याची चळवळ स्वातंत्र्यप्राप्तीचे लक्ष्य प्राप्त करील; पण निर्दोष समाज निर्मितीपासून दूरच राहील’, या भावनेने स्वातंत्र्याची आकांक्षा अन् निर्दोष समाज उभारणी या २ उद्देशाने त्यांनी स्वतःच संघटन उभे करण्याचा निश्चय केला. नागपूरमध्ये काही शाळकरी मुले आणि त्यांचे स्वातंत्र्य चळवळीतील काही सहकारी यांना घेऊन त्यांनी वर्ष १९२५ मध्ये या अभूतपूर्व संघटनेचा श्रीगणेशा केला.

संघाच्या कामाचा प्रारंभ अशी चाकोरी सोडून झाली. एखादा मोठा ग्रंथ, घटना, पदाधिकार्‍यांची घोषणा, अशा कुठल्याही साचेबद्ध पद्धतीने संघ चालू झाला नाही आणि ‘संघ अन् समाज एकरूप करत संघ विसर्जित झाला पाहिजे’, असे पू. डॉ. हेडगेवार यांचे प्रारंभापासून म्हणणे होते. ‘संघटन एके संघटन’, ही भूमिका घेत अन्य कुठल्याही राजकीय वा सामाजिक चळवळीत व्यक्तीगत स्वरूपात सहभागी होण्यास स्वयंसेवकांना मुभा होती. स्वतः डॉ. हेडगेवार ‘जंगलतोड सत्याग्रहा’त सामील होतांना त्यांनी स्वतःला सरसंघचालक दायित्वातून मुक्त करून घेतले होते’, हे येथे लक्षात घ्यावे लागेल.

याचा अर्थ समाज जीवनातील हालचालींपासून संघ अलिप्त होता का ? तर तसे बिलकुल नव्हते. याउलट रामनवमीमधील यात्रेच्या प्रबंधापासून नागपूरमधील दंगलीत शांतता प्रस्थापित करण्यात संघ स्वयंसेवक अग्रेसर होते. समाजातील कंत्राट (कॉन्ट्रॅक्ट) घेणारी संघटना, असे स्वरूप न येऊ देता; पण प्रत्येक क्षेत्रात काही आदर्श प्रस्थापित करण्याची ही कल्पना प्रत्यक्षात आणणे पुष्कळ अवघड होते; मात्र पू. डॉ. हेडगेवार यांनी कौशल्याने तो आदर्श प्रस्थापित केला.

३. पू. माधव सदाशिवराव गोळवलकरगुरुजी यांनी केलेल्या कार्यामुळे संघाची लोकप्रियता वाढणे

पू. माधव गोळवलकरगुरुजी

वर्ष १९४० मध्ये पू. डॉ. हेडगेवार निवर्तले आणि जातांना संघाची धुरा त्यांनी पूजनीय गुरुजींवर, म्हणजे पू. माधव सदाशिवराव गोळवलकरगुरुजी यांच्यावर सोपवली. वरकरणी दोघांच्या व्यक्तीमत्त्वात भेद होता; कारण पू. गुरुजी हे आध्यात्मिक साधनेतून संघाकडे आले होते, तर पू. डॉ. हेडगेवार हे सार्वजनिक, सामाजिक चळवळीत क्रियाशील असतांना संघ स्थापनेकडे वळले होते. त्यामुळे अनेकांना उत्सुकता, चिंता आणि भीती अशा संमिश्र भावना पू. गुरुजींच्या नेतृत्वाविषयी होती; पण पू. गुरुजींनी अतिशय धैर्याने संघाची नौका पुढे नेली.

श्री. रवींद्र मुळे

पू. गुरुजींनी नेतृत्व स्वीकारले, तेव्हा देशभर स्वातंत्र्याचे आंदोलन गतीमान होत होते. अशा वेळेस स्वयंसेवकांना त्यात सहभागी होण्यास त्यांनी मुभा तर दिली होतीच; पण दुसर्‍या बाजूने फाळणीची शक्यता वाढत असतांना हिंदु समाजाला सावध करणे आणि संघकार्य अधिक गतीमान करणे, असे दुहेरी काम ते त्यांच्या भारतभ्रमणात करत होते. पू. डॉ. हेडगेवार यांच्या काळात निर्माण झालेल्या ‘पूर्णकालिक कार्यकर्ता’ या संकल्पनेला प्रचारक व्यवस्थेचे नेटके स्वरूप त्यांनी दिले. देशभर त्यांच्या प्रगट कार्यक्रमात होणारी गर्दी आणि संघशिक्षा वर्ग, शिबिर शाखा यांमध्ये वाढत जाणारी संख्या यांवरून संघाची लोकप्रियता वाढलेली लक्षात येत होती.

४. स्वातंत्र्य चळवळ आणि फाळणी यांच्या वेळी संघ स्वयंसेवकांनी केलेले अतुलनीय बलीदान

दुर्दैवाने फाळणीची आशंका खरी ठरली ! पू. गुरुजींनी पंजाब, सिंध या प्रांतांतील स्वयंसेवकांना ‘शेवटचा हिंदू परत येईपर्यंत स्वतःचे स्थान सोडू नका’, अशी आज्ञा दिली होती. फाळणीच्या व्यथा या जिव्हारी लागणार्‍या होत्या ! अनेक स्वयंसेवकांनी हिंदु समाजाच्या संरक्षणार्थ केलेले बलीदान अतुलनीय होते ! स्वातंत्र्य चळवळीची व्याख्या ज्यांनी स्वतःच ठरवली होती, त्यांनी स्वयंसेवकांच्या या त्यागाची नोंद तर घेतलीच नाही; पण राजकीय स्वार्थाने संघाला ‘स्वातंत्र्य चळवळीत तुम्ही कुठे होता ?’, असा जाब विचारण्याची एकही संधी सोडली नाही.

५. गांधी यांच्या हत्येनंतरच्या काळात संघाची अपकीर्ती रोखण्यासाठी पू. गोळवलकरगुरुजी यांनी केलेले यशस्वी कार्य !

फाळणी पाठोपाठ म. गांधी यांची दुर्दैवी हत्या, हा भारतीय जनमानसावर मोठा आघात होता; पण काहींना ती वेगळ्या कारणाने संधी वाटली आणि संघाची लोकप्रियता ज्यांना खुपत होती, त्यांनी कुठला तरी संबंध जोडत संघावर बंदी आणत थेट गुरुजींवरच आरोप ठेवले आणि त्यांना अटक करण्यात आली. संघ बंदीसाठी एका बाजूने न्यायालयीन बाजू लढणे, दुसरीकडून सरकारशी पत्रव्यवहार आणि अन्यायाविरुद्ध स्वयंसेवकांना सत्याग्रहाचा आदेश देत पू. गुरुजींनी या चक्रव्यूहातून यशस्वीपणे सुटका केली. असे असले, तरी या सगळ्या घटनाक्रमांचा संघकार्यावर, हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते आणि विचार यांवर विपरित परिणाम झाला. ‘गोबेल्स’ पद्धतीने (एकच खोटे वारंवार सत्य म्हणून सांगून ते समाजावर ठसवणे, म्हणजे ‘गोबेल्स’ नीती) विखारी प्रचार करून संघाला अपकीर्त करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. परिणामी उपेक्षा, अवहेलना आणि टिंगल संघाच्या पदरी आली. त्या वेळी संघ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत त्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवत पू. गुरुजींनी अखंड प्रवासाचा आणि भारतभ्रमणाचा विक्रमच केला. वर्षातून दोनदा असे ३४ वर्षांत ६८ वेळा भारतभ्रमण केलेला हा महापुरुष होता.

– श्री. रवींद्र मुळे, नगर (२९.३.२०२५)

(क्रमश:)

लेखाचा भाग २ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/897968.html